Sambhajinagar : संभाजीनगरातील रस्ते का बनले मृत्यूचे महामार्ग? कंत्राटदाराकडून नियम मोडून खोदकाम अन्...

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगर नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत मुख्य शुद्ध गुरूत्व वाहिनी व वितरण वाहिनी टाकताना जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराकडून नियम धाब्यावर ठेवत रस्त्याची खोदाई केली जात. यामुळे शहरभरातील रस्ते मृत्यूचे महामार्ग बनले असून खोदकामामुळे मुख्य व अंतर्गत रस्तेच  बंद करण्यात आल्याने धूळ आणि खड्ड्यांमुळे नागरीक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मात्र याकडे संबंधित यंत्रणांनी डोळ्यांवर पट्टी बांधून दुर्लक्ष केले जात आहे.

शहर वाहतूक शाखेकडे सलग दोन दिवस पिच्छा पुरवत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला खोदाईसाठी दिलेला परवाना मोठ्या शिताफीने मिळवला असता कंत्राटदार कशा पद्धतीने मनमानी पणे खोदकाम करत आहे. ते आजच्या तिसऱ्या भागात उघड करत आहोत.

Sambhajinagar
Nagpur ZP: मंजूर 256 कोटी पण मिळाले फक्त 45 कोटी; ग्रामीण भागातील विकासकामांना फटका

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत छत्रपती संभाजीनगरवासीयांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत मुख्य शुद्ध गुरूत्व वाहिनी व वितरण वाहिनी टाकताना शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्तांनी दिलेले नियम धाब्यावर ठेवत कंत्राटदार जीव्हीपीआर इंजिनिअर्स लि. कंपनीकडून रस्त्याची खोदाई केली जात आहे. यामुळे मुख्य व अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा त्रास सर्वसामान्य नागरिक, आजारी रुग्ण, गरोदर माता, चाकरमाने व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

धक्कादायक म्हणजे ज्या भागात जलवाहिनीसाठी रस्त्यांची खोदाई केली जाणार आहे, त्यासंदर्भात नागरिकांच्या माहितीसाठी स्थानिक वर्तमानपत्रात संबंधित कंत्राटदाराकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने माहिती प्रसारित करणे बंधनकारक आहे. रस्त्यांची खोदाई करण्यापूर्वी नागरिकांना वाहतुकीसाठी सोयीस्कर पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना अचानक भर दिवसा खोदाईची कामे केली जात आहेत.

विशेष म्हणजे कंत्राटदाराकडून कोणत्या रस्त्यांची खोदाई सुरू आहे, यासाठी वाहतूक शाखेने कोणत्या अटी व शर्ती टाकून खोदाईसाठी परवाना दिलेला आहे, याची माहिती देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नसल्याचा गंभीर प्रकार टेंडरनामाच्या तपासात उजेडात आला आहे.

Sambhajinagar
Nashik : नाशिककरांना 'न्यू इअर गिफ्ट'; 'या' सहापदरी महामार्गासाठी निघाले 275 कोटींचे टेंडर

शहरभरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खोदाईसाठी दिलेल्या परवान्यात शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्तांनी रस्त्यांचे खोदाई करतांना रस्त्याच्या कडेलाच खोदकाम करावे असे नमूद केलेले असताना प्रत्यक्षात रस्त्या़ंच्या मधोमध खोदकाम करून रस्त्यांची वाट लावली जात आहे. एकावेळी एकाच बाजूने खोदकाम करण्यासाठी परवाना असताना कंत्राटदाराकडून एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम सुरू आहे. रस्ता खोदाईसाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी असताना कंत्राटदाराकडून दिवसा खोदाईचे काम सुरू आहे.

रस्ते खोदाई करताना वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. रिफ्लेक्टर, रेडियम कॅट ऑइज व बॅरिकेड्स लावले जात नाहीत. नमूद कामाच्या ठिकाणी खोदाई करताना आणि खोदाईचे काम होऊन जलवाहिनीचे काम संपेपर्यंत सुरक्षारक्षक तैनात करण्यात येत नाहीत, परिणामी सदर रस्ते खोदाईच्या कामामुळे शहरभर वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन रस्ते अपघातासाठी ब्लॅक स्पाॅट बनत चालले आहेत. रस्ते खोदाईच्या ठिकाणी पुरेशी लाईटची व्यवस्था करणे आवश्यक असताना कंत्राटदाराकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. खोदाईसाठी परवानगी दिलेल्या रस्त्यांवरील जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने रस्ते दुरुस्तीची अट असताना कंत्राटदाराकडून ती अट पूर्ण केली जात नाही.

खोदाईचे काम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदाराकडून नजीकच्या पोलिस स्टेशन व शहर वाहतूक शाखेला माहिती देण्यास कंत्राटदाराकडून टाळाटाळ केली जात आहे. विशेषत: खोदकामापूर्वी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला माहिती फलक व वळण रस्त्यांचे बाण दाखवने बंधनकारक असताना कंत्राटदाराकडून ना वळण रस्ते उपलब्ध केले जात आहेत, ना फलक लावले जात आहेत. परिणामी नागरिकांची धांदल उडाली आहे. खोदाई झाल्यानंतर जलवाहिनी टाकण्याचे काम झाल्यानंतर माती ढकलून दिली जात आहे. उर्वरित राडारोडा रस्त्यांवर टाकूणच कंत्राटदाराकडून मोठा हलगर्जीपणा केला जात असल्याने शहरातील प्रत्येक मार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे.

Sambhajinagar
Pune : नव्या वर्षात घरांच्या किमती वाढणार? कारण...

टेंडरनामा प्रतिनिधीने जीव्हीपीआरच्या कंत्राटदार कंपनीला शहर वाहतूक शाखेने खोदकामासाठी दिलेल्या प्रक्रियेची तंतोतंत माहिती घेतली असता अजून अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. खोदाईच्या कामांवर प्राथमिक उपचारासाठी औषधपेटी आणि रूग्णवाहिका, पोलिस स्टेशन व नजीकच्या रूग्णालयाचे व आपत्कालीन व्यवस्थेचे संपर्क क्रमांक लिहीलेला फलक लावणे बंधनकारक असताना कंत्राटदाराकडून कुठेही असे फलक लावण्यात आले नाहीत. शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्तांनी कंत्राटदाराला खोदाईचे काम रात्रीत ठराविक वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असताना मात्र कंत्राटदाराकडून सकाळपासून दुपारपर्यंत व सायंकाळी हे काम केले जात आहे.

शहरातील रस्ते एकाच वेळी दोन्ही बाजूंनी खोदण्यात आल्याने नागरिकांची धावपळ झाली आहे.
खोदाईचे काम करत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर हजर राहणे बंधनकारक असताना एकही अधिकारी हजर राहत नसल्याचे व रस्ता खोदण्याबाबतचे नियम धाब्यावर बसवत रस्ते खोदण्यात येत असल्याचे वास्तव ‘टेंडरनामा’ने उजेडात आणले आहे.

शहरभर दिवसाढवळ्या रस्ते खोदाईच्या कामामुळे अनेकांना रस्ता बंदचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे जीव्हीपीआरच्या या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराकडे सर्वांचेच सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com