
मुंबई (Mumbai) : लातूर येथे भव्य विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठीची कार्यवाही जलद गतीने करावी. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडापट्टूंसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही टप्प्या-टप्प्याने विकास करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
जिल्हा क्रीडा संकुलाचा पुनर्विकास व लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीस गती देणेबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार अमित देशमुख, क्रीडा व युवक कल्याणचे सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उप जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता टकले उपस्थित होते. क्रीडा मंत्री भरणे म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण व नवीन क्रीडा सुविधा निर्माण करण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करून, मुलभूत सेवांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच प्रेक्षा गॅलरीची उभारणी आणि जुन्या प्रेक्षा गॅलरीस शेड उभारण्यात यावी. यासाठी अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही त्वरीत करावी.
याचबरोबर नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल लातूर येथे उभारण्यात येणार आहे. तसेच इतर विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा अभ्यास करून त्याच धर्तीवर विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भातील कार्यवाही करण्याच्या निर्देशमंत्री भरणे यांनी दिले. आमदार अमित देशमुख यांनी क्रिकेट प्रबोधिनी उभारणे, क्रीडा संकुलाचा रस्ता, अल्पसंख्यांक वर्गातील मुलांचे वसतीगृह यासंदर्भात सूचना केल्या. यासंदर्भात क्रीडा मंत्री भरणे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
खाशाबा जाधव कुस्ती संकुलासाठी १० कोटी-
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने ऑलिम्पिक पदक प्राप्त करून, जगात देशासह राज्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या नावाने कुस्ती संकुल उभारणे अत्यंत अभिमानास्पद असून, यासाठी 10 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तातडीने वास्तुविशारदांमार्फत आराखडा तयार करून बांधकाम सुरू करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात दिवंगत कुस्तीपट्टू खाशाबा दादासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली.
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कुस्ती संकुल उभारण्यासाठी नजिकच्या गावाची हद्द असलेली जमीन वर्ग करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तसेच संकुलासाठी निधी वितरीत करण्यात आला असून, तातडीने बांधकामास सुरुवात करावी. पुढील निधी टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येणार असून, या कामास गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी तालुका संकुल समितीचे सदस्य रणजित खशाबा जाधव, प्रियांका जाधव, भारती जाधव, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तहसिलदार कल्पना ढवळे, उपअधिक्षक भुमी अभिलेख प्रविण पवार उपस्थित होते.