Sambhajinagar : मृत्यूनंतरही वाट बिकट; स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम बंद

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या ४५ वर्षांपासून लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभूमी ते एमजीएम या रस्त्याची वाट खडतर आहे. या खडतर वाटेतील  प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तातडीने लक्ष्मणचावडी ते कैलासनगर स्मशानभूमीपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू केले. मात्र, रस्त्यावर अतिक्रमण आणि विद्युत खांबांचा अडथळा येत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराने काम थांबवले आहे. परिणामी ही वाट अधिक बिकट झाल्याने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना कैलासनगर स्मशानभूमीपर्यंत कमरेएवढय़ा पाण्यातून वाट काढावी लागत आहे. आधीच रस्त्याची स्थिती आणि त्यात या मार्गावर अतिक्रमणांचा वाढलेला विस्तार यामुळे स्मशानातील ओट्यांपर्यंत पोहचण्याची वाटच बंद झाली आहे. पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी रस्त्यावरच साचत असल्याने अत्यंत कसरतीने मार्ग काढावा लागत आहे. स्मार्ट सिटी व महापालिका प्रशासनातील कारभाऱ्यांचा असमन्वय असल्यानेच या महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

Sambhajinagar
Nagpur : पुलावर रस्ता चकाचक अन् पुलाखाली खड्डेच खड्डे

थोड्याशा पावसामुळे हा मार्गच बंद होऊन अंत्यविधीसाठी नागरिकांना कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. दोन महिन्यापूर्वी ठेकेदाराने लक्ष्मण चावडी ते कैलासनगर स्मशानभुमीच्या दिशेने काम सुरू केले. मात्र अर्धवट कामामुळे स्मशानभूमीचा रस्ताच अरूंद झाला आहे. एका बाजुने उंचवटा आणि दुसऱ्याबाजूने खोलगट भाग झाल्याने अंत्यविधीसाठी जाणार्या नागरिकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. रस्ताच अरूंद त्यात ठेकेदाराच्या अर्धवट कामामुळे वाट अडवल्याने या मार्गाचा प्रवास कठीण झाल्याने नागरिकांना कसरतीने मृतदेहासह पाण्यातून मार्ग काढीत स्मशान गाठावे लागत आहे. स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने व आहे, तो मार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत अरुंद व चिखलाचा झाल्यामुळे या रस्त्याशिवाय पर्याय नाही. रस्त्याच्या अर्धवट स्थितीबद्दल 'टेंडरनामा' प्रतिनिधीने पाहणी केली असता या भागातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. परिसरातील लाकडाच्या कारखान्यांनी तसेच ट्रक गॅरेज, फर्शीच्या दुकानांनी व वजनकाट्यावर येणाऱ्या वाहनांनी तसेच इतर लहाणमोठ्या व्यावसायिकांनी महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने रस्त्याच्या दूरपर्यंत आपले प्रस्थ वाढविले आहे. परिणामी वाट अधिक अरूंद बनली आहे.

Sambhajinagar
Nashik : रस्त्यांचा दर्जा टिकवण्यासाठी ZP सीईओंचा मोठा निर्णय; आता दोष निवारण कालावधी...

महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

याच मार्गावर पुरातन स्मशानमारोती मंदिरामुळे ख्याती असलेल्या कैलासनगर ते लक्ष्मणचावडी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच हा रस्ता जालना रस्त्याला समांतर असल्याने सिडको - हडको, अहिंसानगर, सुराणानगर, बायजीपुरा, संजयनगर आदी भागातील लोक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. जवळपास ५० हजाराहुन अधिक वाहने या मार्गावरून दररोज ये -जा करतात. १८ मीटर रूंदी आणि ८०० मीटर लांबी रस्ता बांधकामासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ३ कोटी रूपये मंजुर करण्यात आली. मात्र दोन महिन्यापासून अर्धवट काम सोडून ठेकेदाराने यंत्रणा पसार केली आहे. यामार्गावर पुरातन स्मशानभूमी आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळ असूनही रस्त्याची स्थिती दयनीय आहे.

