
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटी (Smart City) प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील २२ रस्त्यांचे काम अतिशय निकृष्टपणे सुरू असून नव्यानेच केलेल्या या रस्त्यांवर खड्डे पडले असून खडी बाहेर आलेली आहे. खराब झालेले रस्ते ठेकेदाराकडून नव्याने करून घ्या, त्या शिवाय देयके देऊ नका, या कामांवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन् केलेल्या कार्यवाहीची माहिती मला कळवा, असे महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती रेणूकादास वैद्य यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आता प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तीककुमार पाण्डेय या पत्रानंतर काय कारवाई करतात याकडे टेंडरनामाचे लक्ष असेल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यात २२ रस्त्यांची कामे अंत्यंत निकृष्ट पध्दतीने केली जात आहेत. यातील जवाहरनगर पोलिस स्टेशन ते रोपळेकर चौक, दमडीमहल ते चंपाचौक, हर्सुल ते पिसादेवी, भाग्यनगर, औरंगपुरा या रस्त्यांचा भांडाफोड केल्यानंतर महापालिका प्रशासक डाॅ. अभिजित चौधरी यांनी या रस्त्यांसह उर्वरित कामांची आय.आय.टी. नियुक्त तांत्रिक सल्लागारांमार्फत पाहणी केली. त्यात आय.आर.सी.च्या मानकानुसार कुठेही काम होत नसल्याचा अहवाल पुढे आला.
रस्त्यांवर लहाण-मोठे क्रॅक आणि रस्त्याचा पृष्ठभाग उखडल्याचा व सखल भाग तयार झाल्याने पाणी साचल्याचे देखील मुद्दे उपस्थित करण्यात आले. यानंतर स्मार्ट रस्त्यांची स्वतः प्रशासक चौधरी यांनी पाहणी केली. दरम्यान ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई न करता खराब भागाचे मेजरमेंट घेणे बंद केले आहे, त्याला त्याचे पेमेंट देणार नाहीत, नव्याने दुरूस्ती करून घेऊ , ठेकेदाराकडे दहा वेर्ष देखभाल दुरुस्तीचा काळ आहे, त्याला १५ टक्के कमी दराने काम दिलेले आहे. १०८ पैकी ८६ रस्त्यांना स्थगिती देण्यात आल्याचे म्हणत स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापकांसह बडे अधिकारी कारवाईवर पांघरून घालत आहेत.
स्मार्ट सिटीतून ३१७ कोटी रुपये खर्चून १०८ रस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामांचे टेंडर छत्रपती संभाजीनगरातील ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. कामांवर देखरेख करण्यासाठी मुंबई आयआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीमार्फत १०८ रस्त्यांची अंतर्गत कामे हाती घेण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. असे असतानाच निधीअभावी १०८ पैकी तब्बल ८६ रस्ते कामांना स्थगिती देण्यात आली.
तत्कालीन सीईओ तथा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांनी टेंडरमध्ये तशी अट टाकत सुरवातीला केवळ २२ रस्त्यांची कामे पहिल्या टप्प्यात घेण्यासाठी कंत्राटदाराला पत्र दिलेले होते. पहिल्या टप्प्यातील अंतिम २२ रस्त्यांची कामे ठेकेदाराने हाती घेतली. मात्र कामातील सुमार दर्जा पाहुन आधीचेच रस्ते बरे होते, असे म्हणण्याची वेळ संभाजीनगरकरांवर आली आहे.
अद्यापही कामे अर्धवट...
स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरातील वेगवेगळ्या भागात होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील २२ रस्त्यांची कामे अत्यंत कासवगतीने सुरू आहेत. काही रस्त्यांवर पुलांची कामे रखडलेली आहेत. काही ठिकाणी चौकातील कामांची रखडकथा सुरू आहे. अनेक भागात फुटपाथचे काम अर्धवट स्थितीत आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने ठेकेदाराला ३० ऑक्टोबर २०२२ ची मुदत दिली होती. मात्र अद्याप रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे रमजान सारख्या सणासुदीत खरबडीत रस्त्यांवर अपघाताचा सामना करावा लागत आहे. याकडे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.