Sambhajinagar : चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या 'या' ऐतिहासिक वास्तुंचे रूपडे पालटणार

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : दोन हजारांहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात चारशे वर्षांहून अधिक देदिप्यमान इतिहास असलेल्या ५२ दरवाजांची तटबंदी असल्याची ओळख होती. परंतु महापालिकेसह राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात प्रत्यक्षात २१ दरवाजे शिल्लक आहेत. यातील रस्ते रूंदीकरणात काही दरवाजे आणि तटबंदीचा बळी घेतला गेला. आजघडीला शहरात फक्त १३ दरवाजे शिल्लक आहेत. त्या काळात चुना आणि दगड वापरून बांधलेले हे दरवाजे आजही भरभक्कम आहेत. मात्र शेकडो वर्षे ऊन, पाऊस, वारा झेलल्यामुळे त्यांची झीज झाली. काही दरवाजे आता शेवटच्या घटका मोजत आहेत.

Sambhajinagar
Mumbai : मुंबईकरांसाठी Good News! 'या' ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क

'टेंडरनामा'ची भूमिका

आहेत ते दरवाजे व त्याच काळातले पूलही दुरुस्त करण्याची गरज असल्याचे "टेंडरनामा"ने  सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करून वाचा फोडली. त्यानंतर शहरातील सोनेरी महल, मकई गेट आणि दिल्ली दरवाजाच्या दुरूस्तीसाठी तब्बल ५ कोटी ३७ लाख ९८ हजार ९२२ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या ऐतिहासिक स्मारकांच्या दुरूस्तीसाठी ४ मार्च रोजी टेंडर काढले असून आतापर्यंत सहा कंत्राटदारांनी सहभाग नोंदवल्याचे पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या बांधकाम विभागाच्या २८ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयातील अटी व शर्तीनुसार टेंडर प्रक्रिया राबवल्याचे अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. ‘पिकतं तिथं विकत नाही’ असे म्हणतात. ही म्हण येथेही लागू होते. कारण छत्रपती संभाजीनगर शहरातील या जुन्या दरवाजांचे शहरवासीयांना कधी अप्रूप वाटत नाही. कारण येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून हे दरवाजे पाहिलेले असल्याने त्यात त्यांना विशेष काही दिसत नाही. मात्र हेच जुने दरवाजे विदेशी पर्यटक अगदी जवऴून न्याहाळतात. ते त्या काळातील शिल्प अन् वास्तुकलेचा अभ्यास करून जातात. परदेशातील हजारो नागरिकांकडे आपल्या शहरातील दरवाजांची छायाचित्रे आहेत. गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या काही दरवाजांची दुरुस्ती निधीचे रडगाणे गात महापालिकेने कधी केलीच नव्हती. पण काही दरवाजांची गत दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून जवळपास साडेतीन कोटी रूपये खर्च करून केलेली डागडुजी पुन्हा फिकी पडली. त्याची महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांच्याकडून साधी चौकशी होऊ शकली नाही.

Sambhajinagar
Sambhajinagar : 15 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 'तो' रस्ता होणार वाहतुकीसाठी मोकळा

शहरात आज पैठणगेट, जाफरगेट, भडकलगेट, कटकटगेट, दिल्लीगेट, काळा दरवाजा, नौबत दरवाजा, बारापुल्लागेट, रोशनगेट, रंगीन दरवाजा, मेहमूद दरवाजा, हत्ती दरवाजा, शाहनूर दर्गा गेट, मकाईगेट हे दरवाजे दिसतात. त्यावर जी नावे लोखंडी अक्षरात कोरली गेली, त्याप्रमाणेच दरवाजांची कायमची ओळख निर्माण झाली. शहरातील आजघडीला बहुतांश दरवाजे महानगरपालिकेने रस्त्याच्या मध्यभागी घेतले आणि त्यांच्या बाजूने रस्ते तयार केले. त्यामुळे त्या दरवाजांची झीज कमी होते. तसेच वाहने धडकण्याचा धोका नाही. उदा.कटकटगेट, दिल्लीगेट, रंगीन दरवाजा, पैठणगेट, नौबत आणि बारापुल्ला या दरवाजांच्या बाजूने रस्ते काढल्याने त्यांची डागडुजी करणे सोपे झाले. त्यांचे संरक्षित वास्तू म्हणून जतन करण्यात येत आहे. मात्र काही दरवाजांचा आजही रहदारीसाठी वापर होतोय. त्यांना पर्यायी रस्ताच नाही. उदा. मेहमूद दरवाजा (पाणचक्की), मकाईगेट, काळा दरवाजा या दरवाजातून आजही रहदारी सुरू आहे. वाहनांची वाढती संख्या या दरवाजांना मोठा धोका निर्माण करत आहे. पाणचक्कीजवळच्या मेहमूद दरवाजाची अवस्था भयंकर आहे. तो कधीही ढासऴू शकतो. दरवाजाखालच्या नाल्यावरील पूलही खचला आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. हा पूल ढासळला तर मोठी जीवित हानी होऊ शकते. हा मार्ग म्हणजे शहरातली अरुंद खिंडच आहे. या खिंडीत दररोज ट्रॅफिक जाम होते. जवळच पाणचक्की असल्याने तेथे पर्यटकांची गर्दी असते. या दरवाजासह पूलही कालबाह्य झाला आहे. त्याला पर्यायी मार्ग तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. मकबर्‍याकडे जाणारे मकाईगेट शहरातील सर्वात सुंदर व मजबूत दरवाजांपैकी एक आहे. गेटच्या खालून खाम नदी वाहते. या ठिकाणी नदीचे पात्र मोठे आहे. आता या नदीचा नाला झाला आहे. जुनी तटबंदी अजूनही दिसते. पण दरवाजाखालचा पूल मात्र खचत आहे. यावर झाडेझुडपे उगवली आहेत.

