
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या देवगिरी महाविद्यालय - वखार महामंडळ - निर्लेप कंपनी - बीड बायपास - कमलनयन बजाज रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील निर्लेप ते वखार महामंडळ दरम्यान रेल्वे रुळावर एक किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापकांनी ३० कोटीचे अंदाजपत्रक महानगरपालिकेला सादर केले आहे. मात्र बांधकामासाठी इतका निधी महानगरपालिकेकडे नसल्याने शिंदे सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत महानगरपालिकेचे कोट्यवधीचे प्रस्ताव नामंजूर करणाऱ्या शिंदे सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळून खऱ्या अर्थाने उड्डाणपुलाचे भिजत घोंगडे उठणार काय, असा सवाल उद्योजकांसह सातारा - देवळाई - बीड बायपासकरांमध्ये निर्माण होत आहे.
येथील रेल्वे रुळावर उड्डाणपूल उभारणीची सातारा औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांसह सातारा - देवळाई - बीड बायपासकरांची मागणी गत ५० वर्षे जुनी आहे. २५ वर्षांपुर्वी रेल्वे रुळावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिकेने शाहशोक्तामिया दर्ग्याजवळ नाल्यावर पूल बाधून निर्लेप कंपनी ते बीड बायपास कमलनयन रुग्णालयापर्यंत रस्ताही तयार करून दिला होता. निर्लेप कंपनी ते वखार महामंडळाच्या बाजुला रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार होता, पुढे वखार महामंडळ ते सातारा औद्योगिक वसाहत ते देवगिरी महाविद्यालयापर्यंत रस्ता देखील तयार आहे.
वखार महामंडळ ते निर्लेप कंपनीपर्यंत जागा देखील उपलब्ध आहे. त्याकाळात रेल्वेने स्थानिक स्वराज्य संस्थेला ४५ लाख रुपये सेंन्ट्रेज शुल्क भरायचे सांगितले होते. मात्र हे शुल्क कोणी भरायचे, यावरून एमआयडीसी आणि महानगरपालिका प्रशासनात वाद सुरू झाला आणि पूल रखडला तो रखडलाच.
याच नियोजित उड्डाणपुलाच्या काही अंतरावर सातारा ते छत्रपतीसंभाजीनगर गावठाण मार्गावर फुलेनगर रेल्वे क्रॉसिंग (क्रमांक ५३) आहे. येथे दररोज वाहनांची गर्दी होते. सातारा गाव, बीड बायपास एमआयटी आणि इतर संस्थांकडे याच रस्त्यावरून वाहने जातात. दिवसभरातून अनेकदा रेल्वे क्रॉसिंग बंद करावी लागते. यामुळे फुलेनगर ते मिलिंदनगर मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. गेट उघडे झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान एक ते दीड तासाचा अवधी लागतो. यात विद्यार्थी , नागरिक, चाकरमाने आणि रूग्णांची विशेषतः गरोदर महिलांच्या मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा होतात.
कांचनवाडी, नक्षत्रवाडी आणि पैठणकडे जाण्यासाठी वाहनधारकांना रेल्वे स्टेशनच्या बाजुच्या उड्डाणपुलावरून महानुभव चौकातून जावे लागत आहे. याशिवाय अनेक वाहनधारकांना शहानूरवाडीच्या (संग्रामनगर) रेल्वे उड्डाणपुलावरून जावे लागत आहे. तसेच शिवाजीनगर रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक ५५ चा आधार होता. आता तिथे भुयारी मार्गाचे काम चालु झाल्याने दोन्ही उड्डाणपुलावर वाहनांची गर्दी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातून जालनारोड ते बीड बायपास , सातारा - देवळाई - बाळापुर - गांधेलीची कनेक्टव्हीटी वाढनिण्यासाठी याभागांकडे जाणाऱ्या काही रस्त्यांची सुधारणा व्हावी. यापैकी जुना बीडबायपास ते चिकलठाणा रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक ५७ येथे रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम व्हावे, शिवाजीनगर रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक - ५५ व मुकुंदवाडी शिवारातील बाळापुर रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक - ५६ तसेच फुलेनगर रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक - ५३ येथे भुयारी मार्ग व्हावेत. पायलट बाबा नगरी ते बाळापुर ते बीड बायपास रस्त्याचे रूंदीकरण व खडीकरण व्हावे.
बीड बायपास - देवळाई चौक ते शिवाजीनगर ते विश्रांतीनगर ते झेंडा चौकापर्यंत रस्त्याचे काम व्हावे, बीड बायपास एमआयटी ते फुलेनगर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण व्हावे, रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखालून वळण मार्गाचे काम व्हावे, रेल्वेस्टेशन उड्डाणपुल ते सातारा एमआयडीसी ते फुलेनगर रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक - ५३ या रस्त्याची दुरूस्ती व्हावी, निर्लेप ते वखार महामंडळ रेल्वे उड्डानपुलाचे भिजत घोंगटे दुर करावे, बीड बायपास ते साई टेकडी रस्त्याची सुधारणा व्हावी, जय भवानीनगर चौक ते बीड बायपास अखंड उड्डापूल व्हावा, देवळाई ते बाळापुर दरम्यान खडी रस्त्याची दुरूस्ती व्हावी, असे अनेक पर्याय छत्रपती संभाजीनगर ते बीडबायपासच्या कनेक्टव्हिटी वाढविण्यासाठी तत्कालीन महापालिका प्रशासकांना टेंडरनामाने दिले होते. यावर अंत्यंत अभ्यासात्मक मालिका टेंडरनामाने प्रसिध्द केली होती. प्रत्यक्षात तत्कालिन प्रशासकांसोबत या मार्गांची पाहणी केली होती.
