Nashik News : मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या 'या' नदीजोड प्रकल्पाबाबत आली मोठी बातमी; लवकरच...

River Linking Project, Godavari, Damanganda
River Linking Project, Godavari, DamangandaTendernama

Nashik News नाशिक : दमणगंगा (एकदरे) - गोदावरी (वाघाड) या २७५३ कोटींच्या नदीजोड योजनेचा (River Linking Project) सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सादर झाला असून मागील महिन्यात त्याचे या समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. या समितीने या प्रकल्प अहवालात किरकोळ दुरुस्त्या सूचवल्या असून सध्या त्यानुसार बदल करण्याचे काम सुरू आहे.

हे बदल पूर्ण झाल्यानंतर राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून या प्रकल्पास मान्यता मिळून तेथून तो सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे पाठवला जाईल. त्यानंतर राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळणार आहे.

River Linking Project, Godavari, Damanganda
सरकारचा मोठा निर्णय; 'एक राज्य- एक गणवेश'साठी निघाले 126 कोटींचे टेंडर

या प्रकल्पामुळे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाऊन मराठवाड्यातील १३ हजार हेक्टर सिंचन वाढण्यास मदत होणार आहे. कदाचित विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पास राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

पेठ तालुक्यातील दमणगंगा-एकदरे-गंगापूर धरण हा नदीजोड प्रकल्प माजी खासदार हेमंत गोडसे व जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी प्रस्तावित केला होता. या प्रकल्पाच्या व्यवहार्यता सर्व्हेसाठी राज्य सरकारने २०१८ मध्ये निधीही मंजूर केला होता. त्यानुसार या नदीजोडसाठी ३५५० दलघफू पाणी उपलब्ध असल्याचे निश्चित करण्यात आले.

त्या दाखल्यानंतर या नदीजोडचा सविस्तर प्रकल्प तयार करण्याचे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरणकडे देण्यात आले होते. त्याचवेळी हा नदीजोड प्रकल्प एकदरे-गंगापूर असा करण्याऐवजी एकदरे-वाघाड करण्यात आला. यासाठी पेठ तालुक्यातील एकदरे येथे ११०० दलघफू क्षमतेचे धरण बांधले जाणार असून ते पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे दिंडोरी तालुक्यातील झार्ली येथील प्रवाही वळण योजनेत ते सोडले जाणार असून तेथून ते वाघाड धरणात सोडले जाईल.

River Linking Project, Godavari, Damanganda
Sambhajinagar : शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी आदिलाबादहून आणले गर्डर; काम सुरू

वाघाड धरणातून ते पाणी गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात सोडले जाणार आहे. या धरणातून १५० दलघफू पाणी पेठ तालुक्यातील धरणालगतच्या परिसरात सिंचनासाठी राखीव ठेवण्यात येणार असून उर्वरित ३४०० दलघफू पाणी वाघाड धरणातून गोदावरीच्या माध्यमातून जायकवाडी धरणात सोडले जाणार आहे. यामुळे मराठवाड्यात १३००० हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

यावर्षी जानेवारीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर राष्ट्रीय जलविकास अभिकरणने ४ एप्रिल २०२४ रोजी तो राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे सोपवला. मागील महिन्यात या प्रकल्पाचे राज्यस्तरीय तांत्रिक समितीसमोर सादरीकरण करण्यात आले. या समितीने त्यात काही बदल सूचवले असून ते बदल केल्यानंतर पुन्हा एकदा सादरीकरण होऊन त्याला तांत्रिक मान्यता मिळून तो प्रकल्प राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे पाठवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देईल.

असे उचलणार पाणी
दमणगंगा (एकदरे) - गोदावरी (वाघाड) नदी जोड प्रकल्पासाठी पश्चिमवाहिनी दमणगंगा नदीवर ११५० दलघफू क्षमतेचे एकदरे धरण प्रस्तावित आहे. एकदरे धरणातील उपलब्ध होणारे ३५५० दलघफू पाणी ३ टप्प्यामध्ये उपसा पद्धतीने उचलून त्यातील ३४०० दलघफू पाणी दिंडोरी तालुक्यातील झार्लीपाडा प्रवाही वळण योजनेत सोडले जाईल. तेथून ते पाणी प्रवाही पद्धतीने वाघाड धरणात जाईल. त्यापुढे वाघाड धरणातून त्याचा विसर्ग करून मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात प्रवाही पद्धतीने सोडण्यात येणार आहे. या योजनेमुळे मराठवाड्यात १३१६४ हेक्टर सिंचनक्षेत्र निर्मिती होणार आहे.

River Linking Project, Godavari, Damanganda
Tendernama Impact : अखेर 8 वर्षांनंतर 'या' रस्त्यावर पडले डांबर; अवघ्या 3 दिवसांत रस्ता टकाटक

प्रकल्पाची किंमत २७५३ कोटी रुपये
एकदरा-वाघाड नदीजोड प्रकल्प उभारण्याची किंमत १९१०.४७ कोटी रुपये असून उपसा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रकल्पाचा खर्च मिळून या प्रकल्पाची किंमत २३६३.६१ कोटी रुपये होत असून त्यात जीएसटी व इतर बाबींचा समावेश करून या प्रकल्पाची एकूण किंमत २७५३.२६ कोटी रुपये होत आहे.

पाच वर्षांत होणार प्रकल्प
या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची त्यानंतर पाच वर्षांत उभारणी होऊ शकते, असे नियोजन आहे. हा पूर्ण प्रकल्प वनजमिनीवर उभारला जाणार असल्याने त्यासाठी खासगी जमिनीचे भूसंपादनाची गरज नसल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com