अवघ्या वर्षभरात कसा उखडला कोट्यवधींचा डांबरी रस्ता?

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : आधी पेठणरोड - कांचनवाडी - नाथ व्हॅली सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट केले.‌ त्यापाठोपाठ आता नाथ व्हॅली - सातारा खंडोबा मंदिर रस्ता वर्षभरात उखडला. या रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे. बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणासाठी खड्डेखोदण्याची व्यवस्था करीत आहे, असा प्रश्न प्रवासी व या मार्गावरील नागरिक विचारीत आहेत.

Sambhajinagar
Nashik News : मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या 'या' नदीजोड प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

कांचनवाडी ते नाथ व्हॅली - सातारा - देवळाई हा शिव रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे कांचनवाडी ते नाथ व्हॅली रस्त्याचे सिमेंट उखडलेले असताना व एका बाजूने लेअर न टाकताच कंत्राटदाराने पलायन केलेले असतानाच नाथ व्हॅली ते सातारा खंडोबा मंदिर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने अल्पावधीत रस्त्याचे बेहाल झाले आहेत.
अवघ्या वर्षभरात रस्ता उखडल्याने नागरिक प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. जनतेच्या खिशातील कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. या रस्त्याची चौकशी करण्यासाठी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केल्याचे चोपडे वस्तीतील नागरिकांनी सांगितले.

सातारा परिसरातील पैडणरोड कांचनवाडी ते सातारा खंडोबा मंदिर रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वर्षभरापूर्वी डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. आधी कंत्राटदाराने सिलकोटचे काम बाकी असल्याचे सांगितले होते. मात्र सिलकोटचा अंतिम लेअर टाकण्यात आल्यानंतरही निकृष्ट बांधकामामुळे रस्त्यावरील डांबर पूर्णत: उखडून रस्त्यावर गिट्टीचा पसारा पडला आहे. वाहन चालकांचा जीव संकटात सापडला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात नित्याची बाब झाली आहे.

बांधकाम विभाग रस्त्याचे बांधकाम करीत आहे की, लोकांच्या मरणासाठी खड्डेखोदण्याची व्यवस्था करत आहे, असा प्रश्न आता वर्षभरातच उखडलेला रस्ता पाहून विचारीत आहेत. रस्त्याची पार चाळणी झाल्याने हा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा मार्ग ठरू पाहत आहे. एकीकडे सातारा - देवळाईकरांना विकासाचे गाजर शिंदे सरकार दाखवत असताना डांबर उखडून अल्पावधीत रस्त्याचे बेहाल झाले आहेत.

Sambhajinagar
ठाणे-कळवा ते कल्याण समांतर रस्ता बांधणार; श्रीकांत शिंदे यांची कल्याणच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट कशी आहे?

सातारा गाव खंडोबा मंदिराला पैठणरोडपासून कांचनवाडी-सातारा-देवळाईला जोडणाऱ्या नाथव्हॅली ते सातारा खंडोबा मंदिर या रस्त्याच्या कामासाठी नगर विकास विभागाने‌ १ कोटी ६८ लाख ६४ हजार १८ रुपये मंजुर केले होते.‌ छत्रपती संभाजीनगरातील रंगनाथराव बाबुराव वरकड यांच्या रुद्रा कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी १.०४ इतक्या कमी टक्के दराने सहभाग नोंदवल्याने त्यांना या कामाचा ठेका देण्यात आला होता. या कामासाठी त्यांना १० मे २०२३ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती.

महापालिकेने या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. कंत्राटदाराने नाथव्हॅली ते सातारा रोड दरम्यान अंदाजपत्रकात डांबरी रस्त्याचा समावेश असताना या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून येथे सखल भागात पावसाचे पाणी साचत असल्याने १२५ मीटर लांबीचा सिमेंट रस्ता केला केला होता तोही पहिल्याच पावसात उखडला. पुढे नाथव्हॅली ते सातारा बटालियन पुलापर्यंत ३.२५ मीटर रूंदीकरण व डांबरीकरण केले आहे. परंतु रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट केल्याने पहिल्याच पावसात रस्ता उखडला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित कंत्राटदाराला नोटीस देखील बजावण्यात आल्याचे कळते.

Sambhajinagar
तगादा : सुरजागड खाण प्रकल्पामुळे वायू प्रदूषण वाढले; पर्यावरण परवानगी रद्द करण्याची मागणी

जनतेच्या घामाच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण वर्षभर नाही तर सहा महिनेही का टिकाव धरत नाही, हा चौकशीचा विषय आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने वर्षभरापूर्वी या  रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. आधी कंत्राटदाराने रस्त्त्याचे बीबीएम केले होते.‌परंतु कारपेट व सिलकोट केले नव्हते. नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर ही कामे पूर्ण केली. त्यानंतरही हा रस्ता अनेक ठिकाणी खड्ड्यांनी बरबटलेला आहे.

सिलकोट, कारपेटमधील व बीबीएममधील खडी उखडून रस्त्यावर पसरलेली आहे. खड्डे इतके खोलवर झाले आहेत की अक्षरश: जुना रस्ता प्रवाशांना दिसत आहे. रस्त्यावरील बीबीएम पूर्णत: उखडला असून निकृष्ट बांधकामाचे पाप लपविण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत असताना बांधकाम विभागाचे अधिकारी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत.

‘अंधेर नगरी, चौपट राजा’सारखी परिस्थिती या मार्गावर दिसून येत असल्याने प्रवाशांमध्ये कमालीचा असंतोष आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्याची वाट लागली आहे. खड्ड्यांमुळे अपघात बळावले होते. या रस्त्याचा दोष निवारण कालावधी १२ महिन्यांचा असताना खड्ड्यांची  डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी या रस्त्यावर अजूनही वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.‌

या रस्त्याच्या गैरप्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर‌ देखील कारवाई करण्यात यावी.‌ शाखा व उप अभियंता यांचे पाठबळ असल्यानेच कंत्राटदाराने कोट्यवधी रुपये खड्ड्यात घातले, असा आरोप केला जात आहे. वर्षभरापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. परंतु बांधकामाच्या वर्षभरातच रस्त्याला खड्डे पडणे सुरू झाले. जुना रस्ता डोके वर काढून डोकावू लागला. खड्ड्यांची संख्या वाढून आज रस्त्याचे बेहाल झाले आहे. बांधकामाचा फटका या रस्त्यावरील सर्व नागरिकांना भोगावा लागत आहे. नागरिकांनी अनेकदा चौकशीची मागणी केली असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाडस न करता पाठबळ दिल्याचे दिसून आले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com