Sambhajinagar : व्हीआयपींसाठी रंगरंगोटीवर कोट्यवधींची उधळपट्टी; शहरातील पायाभूत सुविधांचे काय?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगरातील महानगरपालिका हद्दीतील ९ झोनमधील ११५ वार्डातील नागरिक विविध समस्यांनी हैराण असून त्या सोडविणे आवश्यक आहे. मात्र मराठवाडा मुक्तीदिनाच्या अमृतमहोत्वाच्या नावाखाली केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी तेही फक्त व्हीआयपी मार्गावर विविध ठिकाणी सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून रंगरंगोटीची कामे करण्यात येत आहेत.

विशेषतः जी - २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील याच मार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी केली होती. आता पुन्हा त्याच ठिकाणी रंगरंगोटी व डागडुजीचा खाबुगिरी उद्योग महापालिका कारभाऱ्यांमार्फत सुरू आहे. जुनीच कामे नव्याने कागदावर दाखवली जात आहेत. नवीन व जुन्या शहरातील विविध भागातील अंतर्गत समस्या तशाच ठेऊन शहरात केवळ व्हीआयपी मार्गावरच रंगरंगोटी करून महापालिका प्रशासन, सत्ताधारी आणि अधिकारी छत्रपती संभाजीनगरवासियांची थट्टा करत असल्याचे या उधळपट्टीतून समोर येत आहे.

Sambhajinagar
Nashik : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारकडून महापालिकेला मिळणार मोठे गिफ्ट

शहरातील हजारो समस्या सोडविण्याऐवजी रंगरंगोटी आणि दुभाजक तसेच सौंदर्य व वाहतूक बेटांची निर्मिती अन् विद्युत रोषणाईसाठी केवळ शहरातील व्हीआयपी या एकाच मार्गावर अधिकारी खर्च करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

छत्रपती संभाजीनगरकर अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. त्या सोडविण्याचे तर दुरच उलट महापालिका नको त्या योजनांवर खर्च करत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिका मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या रंगरंगोटीच्या नावाखाली केवळ मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरात दाखल होणाऱ्या मंत्रिमहोदया आणि व्हीआयपींना शहर स्वच्छ व सुंदर तसेच आकर्षक दिसावे यासाठी सरकारी अनुदानातून मिळणाऱ्या ४० कोटीची उधळपट्टी करत नागरिकांची थट्टा करत आहे. 

जी - २० च्या रंगरंगोटीवरच सध्या कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्याचा दिखावा सुरू आहे. जालनारोड, जळगावरोड मध्यवर्ती बसस्थानक ते हर्सुल मार्ग वरून शहर स्वच्छ दिसेल मात्र शहरातील अंतर्गत समस्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचे हे चित्र कायमचेच आहे. महापालिका प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी अशा कामांना मंजुरी देऊन चुकीच्या कामांना खतपाणी घालत असल्याचा आरोप केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील नागरिक विविध समस्यांनी हैराण झाले आहेत. त्या सोडविण्याकडे महापालिका सत्ताधारी आणि अधिकारी उदासीन दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला महापालिका, लोकसभा व विधानसभा आदी आगामी निवडणुकींच्या तोंडावर होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी एक नव्हे तर तब्बल चाळीस  कोटी रुपयांच्या कामाला विनाकारण परवानगी दिली जात आहे. सहा महिन्यांपुर्वी जी - २० परिषदेनिमित्त शहरात आलेल्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी तब्बल ५० कोटींचा चुराडा करण्यात आला होता.

Sambhajinagar
Nashik : पुलाचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल ठेकेदाराला साडेसात कोटींचे बक्षीस?

टेंडरनामा प्रतिनिधीने सलग दोन दिवस शहरातील व्हीआयपी मार्गांची पाहणी केली असता जी - २० च्या पार्श्वभूमीवर झालेल्या रंगरंगोटी केलेल्या कामांवरच आता व्हाईट रंग दिला जात असल्याचे दिसून आले. दरम्यान येथील नागरीकांनी समस्यांच्या गाऱ्हाण्यांचा डोंगरच उभा केला. शहरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. दरवाजे निखळून पडले असल्याने महिलांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तुंबलेले नाले काढण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. शहरभर ड्रेनेज तुंबलेले असून त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे साथीचे आजार शहरात वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. शहरभरातील नाल्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. शहराचा चारही बाजुने विस्तार वाढत आहे. त्यानुसार रस्ते, पथदिवे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.

शहरातील लोककला उद्यान व कवितेची बाग सुकलेली आहे. महापालिका कर्मचारी निवासस्थांने व रूग्णालये समंस्यांचे कोंडवाडे तयार झाले आहेत. शहरातील अरूंद चौकांमुळे चौकाचौकात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्याच्या मधोमध पथदिव्याचे आणि महावितरण कंपनीचे विद्युत खांब यमदूत म्हणून उभे आहेत. यामुळे सारखे अपघात होत आहेत. वाहतूक सिंग्नलचे तीनतेरा वाजले आहेत.

अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि अधिकारी नको त्या ठिकाणी पैशाची उधळपट्टी करत आहे. केवळ मंत्री आणि व्हीआयपींसाठी हा देखावा होत आहे. यातून शहरातील समस्यांचे वास्तव चित्र लपवायचा प्रयत्न होत आहे. १९८२च्या दरम्यान महापालिकेत समावेश झालेल्या कांचनवाडी, नक्षत्रवाडी, मिटमिटा, विटखेडा, नारेगाव, हर्सुल, चिकलठाणा, रावरसपुरा आदी खेडे शहर झाली पण या भागात समंस्यांचा कहर आहे. शहरातील स्मशानभूमी आणि शाळांचे खंडहर झाले आहेत. नागरिकांच्या समस्या आणि मूलभूत गरजा याकडे दुर्लक्ष करून रंगरंगोटी करणे हे तर ठराविक भागात भिंती बांधून गरिबी लपवण्यासारखे आहे, असे आरोप नागरिक करत आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com