Sambhajinagar
Sambhajinagar : सुखना नदीवरील पूल बनला धोकादायक; 42 जणांचा बळी गेल्यानंतरही...

टेंडरनामाचा सातत्याने पाठपुरावा

या दरवाजांबाबत सर्वप्रथम आवाज उठवला तो "टेंडरनामा"ने इतिहास तज्ज्ञांकडून शहरातील सर्वच दरवाजांची माहिती घेत, तर कधी हे सर्व दरवाजे वास्तूविशारदांना दाखवत. महानगरपालिकेतील  लोकप्रतिनिधीं, आयुक्त व शहर अभियंत्यांसह पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांसह आमदार खासदारांना दरवाजांविषयी माहिती देत तर कधी राज्य सरकारला पत्र लिहून या दरवाजांची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. "टेंडरनामा"ने शहरातील दरवाजांवर वृत्तमालिका देखील प्रसिद्ध केली होती. त्या वेळी या दरवाजांचा वाली कोण? असा प्रश्न देखील स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका व केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला होतो. दरम्यान केंद्र व राज्य पुरातत्त्व खात्याने शहरातील सर्वच दरवाजे आमच्या अखत्यारीत येत नाहीत. मग महानगरपालिकेने ही जबाबदारी घेतल्यानंतर दरवाजांची डागडुजी सुरू झाली. रोशनगेट, रंगीन दरवाजा, हत्ती दरवाजा, पैठणगेटची डागडुजी चुन्याऐवजी सिमेंटने करण्यात आली.त्यानंतर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून काही दरवाजांचे काम केले गेले. मात्र या कामावर अधिकार्यांनी कोट्यावधीचा चुना लावला. अजूनही सुशोभिकरणाचे काम बाकी आहे. त्यात दिल्लीगेटचे सुशोभीकरणावरही सातत्याने प्रहार केला. मेहमूद दरवाजा, मकाईगेटच्या पुलाचा प्रश्न गंभीर बनलाय. येथील वाहतुककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित मंत्रीमंडळाच्या बैठकीत या पुलांसाठी दिडशे कोटीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रत्यक्षात ही घोषणा कागदावरच आहे.

आता "या" स्मारकांचे रुपडे पालटणार

सोनेरी महल

शहर सौंदर्यीकरणाच्या कामांतर्गत सोनेरी महलसाठी दोन कोटी ९३ लाख १५ हजार ९८८ रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. यात सोनेरी महल परिसराचा संपूर्ण विकास करणे, आतुन बाहेरून चुण्यात प्लास्टर करणे, छतांचे वाॅटर प्रुफींग करणे, प्रकाशझोत व्यवस्था करणे,दर्शनी भागात उद्यान विकसित करणे, संग्रहालयाचा विकास करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

मकई गेट, दिल्ली दरवाजा

मकई गेटसाठी एक कोटी ४६ लाख ३१ हजार ६६८ रुपये तसेच दिल्ली दरवाजासाठी ९८ लाख ५१ हजार२६६ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यात दोन्ही दरवाजांची दुरुस्ती संज्यांच्या छत्र्यांची दुरुस्ती आतुन - बाहेरून गिलावा करणे, छताची वाॅटर प्रुफींग, दरवाजांसमोर उद्यान विकसित करणे व प्रकाशझोत व्यवस्था केली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com