
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : फुलंब्री ते राजूरला जोडणारा पाल फाटा ते राजुर हा राष्ट्रीय महामार्ग ७५२ चा तीन वर्षांपूर्वी केवळ ७० कोटीतून सिंमेटीकरण करण्याचा प्रस्ताव होता; पण तो तेव्हाच रद्द करण्यात आला होता. आता यातील चिखली ते राजुर १० किलोमीटर अंतर कमी करण्यात आले आहे. केवळ पाल फाटा ते चिखली ३७.३६ किलोमीटर अंतर सिमेंटीकरण करण्यात येत आहे. मात्र, यासाठी तब्बल ३५०.७५ लाखाचे अंदाजपत्रक कसे, असा सवाल करताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी ७ मीटर रूंदीत ४६ किलोमीटरपर्यंत डांबरीकरणाचा तो प्रस्ताव होता. त्यात छोट्या व मोठ्या पुलांसह बाॅक्स कन्व्हर्टचा समावेश नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. आताच्या नवीन प्रस्तावात १३ मायनर पुल, ६० सीडीवर्क व १९ बाॅक्स कन्व्हर्ट आणि रस्त्याची रूंदी १० मीटर असल्याने अंदाजपत्रकीय किमतीत वाढ झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते काहीही असले तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार केलेले अंदाजपत्रक हे चुकीचेच असल्याचे सांगितले जात आहे.
फुलंबी ते राजूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ७५२ चा तीन वर्षांपूर्वी सिमेंटीकरण करण्याचा प्रस्ताव होता; पण तो रद्द करण्यात आला होता. ४६ किमी लांबीचा हा मार्ग सिमेंटीकरणात केला जाणार होता. याकरिता संबंधित विभागाने हिरवा कंदील दिला असल्याचा गवगवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्यांनीच केला होता. मात्र नव्याने मंजूर झालेल्या प्रस्तावात चिखली ते राजुर हे १० किलोमीटर डांबरी रस्त्याचे अंतर वगळण्यात आले आहे. तीन वर्षापूर्वी नियतकालीन दुरूस्तीअंतर्गत चिखली ते राजूर रस्त्याची थातूरमातूर दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र सद्य: स्थितीत रस्त्याची अवस्था बिकट असल्याने याच मार्गावर असलेले जगप्रसिद्ध गणपती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात. गडकरींनी पालफाटा ते राजुर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला असूनही केवळ पालफाटा ते चिखली पर्यंतच रस्त्याचे काम केले जाणार आहे. पुढे चिखली ते राजुर गणपती या रस्त्याच्या बांधकामात उल्लेख नसल्याने काही वर्षांपासून दयनीय अवस्थेत असलेल्या चिखली ते राजुर गणपती मार्गापर्यंत वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. या पुर्वीच्या प्रस्तावात पालफाटा ते राजुर गणपती असा रस्ता बांधकामात उल्लेख असताना आता नेमका जगप्रसिद्ध राजुरकडे जाणारा रस्ता का सोडण्यात आला याबद्दल ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही वर्पापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाल फाटा ते राजूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला होता. सद्य:स्थितीत साडेपाच मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. २०२१ मध्ये रस्त्याच्या रूंदीत वाढ करून हा मार्ग सात मीटर रुंदीचा होणार होता. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या कामासाठी ७० कोटींचा प्रस्ताव मंजुरीकरता केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.
