
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जिल्हाधिकारी कार्यालय ते टीव्हीसेंटर मार्गावरील डाॅ. सालीम अली उद्यानाची दुरावस्था झाली आहे. हे उद्यान भकास, ओसाड दिसत असून, याकडे महानगरपालिकेतील उद्यान विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
हे उद्यान महापालिका प्रशासक तथा आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. या उद्यानात G-20च्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेले कारंजा हौदाचे काम अद्यापही रखडलेले आहे. गत काही महिन्यापासून कारंजा हौदाच्या भवती मातीचे ढिगारे टाकल्याने ती अडचण ठरते आहे. येथे नियमितपणे साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचरा साठलेला आहे.
उद्यानातील जॉगिंग ट्रॅकचा काही भाग उखडलेला असून, उद्यानात कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी काचांचा खच पडलेला आहे. कचरा टाकण्यासाठी लावलेल्या डस्टबीनचा 'कचरा' झालेला आहे. दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, सुरक्षा रक्षकांचा अभाव, ना झाडांची ना खेळण्यांची देखभाल, ना छाटणी ना हिरवळ ना स्वच्छता, त्यामुळे डाॅ. सालीम अली उद्यान भकास ओसाड दिसत असून या उद्यानाकडे महानगरपालिकेतील उद्यान विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक वर्षांपासून उद्यानात काॅंक्रिटने साकारलेला भव्य फ्लाॅवर पाॅट फुटलेला आहे. उद्यानात प्रवेश करताना समोरच दिसत असलेला हा फुटलेला फ्लाॅवर पाॅट उद्यानाची शोभा घालवतो आहे. तरी देखील अद्याप कोणीही त्याची दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून येत नाही.
छत्रपती संभाजीनगरात सिध्दार्थ उद्यान हे एकमेव मोठे उद्यान आहे. सिडको - हडकोतील उद्यानप्रेमींना परिवारासह उद्यानाचा आनंद लुटताना वाढत्या प्रवासाचा खर्च न परवडणारा आहे. जवळच डाॅ. सालीम अली पक्षी अभयआरण्य त्यामुळे पक्षी निरीक्षण करण्यासाठी येणाऱ्यांची सोय व्हावी तसेच सिडको - हडकोवासीयांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी तत्कालीन सिडको प्रशासनाने पुढाकार घेत या उद्यानाची सोय केली. पण सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाले अन् उद्यानाची दुरावस्था झाली.
डाॅ. सालीम अली सरोवराच्या पश्चिमेला ज्या प्रमाणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, झेडपी सीईओ, महापालिका प्रशासक तथा आयुक्त यांचा विचार करून सरोवराच्या काठावरील सर्व गोष्टींची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन व्हीआयपींच्या आरोग्याचा विचार करता व्हीआयपी मार्गावर दिल्ली गेटलगत छोटेखानी उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्या धर्तीवर तातडीने डाॅ. सालीम अली उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात यावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय किर्तीचे पक्षीमित्र डाॅ. सालीम अली यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाच्या सौंदर्यात भर पडेल.