आठ वर्षापूर्वी शहराची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या जालना रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या रस्त्याला समांतर रस्ता हवा, अशी छत्रपती संभाजीनगरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे. हीच मागणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात उचलून धरली होती. जालना रोडला समांतर रस्ता असावा असे १९७१ च्या विकास आराखड्यातच स्पष्ट करण्यात आले होते, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. वरद गणेश मंदिर ते एमजीएम असा एक समांतर रस्ता जालना रोडवरील ताण कमी करण्यासाठी देण्यात आला आहे. मात्र, महापालिकेची इच्छाशंक्तिच नसल्याने तो रस्ता अद्याप होऊ शकला नाही.

Sambhajinagar
'Mumbai-Goa Highway'तील भ्रष्टाचाराची न्यायाधीशामार्फत चौकशी करा; कोणी केली मागणी?

विकास आराखड्यातील नियोजनानुसार वरद गणेश मंदिरापासून समर्थनगर, सिल्लेखाना, खोकडपुरा, लक्ष्मणचावडी, पुढे कैलासनगर, बसैयेनगर ते थेट एमजीएम असा रस्ता ठेवण्यात आला. गरजेनुसार वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडीपर्यंत हा रस्ता तेव्हाच झाला. मात्र लक्ष्मण चावडी, कैलासनगर, बसैयेनगर ते एमजीएम हा रस्ता होऊच शकला नाही. लक्ष्मण चावडीपासून पुढे एमजीएमपर्यंत रस्ता आहे याची कल्पना अनेक नागरिकांना २०१२ पर्यंत नव्हती. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली तेव्हा याची माहिती अनेकांना समजली. डॉ. भापकर यांनी लक्ष्मण चावडी ते कैलासनगर हा रस्ता रुंद केला.यातील काही मालमंत्ताधारकांना पर्यायी भुखंड दिले. मात्र भुखंड लाटणाऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करत दुकानदारी थाटली आहे. सदर अतिक्रमण न काढताच स्मार्ट सिटीने रस्त्याचे काम सुरू केले. बसैयेनगर येथे रस्त्यावर थेट बांधकामे असल्यामुळे वाद न्यायालयात गेला. यातील काही बांधकामे पाडली गेली, परंतु तरीही आजघडीला काही  बांधकामे थेट रस्त्याच्या मधोमध उभी आहेत. ती पाडली तर रस्ता मोकळा होणार आहे. याशिवाय रस्त्याच्या मधोमध  खांब काढल्याशिवाय रस्ता रुंद होऊ शकत नाही. बांधकामे पाडणे पालिकेला शक्य आहे, परंतु बांधकामधारक जेव्हा भूसंपादन मोबदला मागतील तेव्हा आजघडीला दहा कोटी रूपये मोजावे लागतील. त्यानंतर खांब काढण्यासाठी महावितरण कंपनीला सुमारे एक ते दिड कोटी रुपये द्यावे लागतील.

हा रस्ता एकाच वेळी रुंद झाला, त्यावरून वर्दळ म्हणजेच वाहतूक सुरू झाली तर येथील व्यापार वाढेल याकडे स्थानिक मालमत्ताधारकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आठ वर्षांपूर्वी अतिक्रमणे व खांब तसेच ठेऊन बसैयेनगर ते मोतीवालानगर पर्यंत पुढील टप्प्यातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. आता हा रस्ता देखील सध्या केवळ धुळीने माखला आहे.  यावरून फारसे वाहनधारक जात नाहीत. जे जातात ते मध्ये थांबत नाहीत. परंतु लक्ष्मणचावडी ते थेट एमजीएममधून मजीप्राच्या कार्यालयापर्यंत रस्ता मोकळा तसेच चकचकीत झाला तर वाहनधारक थांबतील अन् व्यापारवृद्धी होईल पण याकडे महापालिकेचे दुर्लक्ष  होत आहे. या  १८ मीटर रस्त्याचे रुंदीकरण बहुतांश ठिकाणी शिल्लक आहे. हे रुंदीकरण झाले तर वरद गणेश ते एमजीएम हा रस्ता मोकळा होईल. लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा रस्ता पूर्ण झाला तर औरंगपुरा, शहागंज, पानदरिबा, राजाबाजार तसेच शहराच्या जुन्या भागाकडून सिडकोकडे जाणारी वाहने जालना रस्त्यावर येणार नाहीत. ती एकतर सेव्हन हिल्स येथे जालना रस्त्यावर येतील किंवा मध्यवर्ती जकात नाक्यामार्गे पुढे सिडकोकडे जातील. त्यामुळे किमान ४० टक्के वाहने जालना रस्त्यावरून कमी होतील. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com