
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या विशेष प्रयत्नातून १५ कामांचे भाग्य उजळणार आहे. यात रस्ते, ड्रेनेजलाईन आणि सामाजिक सभागृहांचा समावेश आहे.
वाळूज महानगर औद्योगिक परिसरातील मिटमिटा, पडेगाव, जुने पडेगाव, गेवराई, पाटोदा, माळीवाडा, गोलवाडी, दौलताबाद तबेच सातारा-देवळाई भागातील खराब झालेल्या रस्ते तसेच ड्रेनेजलाईन सुधारणेसाठी व सामाजिक सभागृह बांधण्यासाठी निधीची मागणी आमदार संजय शिरसाट यांनी केली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये मिटमिटा अंतर्गत कोमलनगर ते साईनगर सिमेंट रस्त्यासाठी ५० लाख, मिरानगर अंतर्गत रस्त्यासाठी ५० लाख, पडेगाव अंतर्गत पोलिस काॅलनी रस्त्यासाठी ४५ लाख, गणेशनगर ड्रेनेजलाईनबाठी ३० लाख, जुने पडेगाव सिमेंट रस्त्यासाठी ३० लाख, पाटोदा ते गंगापुर नेहरी सिमेंट रस्त्यासाठी ६० लाख, पैठणरोड ते खंडेवाडी ते नगररोड सिमेंट रस्त्यासाठी १२ कोटी , देवळाईरोड ते चंद्रसेननगर सिमेंट रस्त्यासाठी ५० लाख, माळीवाडा येथील सिमेंट रस्त्यासाठी व सामाजिक सभागृहासाठी ४० लाख, दौलताबादगाव अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी ६० लाख , गोलवाडी गाव अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी, सातारा परिसरातील केसरनगरी, निरंजननगर, आभुषनपार्क विजयंतनगर, आलोकनगर येथे भुमिगत गटारीसाठी ४५ लाख, देवळाई परिसरातील सारासिध्दीनगरातील ड्रेनेजलाईनसाठी २० लाख मंजुर केल्यानंतर यासर्व विकास कामांची सुरूवात करण्यात आली आहे.
तिसगाव गोलवाडी, पाटोदा, माळीवाडा, दौलताबाद, सातारा, देवळाई या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग राहत असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात या भागातील रस्त्यांवरून ये-जा करण्यासाठी अनेक संकटाचा सामना करावा लागत असे. त्यामुळे या भागातील शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या आमदार संजय शिरसाट यांच्याकडे सारखा तगादा राहत असे. शिरसाटांनी पाठपुरावा केल्याने अखेर ही कामे मार्गी लागली.