
पुणे (Pune) : पुण्याहून कोलकत्याला जाणे प्रवाशांसाठी महाग ठरणार आहे. (Pune To Kolkata Train Journey Become Costly)
बिलासपूर रेल्वे विभागात सुरू असलेल्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने सहा गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे विमानाच्या तिकिटाचा दर १२ हजार रुपयांपर्यंत गेला आहे.
रेल्वेचा ‘ब्लॉक’ ११ ते २४ एप्रिल दरम्यान असेल. रद्द झालेल्या गाड्यांत पुणे-संत्रागाची गाडीसह हावडा येथे जाणाऱ्या आझाद हिंद व दुरांतो एक्सप्रेसचाही समावेश आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होईल.
दुसरीकडे विमान कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केली आहे. पुण्याहून कोलकत्यासाठी एरवी साधारणपणे पाच ते सहा हजार रुपयांत विमानाचे तिकीट मिळते. रेल्वे ‘ब्लॉक’च्या काळात विमानाचे तिकीट दर दुप्पट झाले आहेत. सध्या हा दर ११ ते १२ हजार रुपये आहे. येत्या काही दिवसांत तो आणखी वाढू शकतो.
बिलासपूर रेल्वे विभागात चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी १३ दिवसांचा ‘ब्लॉक’घेण्यात आला आहे. या दरम्यान पुण्याहून कोलकत्याला जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्या आहेत.
या गाड्यांना प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. प्रवासी उन्हाळी सुट्टीचे नियोजन करून दोन महिने आधीच तिकिटे आरक्षित करतात. अशावेळी रेल्वे प्रशासनाला महत्त्वाच्या गाड्या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची गैरसोय होईल.