
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गेल्या दहा वर्षांपासून धुळखात पडलेली महापालिकेच्या सिडको एन-८ येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डनमधील बालगोपाळांची रेल्वे लवकरच धावणार आहे. (E.O.I) अर्थात स्वारस्य अभिव्यक्तिद्वारे हा उपक्रम सुरू करण्याचा मानस महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला आहे. सोबतच याच उद्यानाला लागून असलेल्या नेहरू बाल उद्यानातील नैसर्गिक तलावाचे सुशोभिकरण करून त्यात बोट चालवणे व बंद अवस्थेतील कारंजे सुरू करण्याचा निर्णय देखील याच उपक्रमातून सुरू केला जाणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
तत्कालीन सिडको प्रशासनाने सिडको एन-८ येथे बाॅटनिकल गार्डनसाठी आरक्षित ठेवलेला भुखंड दुर्लक्षित झाल्याने गेली कित्येक वर्ष येथील भुखंडावर सर्वत्र गाजरगवत पसरले होते. मद्यपी आणि जुगारींच्या वावरामुळे बाॅटनिकल उद्यानाचे ओपन बार आणि रेस्टॉरंट' झाले होते. २००६ मध्ये सिडकोचे महापालिकेत हस्तांतर झाल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त आसिमकुमार गुप्ता यांनी महापालिका निधीतून बाॅटनिकल गार्डनच्या विकासासाठी जवळपास चार कोटी रूपये खर्च करून नाला चाॅयनलिंग सुरक्षाभिंत, मुख्य प्रवेशद्वार, सुरक्षारक्षक खोली, कारंजे हौदाची दुरूस्ती, स्वच्छतागृहे, फुडपार्क व पथदिवे तसेच विविध स्थापत्य विषयक कामे केली. त्यानंतर उद्यान विभागामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, लाॅन व बाड विकसित करण्यात आल्याने उद्यानात पर्यावरणपुरक वातावरण निर्मिती करण्यात आली. यामुळे बाॅटनिकल गार्डनला सिडको-हडको भागाचे वैभव प्राप्त झाले. विविध प्रजातींची झाडे या उद्यानात लावण्यात आली आहेत. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सिडको-हडकोतील किमान दीड ते दोन हजार नागरिक या उद्यानाचा आनंद लुटतात. या उद्यानाची निगा कायम राखता यावी, थोडाफार देखभाल दुरूस्तीचा खर्च वसुल व्हावा, यासाठी १५ ऑगस्टपासून उद्यानात येणाऱ्या ३ ते ११ वर्ष वयोगटातील बालकांसाठी ५ रूपये व पुढील वयोगटातील मुले व नागरिकांना १० रूपये प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय जी. श्रीकांत यांनी घेतला. याला कुणीही विरोध न दर्शवता नागरिकांनी होकार दिला.
बाॅटनिकल उद्यान हे जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांच्या अभ्यासाचा भाग बनावे, असा त्या मागचा उद्देश होता. मात्र, या उद्यानासाठी आरक्षित ठेवलेल्या भुखंडाकडे सिडकोचे पहिल्यापासून दुर्लक्ष झाल्यामुळे अभ्यासाचा दृष्टिकोन मागे पडला होता आणि या उद्यानाच्या आरक्षित भुखंडावर गेली कित्येक वर्ष रानटी झाडाझुडपाआड नको ते उपक्रम होत असल्याने आसपासच्या नागरिकांची मोठी डोकेदुखी झाली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. त्यानं तर तत्कालीन महापालिका प्रशासक आसिमकुमार गुप्ता यांच्या काळात तब्बल चार कोटी रूपये मंजुर केले होते. त्यातून विविध स्थापत्य विषयक कामे केली गेली. हे उद्यान चार भागात विभागले गेले आहे. प्रवेशद्वार आणि त्या बाजूचा परिसर, नेहरू उद्यान, फूडपार्क आणि रेल्वे असे हे चार भाग. उद्यानाचा दर्शनीभागासह सर्वच परिसर चांगला ठेवण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे, उद्यानाच्या आतील भागात कारगिल स्मारक, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या स्थानिक विकास निधीतून लहाण मुलांसाठी खेळणी, ओपण जीम स्टेशन, बंद अवस्थेतील कारंजे पुर्ववत केले गेले. स्थापत्य कामांवर रंगरंगोटी केल्याने उद्यानाचे रूपडे पालटले गेले. घसरगुंडीसह लहान मुलांसाठीच्या खेळण्याची सोय झाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत आहे. येत्या काळात अडगळीत पडलेल्या फुटपार्क दुकानांची दुरूस्ती करून बीओटी तत्वावर लवकरच ती चालविण्यासाठी टेंडर काढली जाणार आहेत. आता गेल्या दहा वर्षापासून बंद अवस्थेत असलेली मिनी ट्रेन सुरू केली जाणार असल्यामुळे बालगोपाळांना उद्यानाचे आकर्षण वाढणार आहे.
सिडको-हडकोसह दूरदूर राहणारे बालगोपाळ आपल्या आई-वडिलांसह सिद्धार्थ उद्यानात जातात, परंतु त्या ठिकाणची रेल्वे देखील केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या आक्षेपामुळे बंद केली होती. मात्र कुठल्याही प्रदुषणविरहित इलेक्ट्रीकल मिनि ट्रेन तेथे पुन्हा जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आल्याने सिध्दार्थ उद्यानात येणाऱ्या बालगोपाळांच्या आनंदात भर पडली आहे. सिडको-हडको भागातील बाॅटनिकल उद्यानात मिनी ट्रेन असावी, असा प्रयत्न मागील दहा वर्षापूर्वी माजी नगरसेविका प्राजक्ता भाले यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त डाॅ.पुरूषोत्तम भापकर व डाॅ. हर्षदीप कांबळे यांच्यासह माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनीही या उद्यानात मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. जिल्हा नियोजन समितीमधून या कामासाठी तीस लाख रुपये मंजूर केले होते. सन २०१२ - १३ या आर्थिक वर्षात रेल्वेच्या कामाचे टेंडर महापालिकेने काढले होते. कंत्राटदाराकडून रेल्वे तयार करून घेतली. मिनी ट्रेनसाठी ८०० फुटाचा ट्रॅक तयार केला गेला. एका इंजिनासह चार बोगीची रेल्वे आल्याने मिनीट्रेनमुळे या उद्यानाचे आकर्षण वाढले होते. मिनिट्रेनसाठी दादरे, भव्य तिकीट घर आणि छोटेखानी स्टेशन उभारण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर मिनी ट्रेन धावलीच नाही. यासर्व कामासाठी तब्बल ७० लाख रूपये खर्चही गुंतुन पडला. पण मिनिट्रेन धावलीच नसल्याने परिणामी बालगोपाळांचा हिरमोड झाला. पुढे कंत्राटदाराचे बिल थकल्यामुळे रेल्वे सुरू होऊ शकत नाही असे कारण पुढे केले गेले. मिनीट्रेनचे काम २०१४मध्ये पुर्ण झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या उद्यानातील रेल्वे सुरू होऊ शकलेली नाही. रेल्वे तिकीट घर, रेल्वे रूळ, चार डबे आणि इंजिन दहा वर्षांच्या काळात गंजून गेले आहेत. मात्र आता हा उपक्रम जी. श्रीकांत यांनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सिडको-हडकोत आनंदाचे वारे वाहत आहेत.