उपविभागीय अभियंत्याची शाळा
मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागातीलच एका उप विभागीय अभियंत्याने काही मुठभर ग्रामस्थांना हाताशी धरून छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्ग व फुलंब्री- खुलताबादमार्गाचे सिमेंटीकरण केले जात आहे. या मार्गाचे काम व्यवस्थितपणे झालेले नाही, तसेच अपघात झाल्यावर सिमेंट रस्त्यावर पडल्यावर जखमी होण्याचे प्रमाण अधिक राहते, तसेच वाहनांचे टायर डांबरीपेक्षा सिमेंट रस्त्यावर जास्त घासते. या कारणांची भीती दाखवत वाहनधारकांचा सिमेंट रस्त्याला विरोध असल्याचे भासवत डांबरीकरणाचा घाट घातला. कारण सिमेंट रस्ता एकदा झाला, की अनेक वर्ष देखभाल दुरूस्तीचा मलीदा खायला भेटत नाही. डांबरी रस्ता केला की प्रत्येक पावसाळ्यापूर्वी विशेष देखभाल व नियतकालीक दुरूस्तीतून ठेकेदार आणि अधिकार्यांची सोय होते, असा यामागचा उद्देश असल्याचे या भागातील ग्रामस्थांनी सांगितले. अखेर त्या महिला अधिकार्याने या रस्त्यासाठी डांबरीकरणाचाच घाट घातला होता.
७० कोटीचा प्रस्ताव थेट ३५० कोटींवर
पालफाटा ते राजुर ४६ किलोमीटरपैकी चिखली ते राजुर १० किलोमीटर अंतर कमी करून आता पालफाटा ते चिखली ३७.३६ किलोमीटर लांबी आणि १० मीटर रुंदीसाठी ३५० कोटी ७५ लाखाचे अंदाजपत्रक राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार केले होते. हे काम जालन्याच्या व्ही. पी. शेट्टी आणि कंपनीला देण्यात आले. याकामात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलतभाऊ बी. एम. दानवे भागीदार आहेत. कंपनीने या कामाचे टेंडर ४१ टक्के कमी दराने भरल्याने त्यांना काम देण्यात आले आहे. याकामासाठी त्यांना २९ मार्च २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. तब्बल ४१ टक्के कमी दराने निविदा भरून काम पदरात पाडून घेणार्या कंपनीला या रस्त्यासाठी ३०१ . ७५ कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत.
अधिकाऱ्यांनी अशी दिली कारणे
७० कोटीचा आकडा पाचपट कसा वाढला, असा प्रश्न विचारल्यावर अधिकाऱ्यांनी पुलमोऱ्याचा समावेश असल्याचे व रस्त्याची रूंदी वाढल्याचे कारण पुढे केले. मात्र चिखली ते राजुर १० किलोमीटर लांबी कमी झाली याचे काय, असा प्रश्न विचारल्यावर अधिकाऱ्यांनी पूर्वी डांबरीकरणाचा प्रस्ताव होता आता सिमेंट रस्ता होत असल्याचे कारण पुढे केले. मात्र तरीही काही ठिकाणी केवळ दोन पदरीच रस्ता डांबरीकरणात होणार आहे, मग इतका बजेट कसा, या प्रश्नाचे उत्तर देताना अधिकाऱ्यांची बोबडी वळाली, एकूनच जनतेची दिशाभूल करण्यासाठी अंदाजपत्रकाचा फुगवटा करायचा त्यात मर्जीतल्या ठेकेदाराला अत्यंत कमी दराने टेंडर भरायची हिंट द्यायची आणि पुढे वाटाघाटीत काम सुरू ठेवायचे असाच निस्कर्ष या कामांतून निघतो.
असा होणार महामार्ग
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्या पूर्वेकडे पालफाटा ते चिखली असा हा महामार्ग आहे. या रस्त्यामुळे चिखली, दाभाडी, तळेगाव, पीरबावडा, रिधोरा, कोलते टाकळी, पिंपळगाव, डोंगरगाव कवाड ते पालफाटा यागावातून हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. यारस्त्याचा डीपीआर मुंबईच्या आकार अभिनव कंपनीने तयार केला आहे. दरम्यान दाभाडी , तळेगाव, चिखली, पीरबावडा या गावांपर्यंत चारपदरी सिमेंट रस्ता तयार केला जाणार आहे. उर्वरीत तीन ते चार किलोमीटर अंतरात दोन पदरी डांबरी रस्ता तयार केला जाणार आहे.यामहामार्गावर टोलनाक्याचा देखील समावेश केला जाणार आहे.