दरम्यान त्यांच्याच काळात सातारा एमआयडीसीतील रेल्वे स्टेशन उड्डाणपुल ते निर्लेप कंपनी ते फुले नगर रेल्वे क्राॅसिंग दरम्यान तसेच फुलेनगर रेल्वे गेट ते बीड बायपास एमआयटी, शिवाजीनगर ते विश्रांतीचौक, झेंडा चौक ते जालनारोड या रस्त्याचे काम झाले. बाळापूर रेल्वे गेट क्रमांक ५६ ते बीड बायपास हा रस्ता देखील त्यांनी स्मार्ट सिटीत मंजूर करून घेतला होता. सदर रस्त्याचे देखील काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय शिवाजीनगर भुयारी मार्गाचे काम देखील सुरू झाले आहे. यापैकीच निर्लेप ते वखार महामंडळ उड्डाणपुलाबाबत टेंडरनामाने तत्कालीन महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
सातारा - देवळाई - बीड बायपासकरांसाठी थेट छत्रपती संभाजीनगर शहराशी उत्तम कनेक्टव्हिटी जुळवता येईल, याचे त्यांना महत्व पटल्याने त्यांनी या पर्यायी मार्गाचा विचार केला होता. यासाठी त्यांनी सन २०२३ - २४ च्या महापालिका अर्थसंकल्पात १५ कोटीची तरतूद केली होती. येथे पूल उभारण्यासाठी नाशिकच्या एका प्रकल्प व्यवस्थापकाची देखील नियुक्ती केली होती. नुकतेच त्यांनी या पुलासाठी ३० कोटीचे अंदाजपत्रक तयार करून महापालिकेकडे दिले आहे. पुल उभारणीसाठी इतका निधी महानगरपालिकेकडे नसल्याने महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारी युध्दपातळीवर सुरू केली आहे. येथे तातडीने उड्डाणपुल उभारल्यास देवगिरी महाविद्यालयाकडून राज्य वखार महामंडळ ते थेट बीडबायपासला कनेक्टव्हिटी मिळणार आहे. यातच पुन्हा संग्रामनगर उड्डाणपुला प्रमाणेच फुलेनगर रेल्वे क्राॅसिंग गेट क्रमांक - ५३ येथील गेट बंद करून भुयारी मार्ग केल्यास थेट उस्मानपुऱ्यातून सातारा गावात जाता येईल व लाखो वाहनधारकांची सोय होणार आहे.
टेंडरनामाने निर्लेप उड्डाणपुलाबाबतची २५ वर्षापूर्वीची धुळखात पडलेली संचिका मिळवल्यानंतर यात धक्कादायक बाबी उघड झाल्या. यापुलाच्या बांधकामासाठी रेल्वेने सन २००५ - ०६ च्या दरम्यान २० कोटीचा बजेट ठेवला होता. रेल्वेच्या म्हणण्यानुसार सर्वेक्षणासाठी ४५ लाख रुपये महापालिकेने रेल्वेच्या खात्यात जमा केले नव्हते. हे पैसे कोण भरणार? या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा आणि बैठकाच पार पडल्या होत्या. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या पुलाच्या कामासाठी मध्यंतरी प्रयत्न केला होता.
एमआयडीसीने उड्डाणपुलासाठी पैसे भरावेत, अशी सूचना त्यांनी केली होती, मात्र रेल्वे स्टेशन एमआयडीसी हा परिसर औद्योगिक महामंडळाने महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. यामुळे पैसे भरण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका उद्योग विभागाने घेतली होती. महापालिकेने रेल्वेकडे पैसे न भरल्याने या पुलाचे काम थंड बस्त्यातच राहिले होते. त्याच काळात पुलाचे काम झाले असते तर आज महापालिकेला कोट्यवधीचा फटका बसला नसता.
टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर सातारा-देवळाईकडे जाण्यासाठी...शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्याने रेल्वे येताना-जाताना या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी थांबेल.
संग्रामनगर उड्डाणपूलाप्रमाणेच देवगिरी महाविद्यालय ते बीड बायपास कमलनयन बजाज हाॅस्पिटल दरम्यान एक किलोमीटरचा उड्डाणपुलाच्या हालचाली सुरू त्यामुळे सातारा परिसर, एमआयटी कॉलेज, श्रीयश कॉलेज, कमलनयन बजाज हॉस्पिटलकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर होईल. यापुलाचे बांधकाम झाल्यास संग्रामनगर उड्डाणपुलावर गर्दी कमी होईल.
असे झाले तर...
फुलेनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक - ५३ येथे संग्रामनगर प्रमाणेच भुयारी मार्ग केला तर येथे देखील वाहनांच्या रांगा लागणार नाहीत. वाहतूक कोंडी कमी होईल. पीर बाजारा ते रेल्वे क्रॉसिंग हा रस्ता रूंद करावा. सातारा गाव, एमआयटी कॉलेज, श्रीयश कॉलेज, कमलनयन बजाज हॉस्पिटल, सुधाकरनगरकडे जाण्यासाठी विनाअडथळा पर्याय उपलब्ध होईल. संग्रामनगर उड्डाणपुलावरील गर्दी कमी होण्यास मदत. पर्यायाने शाहनूरमिया दर्गा चौकातील वाहतुकीवरील ताण कमी होईल.