
मुंबई (Mumbai) : संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलच्या राखीव भूखंडात गैरव्यवहार झाला असून याबाबत येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना जाब विचारणार आहे. मंत्री संजय शिरसाट यांची कंपनी नोंदणीकृत नसताना त्यांना टेंडर कशाप्रकारे मिळालं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला.
मंत्री संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेंद्रा एमआयडीसीच्या ट्रक टर्मिनलसाठी राखीव ५ एकर भूखंडाचे आरक्षण हटवून, तो प्लॉट आपल्या मुलाच्या कंपनीला 'कॅमिओ डिस्टिलरीज' 'Cameo Distilleries Pvt. Ltd.' ला देण्याची अवैध प्रक्रिया राबवल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. शेंद्रा एमआयडीसीमध्ये २ भूखंड ट्रक टर्मिनलसाठी राखीव ठेवण्यात आले होते. एक भूखंड ४२००० चौरस मीटर (२५० ट्रक उभे राहतील इतक्या क्षमतेइतका) आणि दुसरा भूखंड २१२७५ चौरस मीटर (७०-८० ट्रक क्षमतेइतका) आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये येणाऱ्या उद्योगांना दुसऱ्या भूखंडाची गरजच नाही, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या गळी उतरवले आणि त्यांचे ट्रक टर्मिनलसाठी असलेले आरक्षण हटवले. ही जागा ६.९ कोटींना खरेदी केली.
'कॅमिओ डिस्टिलरीज' Cameo Distilleries' कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२२ ला झाली. जून २०२२ ला सिद्धांत शिरसाट यांनी भूखंडासाठी अर्ज केला. यासाठी १०५ कोटींच्या भांडवली प्रकल्पाचे प्रस्तावित मॉडेल होते. २६.४७ कोटी स्वतःचे भांडवल आणि ७९.४२ कोटी बँकेकडून कर्ज घेण्यात आले. पत्नी विजया शिरसाट यांचे उत्पन्न २५ लाख असूनही, त्यांना ५.६५ कोटी युको बँकेकडून कर्ज मिळाले. त्यामुळे दानवे यांनी शंका उपस्थित केली. सिद्धांत शिरसाट यांनी स्थापन केलेल्या कंपनीत ३ मूळ डायरेक्टर हे सिद्धांत शिरसाट, विजया शिरसाट (पत्नी), अमिन भावे (बिल्डर) हे इतकेच आहेत. या प्रकरणानंतर भावे यांनी नंतर राजीनामा दिला. आता कंपनीचे फक्त २ संचालक विजया आणि सिद्धांत आहेत. मुळात या कंपनीची नोंदणी झाली नसल्याचा आरोपही दानवे यांनी केला. महाराष्ट्रात मद्य निर्मितीमध्ये छत्रपती संभाजीनगर अव्वल स्थानावर आहे. याच मद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या वस्तू व उत्पादन निर्मितीसाठी 'कॅमिओ डिस्टिलरीज' ची स्थापना करण्यात आल्याचा आरोपही दानवे यांनी केला. त्यामुळे ही जमीन देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.