Ajit Pawar : पुण्यातील 'ते' स्मारक प्रेरणादायी ठरावे! अजित पवारांनी केली 100 कोटींच्या निधीची घोषणा

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

मुंबई (Mumbai) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

Ajit Pawar
Suresh Khade : कंत्राटी कामगारांसाठी सरकार आणणार नवा कायदा; 'हे' आहे कारण...

राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल. स्मारक विस्तारासाठी जागा संपादन आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन करण्यात यावे.

भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरूप निश्चित करता येईल. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी.

भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक प्रेरणादायी ठरावे यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा अंतर्भाव असावा. या स्मारकासाठी सरकारतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे पवार म्हणाले.

Ajit Pawar
Sambhajinagar : बीड बायपास देवळाई चौक ते सोलापूर हायवे रस्ता बघा कुणामुळे रखडला?

भुजबळ म्हणाले की, पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याचे महत्त्व असल्याने याठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा असावी. शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असाव्यात. इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी.

इथे शिकणाऱ्या मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात यासाठी आवश्यक सुविधा असाव्यात. मराठी आणि इंग्रजीतील आदर्श शिक्षकांची समिती तयार करून इथे देण्यात येणाऱ्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यात यावे. स्मारकात परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. या वास्तूचे ‘सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com