

मुंबई (Mumbai): सुमारे ११० वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने भायखळा येथे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाची स्थापना केली. आज, ११० वर्षांनंतर, मुंबई उपनगरात प्रथमच बर्ड पार्क उभारण्यात येत आहे. त्यामुळे हे खरोखरच ऐतिहासिक पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलुंड बर्ड पार्कचे भूमिपूजन केले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, आमदार मिहीर कोटेचा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, जुलै २०२३ मध्ये आमदार कोटेचा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे महापालिकेच्या मालकीच्या ४.२५ एकर भूखंडावर एक्सॉटिक बर्ड पार्क विकसित करण्याची मागणी केली होती.
आज त्या प्रयत्नांना यश आले आहे. सुमारे अडीच वर्षांच्या तांत्रिक प्रक्रियेनंतर मुलुंडमध्ये एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण एक्सॉटिक बर्ड पार्क उभारणीस सुरुवात होत आहे. हा प्रकल्प केवळ मुलुंडसाठीच नव्हे, तर मुंबई आणि ठाण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
मुलुंडमधील इतर विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक्सॉटिक बर्ड पार्कसह कोटेचा यांनी अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. मुलुंड येथील कचराभूमीवर गोल्फ कोर्स विकसित करण्यासाठी व्यवहार्यता अभ्यासाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मुलुंडमध्ये नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामालाही मंजुरी मिळाली आहे. १३ मजली (भुईमजला + १३ मजले) इमारतीसाठी ८७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मेट्रो लाईन ४ चे काम वेगाने सुरू असून पुढील तीन वर्षांत तिचे उद्घाटन होईल. त्यामुळे मुलुंडचा संपूर्ण कायापालट होणार आहे, असे मी ठामपणे सांगू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कोटेचा म्हणाले की, मुलुंड पूर्वेला लवकरच पेट्रोल पंप मिळणार असून, ही मागणी अनेक दशकांपासून प्रलंबित होती. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर गोल्फ कोर्ससाठी व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी बीएमसीने एजन्सीला मंजुरी दिली आहे. जगभरातील अभ्यासानुसार, पुढील ६–७ वर्षांत यामुळे आजूबाजूच्या मालमत्तांच्या किमती वाढतील. तसेच रोपवे कार प्रकल्पही लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.
आमदार कोटेचा यांनी सांगितले की बीएमसीने अलीकडेच मुलुंड एक्सॉटिक बर्ड पार्कच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. महानगरपालिकेने नुकतीच १९० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली. जागतिक दर्जाचे बर्ड पार्क उभारले जाणार आहे. मुलुंड आणि पूर्व उपनगरातील रहिवाशांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे.
प्रस्तावित मुलुंड बर्ड पार्क १७,९५८ चौरस मीटर जागेवर उभारले जाईल आणि भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे उपकेंद्र असेल. ११० वर्षांनंतर मुंबईला वैशिष्ट्यपूर्ण असे बर्ड पार्क मिळत आहे. ब्रिटिशांनी शतकापूर्वी पहिले प्राणीसंग्रहालय उभारले होते आणि आता स्वातंत्र्योत्तर भारतात अशा प्रकारचे पहिले बर्ड पार्क मुंबईत उभारले जात आहे, असे कोटेचा यांनी नमूद केले.
या प्रकल्पाची आखणी अत्यंत बारकाईने करण्यात आली आहे. पूर्व उपनगरातील जवळपास २५ लाखांची लोकसंख्या तसेच नवी मुंबई आणि ठाण्याचे रहिवासी यांना याचा मोठा फायदा होणार आहे. हे बर्ड पार्क मोठे पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येईल, असे कोटेचा म्हणाले.
कसा आहे मुलुंड एक्सॉटिक बर्ड पार्क
१८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांसाठी प्रशस्त आणि नैसर्गिक पद्धतीचे निवासस्थान असलेले जागतिक दर्जाचे बर्ड पार्क
एशियन झोन, आफ्रिकन झोन, ऑस्ट्रेलियन झोन आणि अमेरिकन झोन अशा थीम-आधारित विभागांमध्ये विविध पक्षी प्रजाती आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास
रेड-ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम-हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मालाबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक स्वान, ब्लॅक मुनिया, गाला कॉकॅटू, शहामृग, क्राउनड पिजन आणि स्कार्लेट मॅकॉ या काळाच्या ओघात लुप्त होत चाललेल्या झालेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी
पक्षीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि व्याख्याने
पक्षी रुग्णालय, क्वारंटाईन विभाग, पक्ष्यांसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर आणि इतर अत्याधुनिक सुविधा