Sambhajinagar : नवीन पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीसाठी खोदले 700 किमीचे सिमेंटचे रस्ते

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग आणि रस्ते विभागाने नवीन पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या कंत्राटदार कंपनीला व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी अनेकदा नोटिसा बजावून देखील तसेच वेळोवेळी तोंडी तंबी देऊन देखील कंत्राटदार कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बधत नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे विचारणा केली असता केवळ रस्ते दुरुस्तीसाठी ५४ कोटीची तरतूद असल्याचे मोघम सांगितले जात आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : चिकलठाणा - पिंप्रीराजा शिव रस्त्याची का झाली दुरावस्था? शेतकर्‍यांनी का दिला आंदोलनाचा इशारा?

शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते खड्डेमुक्त, चिखल व‌ धूळ विरहित, चकाचक असावेत यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून तसेच राज्य सरकारच्या निधीतून व महानगरपालिकेच्या डीफर्ट पेमेंट व आमदार, खासदारांच्या निधीतून कोट्यावधी रूपये खर्च करून शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे मोठ्याप्रमाणात विणले.‌ एका किलोमीटर रस्त्यासाठी एक ते दिड कोटी रूपये खर्च केले. किमान दोन ते तीन वर्ष तरी छत्रपती संभाजीनगरकरांना या रस्त्यातून आरामदायी प्रवास मिळावा, असे मानले जात असताना नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल १९९१ किलोमीटरचे रस्ते खोदले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार आत्तापर्यंत शहरात ७०० किलोमीटरचे नवे व जुने सिमेंट रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात अजुन १२९१ किलोमीटर रस्ते खोदून जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे.‌ एकाच वेळी वेगवेगळ्या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे खोदलेले हे रस्ते दुरुस्तीसाठी किती पावसाळे लोकांना प्रतिक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला भरघोस निधी दिला आहे. २०१४-१५ यावर्षी २४ कोटींचा निधी शासनाने महापालिकेला दिला. त्यानंतर २०१६-१७ मध्ये शंभर कोटींचा निधी देण्यात आला. जानेवारी २०२० मध्ये १५२ कोटींच्या निधीची राज्य सरकारने पूर्तता केली. त्यातून महानगरपालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे केली गेली.‌ पहिल्या टप्प्यात पाच, दुसऱ्या टप्प्यात तीस तर तिसऱ्या टप्प्यात २४ रस्त्यांची कामे केली गेली आहेत. जवळपास शहरातील ५९ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून कामे झाली आहेत, त्यानंतर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तब्बल १११ रस्त्यांसाठी ३१७ कोटी रूपयांचा निधी खर्च केला जात आहे. यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. दुसरीकडे महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसेससाठी राखीव निधीची एफ.डी. मोडून काही रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. महानगरपालिका या रस्त्यांसाठी जवळपास पहिल्या टप्प्यात शंभर कोटींची रस्त्यांची कामे उरकत आहे. यात तब्बल ४४ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याला कोणी लावला ब्रेक? कारवाईचे कधी?

तब्बल चाळीस वर्षांच्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. रस्तेदेखील गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते धूळ, चिखल आणि खड्डे विरहित असावेत अशी छत्रपती संभाजीनगरकरांची माफक अपेक्षा होती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत रस्ते बांधकाम विभागाने २०१४ - २०२४  यादरम्यान विविध भागात सिमेंटचे रस्ते, फुटपाथ तयार केले होते. पण, नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी हे सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत.यासंदर्भात टेंडरनामाने वेळोवेळी वृत्तमालिका प्रसिद्ध करून महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे महानगरपालिका पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला वेळोवेळी नोटीसा बजावल्या. बैठकांमध्ये बोलवत संबंधित अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली. मात्र कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी आमचे ऐकत नसल्याचे म्हणण्याची वेळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. विशेषतः शहरातील उखडलेल्या या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी किमान एक हजार कोटीची आवश्यकता असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ५४ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाचे पैसेही अद्याप फिटलेले नसल्याने खोदाईमुळे या रस्त्याचा दोष दायित्व कालावधीही संपुष्टात आला. अगोदर सिमेंटचा रस्ता तयार करणे आणि नंतर जलवाहिनी टाकणे, असा महानगरपालिकेचा उफराटा कारभार देखील समोर आला आहे. आधीच शहरात पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. पाइपलाइन तसेच अन्य सर्व्हिस लाइन्सच्या कामामुळे वारंवार होणारी खोदाई आणि त्यानंतर रस्त्यांच्या दुरूस्तीकडे कानाडोळा केल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातून वाहन चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे शहराशी जोडणाऱ्या मुख्य मार्गांसोबतच  गर्दीच्या प्रमुख रस्त्यांवरील पाइपलाइन, इंटरनेट केबल, ड्रेनेज, पावसाळी गटारे, तसेच वीजवाहिन्यांची कामे मान्सूमपूर्व करणे गरजेचे असताना याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.‌

Sambhajinagar
Mumbai : महानिर्मिती; 600 मेगावॅट सौर प्रकल्पाच्या टेंडरला मुदतवाढ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून‌ ४ फेब्रुवारी २०२१ रोजी कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यावेळी महापालिकेकडून २०२१ मध्ये शहरात समान पाणी योजनेसाठी ज्या ज्या भागात जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे, त्याचा नकाशा करून त्यानुसार आधी जलवाहिन्या टाकाव्यात. नंतर रस्ते करावेत, असा निर्णय झाला होता. मात्र, सुरुवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यानंतर आता अचानक जागे झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या कंत्राटदार जीव्हीपीआरकडून शहरातील मुख्य व अंतर्गत वर्दळीचे रस्ते असतानाही कोणतेही पूर्वनियोजन न करता थेट रस्ते खोदाई सुरू केली आहे. प्रत्यक्षात ही खोदाई सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी माहिती फलक लावणे, बॅरिकेड्स करणे अशा कोणत्याही उपाययोजना न करताच थेट खोदाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जर ही जलवाहिनी महत्त्वाची होती आणि नंतर रस्ता खोदला जाणार आहे याची कल्पना हाेती, तरीही तो डांबरी न करता काँक्रीटचा का करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित कंत्राटदाराला शहरात १९९१ किलोमीटरचे रस्ते खोदाईस परवानगी आहे. हे  रस्ते खोदण्यास अतिरिक्त आयुक्त स्तरावरून परवानी देण्यात आली आहे. नवीन  पाणीपुरवठ्याच्या कामासाठी हे  रस्ते भर पावसाळ्यात खोदले जात आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकर कमालीचे त्रस्त झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com