छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जुन्या शहरातील अत्यंत दाटीवाटीत असलेला हा जुना मोंढा जाधववाडी कृषी उत्पन्न समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात यावा, यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार, तत्कालिन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी येथील व्यापाऱ्यांना सात वर्षांपूर्वी तंबी दिली होती. सात दिवसांत बाजारपेठ हलवा अन्यथा कारवाईचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र अद्याप किराणा व्यापाऱ्यांनी तिकडे स्थलांतर केले नाही.
जुना मोंढा येथे येणारे मालट्रक इतर वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे अनेकदा भांडणे होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊनच अमितेशकुमार आणि ओमप्रकाश बकोरिया यांनी जुन्या मोंढ्याची पाहणी केली होती. ज्या व्यापाऱ्यांना जाधववाडी येथील नव्या मोंढ्यात गाळे मिळाले आहेत त्यांनी तेथे स्थलांतरित व्हावे असे आदेश दिले होते.मात्र येथील व्यापाऱ्यांनी आदेशाची पुर्तता केली नाही.जुन्या मोंढ्यात दिवसाढवळ्या शहराच्या मध्यवर्ती भागातून घुसखोरी करणार्या मालट्रकांमुळे वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. १९९८ मध्ये जाधववाडी येथे मार्केट यार्डला मान्यता मिळाली. जुना मोंढा डी नोटिफाइड एरिया म्हणून घोषित करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी जाधववाडीत दुकाने हलवली. मात्र शंभरपेक्षा अधिक मोठ्या व्यापाऱ्यांनी जुना मोंढा सोडलाच नाही.
प्रकरण न्यायालयात
या विरोधात एका व्यापाऱ्याने २००५ मध्ये उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने जुन्या मोंढ्यातील व्यापार बंद करून तो जाधववाडीत स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी राजकीय हस्तक्षेप झाल्याने जुना मोंढा स्थलांतरित होऊ शकला नाही. तब्बल १८ वर्षांनंतर जुन्या मोंढ्यातील दुकान हलवण्याचे आदेश अमितेशकुमार व बकोरिया यांनी दिले होते.एवढेच नव्हे तर दिवसा व रात्री मालट्रकांना बंदी केलेली असताना मनमानी पद्धतीने बंदी उठविल्याचे दिसत आहे. या बाजारात हजारो क्विंटल अन्नधान्य, किराणा, मसाल्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. वाहनांच्या गर्दीमुळे हजारो नागरिकांना मोंढ्यातील रस्त्यांचा वापर करता येत नाही. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही ही बाजारपेठ सुरू आहे. सिंघम फेम परिचित असलेल्या तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार व महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या ठोस कारवाईचे आदेश कागदावरच राहिले. मुळात जाधववाडीतील गाळे जुन्या मोंढ्यातील व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र बरेच जण जुन्या मोंढ्यातच ठाण मांडून असल्याने ४०० गाळे बंद आहेत. परिणामी बाजार समितीचे उत्पन्नही घटले आहे. एकाच ठिकाणी बाजारपेठ झाल्यास सर्वांच्याच फायद्याचे होणार आहे.
जाधववाडीतील गाळ्यांची दुकानदारी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जुन्या मोंढ्यातील व्यापार्यांना जाधववाडीत चारशे गाळे दिलेले आहेत.मात्र असे असताना बर्याच व्यापार्यांनी जुन्या मोंढ्यातच ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे. परिणामी जुन्या मोंढ्यातील वाटप केलेले गाळे बंद तर काही गाळे व्यापार्यांनी परस्पर भाड्याने देऊन दुकानदारी सुरू केली आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक जावक कमी असल्याने उत्पन्नही घटले आहे. जाधववाडीत बाजारपेठ स्थलांतरित केली तर एकाच ठिकाणी बाजारपेठ झाल्यास सर्वांच्याच फायद्याचे होणार आहे.मात्र जाधववाडीत सुरक्षा नसल्याचे व मागील काळात काही व्यापार्यांना मारहाणीचे व खुनाचे प्रयत्न तसेच तेथे चोऱ्या होत असल्याच्या धास्तीने व्यापारी नकार देत असल्याचे कारण जुन्या मोंढ्यातील व्यापार्यांनी स्पष्ट केले. नव्या मोंढ्यात सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस चौकी देण्यात येईल.असे पोलिस प्रशासन म्हणत असले, तरी किती वेळ तिथे पोलिस बसतात, किती वेळ जाधववाडीत पोलिस गस्त घालतात हे तेथील वार्षिक गुन्ह्याची आकडेवारीचा तपास करून मग व्यापाऱ्यांना स्थलांतराचा आग्रह धरावा . तेथे रस्ते, पाणी, स्वच्छतागृहाची धड व्यवस्था नसल्याचेही कारण व्यापाऱ्यांनी पुढे केले.