
औरंगाबाद (Aurangabad) : फुलंब्री तालुक्यातील नायगाव-गणोरी, किनगाव, वारेगाव, बाजारसावंगी मार्गे कन्नड-पाचोरासह शेकडो गावातील ग्रामस्थांना औरंगाबाद व फुलंब्री शहर गाठण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने बारा किमीचा रस्ता तयार करण्यात आला होता; मात्र हा रस्ता तयार करण्यात आल्यानंतर वर्षभरातच उखडला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी लावून धरत हा रस्ता दुरुस्त करून घेतला; मात्र, दुरुस्तीनंतरही काही दिवसातच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रामस्थांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेला १२ किमी रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फुलंब्री उपविभागातील अभियंत्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचा झाला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता नव्याने तयार करून घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
फुलंब्री तालुक्यातील नायगाव ते गणोरी या रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे धाव घेतली होती. गणोरी येथील तीन नद्या वस्तीसह त्यांनी भेट दिली होती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यासाठी निधी देणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. गणोरी ते नायगाव या रस्त्याची व या रस्त्यावर दोन ठिकाणी पुल बांधकाम करण्याची आवश्यकता होती. नदीस मोठा पुर आल्यास या भागात असलेली खटकळी वस्ती व तीन नद्या वस्तीवरील नागरीकांना ये-जा करण्यास मोठे अडचणीचे होत होते. गेल्या कित्येक वर्षांपासुन हा रस्ता व्हावा अशी या वस्तीवरील नागरीकांची मागणी होती. या रस्त्यावर सुमारे ७२ कुटुंबे राहतात. त्यामुळे ग्रामस्थांनी बागडे यांना हा रस्ता येऊन बघावा व येथील नागरीकांच्या समस्या जाणुन घ्या अशी विनंती केली होती.
त्याअनुषंगाने त्यांनी येथील वस्तीवर येऊन रस्त्याची पाहणी केली होती व ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन पुल किंवा रस्ता जे शक्य होईल ते काम करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते व तात्काळ फुलंब्री उप विभागातील अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या.
बागडेंचा पाठपुरावा, प्रयत्नांना यश
बागडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत विशेष दुरूस्ती अंतर्गत रस्त्यासाठी बारा कोटीचा निधी मंजुर करून आणला होता. या बारा किमी रस्त्याचे दोन टप्प्यात डांबरीकरण करण्यात आले होते. मार्गावरील नदी आणि ओव्हळलगत आठ ठिकाणी नळकांडी पुलांचे काम करण्यात आले होते. यात पहिल्या टप्प्याचे काम औरंगाबादेतील कालिका कन्स्ट्रक्शनचे यादव पाटील यांना देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील सहा किमीचा घाट रस्त्याचे काम औरंगाबादचेच रज्जाक सिद्दीकी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. काम मंजुर होऊन चार वर्षाचा काळ लोटला होता. कोरोनाचे दृष्टचक्र आणि निधीअभावी काम रखडले होते. त्यानंतर वर्षभरापूर्वी केलेल्या याकामाचे मात्र सद्य:स्थितीत बारा वाजल्याचे टेंडरनामा पाहणीत समोर आले आहे.