
मुंबई (Mumbai) : छत्रपती संभाजीनगर येथील नगर नाका ते केंब्रिज चौक रस्त्याचे नूतनीकरण करणे आणि याठिकाणी भुयारी मार्गाविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र सरकारकडे नव्याने प्रस्ताव पाठवण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य विक्रम काळे, संजय केनेकर यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डी नोटिफिकेशन करून नगर नाका ते केंब्रिज चौक हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभाल दुरुस्तीसाठी दिला असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, हा रस्ता हस्तांतरणापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या दुरुस्तीची 73 कोटींची कामे केली आहेत. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णतः राज्य शासनाकडे हस्तांतरीत केलेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व दुरुस्तीसाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. तसेच शहरातील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे बाह्यवळण रस्ता निर्माण करण्यात आला आहे. तसेच पाडेगाव ते सावंगी रस्त्याच्या डीपीआरच्या प्रक्रियेला गती देण्यात येईल. औद्योगिक क्षेत्राला जोडण्यासाठीही बाह्यवळण मार्गाचा विचार करण्यात येईल अशी माहिती मंत्री भोसले यांनी दिली.