
मुंबई (Mumbai) : देशांतर्गत बाजारपेठेत वर्ष २०२४ अखेर वाहनविक्रीत वर्ष २०२३ च्या तुलनेत नऊ टक्के वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च वाहनविक्री आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात झालेल्या विक्रीत मात्र, गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्सने (फाडा) ही माहिती दिली आहे.
डिसेंबरमध्ये ट्रॅक्टर वगळता इतर सर्व श्रेणींमध्ये घसरण झाली असून दुचाकींची विक्री १८ टक्के, प्रवासी वाहने दोन टक्के, व्यावसायिक वाहने (सीव्ही) ५.२ टक्के आणि तीन चाकी वाहनांची विक्री ४.५ टक्क्यांनी घसरली असल्याचे फाडाने म्हटले आहे.
रोखीची टंचाई, बाजारातील नकारात्मक वातावरण, शेतकऱ्यांना उशीरा मिळालेले पिकाचे पैसे, थांबलेले सरकारी वितरण आणि वर्षअखेरीचे नेहमीचे घटक ही विक्रीत घसरण होण्याची मुख्य कारणे असल्याचे वितरकांनी म्हटले आहे.
वर्ष २०२४ मध्ये दोन कोटी ६१ लाख वाहनांची विक्री झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये हे प्रमाण दोन कोटी ३९ लाख होते. या वर्षात विविध वाहन कंपन्यांच्या लोकप्रिय मोटारींच्या मॉडेलच्या पुरवठ्यातील आव्हाने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीमुळे दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. ट्रॅक्टरनी २५.७ टक्के वार्षिक वाढ नोंदवली असून, २०२४ मध्ये आतापर्यंतची सर्वोच्च दोन कोटी ६१ लाख ट्रॅक्टरची विक्री झाली आहे.
दुचाकी वाहनांच्या विक्रीत वार्षिक ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री १०.५ टक्के, प्रवासी वाहने पाच टक्के, ट्रॅक्टर तीन टक्के आणि व्यावसायिक वाहनांमध्ये किरकोळ ०.०७ टक्के वाढ झाली आहे. दुचाकी विक्रीने २०१८चा उच्चांक थोडक्यात चुकला, तर व्यावसायिक वाहनांची विक्रीदेखील २०१८ च्या शिखरावर पोहोचू शकलेली नाही.
प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत १.९ टक्के आणि मासिक तुलनेत ८.८ टक्क्यांनी घट झाली आहे. प्रामुख्याने सणासुदीच्या हंगामानंतर शिल्लक पातळी आणि स्टॉक क्लिअर करण्याच्या उद्देशाने उच्च सवलती यामुळे विक्री कमी झाली आहे. मारुती सुझुकीची विक्री तीन टक्क्यांनी घसरली, तर ह्युंदाई दोन टक्क्यांनी, टाटा मोटर्स १५ टक्क्यांनी आणि महिंद्रा आणि महिंद्राची विक्री ९.५ टक्क्यांनी घसरली. मात्र, टोयोटा किर्लोस्करची विक्री २९ टक्क्यांनी वाढून १९,३९२ वर पोहोचली आहे.
दुचाकी विक्रीत वार्षिक १७.६ टक्के आणि मासिक ५४.२ टक्के लक्षणीय घट झाली आहे. बाजारातील नकारात्मक वातावरण, सरकारी निधीचे उशीरा वितरण, यामुळे व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक ५.२ टक्के आणि मासिक १२.१ टक्क्याने घट झाली. अनेक ग्राहकांनी २०२५ मध्ये येणाऱ्या नव्या मॉडेलला प्राधान्य देत खरेदी पुढे ढकलल्याने हा परिणाम झाला.
ग्रामीण बाजारपेठेमध्ये महिनाभर वाईट कामगिरी होत नव्हती. ट्रॅक्टर विक्री हे त्याचेच द्योतक आहे. कर्ज उपलब्धतेशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नसल्याने डिसेंबरमध्ये विक्रीत घट झाली. साधारणपणे, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीत ५० टक्क्यांनी वाढ होते, जी या वर्षी झाली नाही. ग्राहकांनी वाहन खरेदीची योजना पुढे ढकलल्या असण्याची शक्यता असल्याने आता जानेवारीमध्ये विक्रीमध्ये सुधारणा दिसून येईल.
- सी. एस. विघ्नेश्वर, अध्यक्ष, फाडा