छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : टेंडरनामाने जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कंडारी-अंबड-आंतरवाली टेंभी-कोठी या रस्त्याच्या कामात खडीकरण करताना अत्यल्प मुरुम टाकला जात आहे. रस्त्यावर मानकानुसार खडी टाकली जात नाही. रस्त्यावर पाणी मारून ग्रेडींग मशीनने दबाई केली जात नाहीये. थातूरमातूर काम करून कंत्राटदाराचे खिसे भरले जात असल्याचा भांडाफोड करताच विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार तसेच तक्रारदार तात्यासाहेब कळंब यांनी रस्तेकामात भ्रष्टाचार असल्याने कामात भ्रष्टाचाराबाबत केलेल्या चौकशीच्या मागणीनुसार अखेर जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीच्या चौकशी पथकाने शुक्रवारी या संपूर्ण रस्त्याची तपासणी करायला सुरूवात केली आहे. आता हे चौकशी पथक काय अहवाल सादर करणार याकडे संपूर्ण अंबड तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस. बी. गगनबोने, परतुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस. एस. सुगंधे, मंठा येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तायडे, मंठा येथील मग्रारोहयोचे तांत्रिक सहाय्यक पंकज गोरे यांच्या देखरेखीखाली ही समिती रस्तेकामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करून आठ दिवसात जालना येथील पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जालना जिल्हा परिषदेचे मग्रारोहयोचे उपमुख्य कार्यक्रम समन्वयक अंकुश शेळके यांना अहवाल सादर करणार आहे. यामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कंडारी-अंबड-आंतरवाली टेंभी-कोठी या रस्त्याच्या भ्रष्टाचारापाठोपाठ जिल्हापरिषद, पंचायत समितीतील इतर तालुक्यातील कामांबाबत भ्रष्टाचारही समोर येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही चौकशी होऊ नये म्हणून अधिकार्यांनी बरेच वेळखाऊ धोरण अवलंबिले होते. पण "टेंडरनामा"ने थेट छत्रपती संभाजीनगर पासून ८० किलोमीटर दुर जाऊन शेकडो गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची पाहणी केली होती. अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी "तारीख पे तारीख" देत कागदी प्रपंचात चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न केला, पण चौकशी टाळण्यात त्यांना अपयश आले.
घनसावंगी तालुक्यातील मग्रारोहयो अंतर्गत मातोश्री पानंद योजनेंतर्गत रस्त्यांच्या कामांमधील भ्रष्टाचारासोबतच याच योजनेंतर्गत गायीचे गोठे, विहिरी, जलजीवन मिशन व इतर तीनशे कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या कामांची चौकशी करण्याची मागणी आंतरवाली टेंभी येथील प्रगतिशील शेतकरी तात्यासाहेब कळंब यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार घनसावंगी तालुक्यातील कंडारी - अंबड- आंतरवाली टेंभी - कोठी या रस्त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी समितीतील पथकाने घनसावंगी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व अभियंत्याकडून या रस्त्याचा संपूर्ण लेखाजोगा मागवला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री पानंद रस्त्याचे जालना जिल्हा परिषदेने केलेल्या रस्त्यात अल्प मुरुम टाकून रस्त्याचे काम निकृष्ठ होत असल्याची शेतकऱ्यांसह तात्यासाहेब कळंब यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांच्या आदेशाने दोनदा चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र अद्याप चौकशी समिती ठरल्याप्रमाणे रस्त्याच्या तपास कामासाठी न फिरकल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत थेट विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा तंबू ठोकण्याचा इशारा दिला होता .
याप्रकरणी तक्रारदार शेतकऱ्यांनी जाफ्राबाद येथील गट विकास अधिकारी, विभागीय आयुक्त, जालना जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, घनसावंगी येथील गट विकास अधिकारी तथा सह कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर देखील निकृष्ट रस्त्याच्या चौकशीला मुहुर्त लागत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. चौकशी समितीने केलेली टाळाटाळ पाहता या प्रकरणात जालना जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयातून होत असलेल्या मातोश्री पानंद योजनेत अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री पानंद शेत रस्ता या प्रकल्पांतर्गत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कंडारी-अंबड-आंतरवाली टेंभी-कोठी या रस्त्याच्या कामात खडीकरण करताना अंत्यल्प मुरुम टाकला जात आहे. रस्त्यावर मानकानुसार खडी टाकली जात नाहीये. रस्त्यावर पाणी मारून ग्रेडींग मशीनने दबाई केली जात नाहीये. थातूरमातूर काम करून कंत्राटदाराचे खिसे भरले जात असल्याची तक्रार आंतरवाली टेंभी येथील शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. विभागीय आयुक्तांनी या प्रकरणी २ फेब्रुवारी २०२४ चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांच्या पत्राला देखील केराची टोपली दाखविण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ससेमिरा चालूच ठेवल्याने विभागीय आयुक्तांनी ६ मार्च २०२४ रोजी जालना जिल्हाधिकारी यांना या निकृष्ट रस्त्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावर जालना जिल्हापरिषदेने ७ मार्च, १८ मार्च, २६ मार्च, २९ मार्च, ६ मे व ८ मे २०२४ तसेच जाफ्राबादच्या गट विकास अधिकाऱ्यांनी ६ मे व ८ मे २०२४ च्या सुधारीत आदेशाने या निकृष्ट रस्त्याच्या कामात बेजबाबदारपणे काम करणारे घनसावंगी येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल कदम, सहाय्यक गट विकास अधिकारी समाधान शेळके, शाखा अभियंता संजय चित्तारे व कंत्राटदाराची चौकशी करण्यासाठी जालना येथील पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जालना जिल्हा परिषदेचे मग्रारोहयोचे उपमुख्य कार्यक्रम समन्वयक अंकुश शेळके यांनी दोनदा चौकशी समिती नेमली होती. मात्र आधीच्या चौकशी समितीकडे २०२४च्या लोकसभा निमित्त आदर्श आचारसंहिताचे कामकाज असल्याचे कारण पुढे करत नवीन चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.
यात मंठा येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस. बी. गगनबोने, परतुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.एस.सुगंधे, मंठा येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत तायडे, मंठा येथील मग्रारोहयोचे तांत्रिक सहाय्यक महेश बोराडे यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. मात्र बोराडे याला गायगोठा बांधकामासाठी एका शेतकऱ्याकडुन लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने या समितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे टेंडरनामाने उघड केले होते. बोराडे याच्या जागी पंकज गोरे या कनिष्ठ अभियंत्याचा चौकशी समितीत समावेश करण्यात आला. चौकशी समितीने शुक्रवारी विभागीय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे तक्रारदार तात्यासाहेब कळंब यांनी उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून काही शेतकऱ्यांसमक्ष रस्त्याची चौकशी तपासणी सुरू केली. मात्र विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी समितीने मुळ तक्रारदार यांच्यासमक्ष चौकशीचे आदेश असताना चौकशी समितीने तक्रारदाराला अंधारात ठेऊन चौकशी सुरू केल्याचा कळंब यांचा आरोप आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या कामकाजावर संशय बळावत आहे. यावर आता पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मग्रारोहयोचे उपमुख्य कार्यक्रम समन्वयक अंकुश शेळके काय निर्णय घेतात याकडे घनसावंगी तालुक्यातील ग्रामंस्थांचे लक्ष लागून आहे.