
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सोलापूर - धुळे महामार्गावरील एडशी - छत्रपती संभाजीनगर १९० किमी, तसेच आडगाव निपानी ते करोडी ३० किमी व करोडी ते तेलवाडी ५२ किमी अंतरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. मागील तीन वर्षांत सातशे कोटीचा टोल वसूल करूनही कंत्राटदार देखभाल दुरूस्तीकडे लक्ष देत नाहीत. खड्ड्यांमुळे हा राष्ट्रीय महामार्ग मृत्युचा महामार्ग बनलाय, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत.
कोट्यावधींचा टोल वसूल करून कंत्राटदाराकडून टोलनाक्यावरील स्वच्छतागृहांची देखील देखभाल केली जात नाही. या संदर्भात ग्रामस्थांकडून असंख्य तक्रारी करण्यात येत आहेत.
बुधवारी यासंदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले यांच्यापुढे सचित्र कैफियत मांडताच त्यांनी कंत्राटदारांची कान उघाडणी करत त्यांना ३० नोव्हेंबरची डेडलाईन देत हा संपूर्ण महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी अस्वच्छ टोलनाके व त्यातील मूलभूत सोयीसुविंधासाठी प्रत्यक्षात कंत्राटदारांकडून कामही सुरू केले आहे.
सोलापूर - धुळे हा अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. सोलापूर शहरातून सुरू होणारा हा महामार्ग पुढे धाराशिव, बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर, धुळे शहरापर्यंत जातो. या राष्ट्रीय महामार्गामुळे खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे तीन प्रदेश जोडले गेले आहेत. ज्यामध्ये खानदेशातील धुळे व जळगांव, मराठवाड्यातील संभाजीनगर व बीड तर पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
धुळे - चाळीसगाव - कन्नड - वेरूळ - संभाजीनगर - गेवराई - बीड - वाशी - धाराशिव - तुळजापूर - सोलापूर आदी शहरातून गेलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसात खड्ड्यात डबके साचून राहत आहे. त्यामुळे त्या - त्या परिसरातील नागरिकांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
या संदर्भात प्रकल्प संचालक रविंद्र इंगोले यांनी प्रकल्प व्यवस्थापक संघर्ष मेश्राम, भाऊसाहेब कसबे, आशिष देवतकर, अनिकेत कुलकर्णी व राहुल पाटील यांच्या समवेत बैठक घेतली. त्यातच त्यांनी कंत्राटदार प्रतिनिधींची कान उघाडणी करत ३० नोव्हेंबर पर्यंत खड्डे बुजविण्याची तंबी दिली. त्यानुसार क॔त्राटदारांनी काम देखील सुरू केले आहे.
सोलापूर ते एडशीपर्यंत हा महामार्ग सोलापूरच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अखत्यारित येतो. एडशी ते छत्रपती संभाजीनगर (आडगाव फाटापर्यंत) १९० किमीसाठी सतराशे कोटी खर्च करण्यात आला आहे. या रस्त्याची बीओटी तत्वावर देखभाल दुरूस्तीची जबाबदारी आयआरबी कंपनीकडे आहे. यासाठी धाराशीव जिल्ह्यात पारगाव व बीड जिल्ह्यात पाडळशिंगी येथे तसेच जालना जिल्ह्यातील माळीवाडी येथे टोलनाके उभारण्यात आले आहेत. यातून कंत्राटदाराला आत्तापर्यंत सातशे कोटी रूपये मिळाले आहेत.
पुढे आडगाव फाटा ते करोडी ३० किमी या रस्त्यासाठी ५६२ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी एलएनटी कंपनीकडे आहे. रस्त्याचा देखभाल दुरूस्तीचा खर्च निघावा यासाठी करोडी येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. यातून कंत्राटदाराला सत्तर कोटी मिळाले आहेत. पुढे करोडी ते तेलवाडी ५२ किमीपर्यंत रस्त्यासाठी ५१२ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. या रस्त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी डीबीएल कंपनीकडे आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च निघावा यासाठी तेलवाडी येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. यातून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला १४० कोटी मिळाले आहेत. पुढे कन्नड घाट या महामार्गाची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे आहे.
कन्नड घाटाचा गुंता कायम
काही ट्रकचालकांनी कन्नड ते चाळीसगाव दरम्यान औट्रम घाटाचा मुद्दा उपस्थित केला. कन्नड ते चाळीसगाव दरम्यान पर्यायी रस्ता नाही. त्यात जड वाहनांमुळे घाटात सतत अपघात होत असल्याने व अनेक तास वाहतूक कोंडी होत असल्याने न्यायालयाने घातातून जड वाहनांना बंदी घातली आहे. परिणामी गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाना, उत्तर प्रदेश येथून राज्यात आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या जड वाहनांना चाळीसगाव ते नांदगावमार्गे ११० किलोमीटरचा फेरा कापत छत्रपती संभाजीनगर गाठावे लागत आहे.
कन्नड ते चाळीसगाव केवळ ४० किलोमीटरचे अंतर आहे. यात मोठी तफावत असल्याने शिवाय वेळ आणि इंधनाचा खर्च वाया जात आहे. कन्नड ते चाळीसगाव घाटासाठी यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सात हजार कोटीचा निधी घोषित केला होता. त्यानंतर चार हजार कोटीचा निधी घोषित केला होता. मात्र घाट रस्त्याची केवळ तीस मीटर रूंदी असल्याने व येथे वनजीव प्राण्यांचे मोठे अस्तित्व असल्याने वन विभागाने परवानगी फेटाळली आहे. यासर्व कारणांनी जड वाहनधारक हतबल झाले आहेत.
घाट जाम होत असल्याने व वर्षाकाठी शेकडो अपघात होत असल्याने तसेच पावसाळ्यात वाहतूक ठप्प होत असल्याने जड वाहतूक बंद केली आहे. याचा मोठा फटका मराठवाडा आणि दक्षिणेकडील इतर उद्योग क्षेत्रांवर होत आहे. यावर तातडीने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पर्यायी मार्गाचा तोडगा काढणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया ट्रकचालकांनी दिली. चाळीसगाव - धुळे मार्गाचे कामही संथगतीने होत असल्याचे ट्रक चालकांचे म्हणणे आहे.