छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तहसिलदार रमेश मुंडलोड, उपअधीक्षक भूमिअभिलेखचे निलेश उंडे, मोजणी निरिक्षक सतिश फोलाणे आणि पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, करमाड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पी. एम. नवघरे यांच्या सिंघम फेम कारवाईने अखेर जालना रोडलगत शेकटा या गावांमधील बंधाऱ्यावर एका मुजोर शेतकऱ्याने पिकांची लागवड करून आणि घास लाऊन थेट शेकडो शेतकऱ्यांचा ताबा घेतलेला शेतरस्ता अखेर कडक बंदोबस्तात मोकळा करण्यात आला असून, तब्बल १२ वर्षाच्या लढाईनंतर शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.
जालना रोडलगत शेकटा या गावातील बाबुराव रामभाऊ वाघ या शेतकऱ्याने पिकांची लागवड करून आणि गवत्या घास लाऊन थेट शेकडो शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यावर कब्जा केला होता. यामुळे गट क्रमांक ११९, ६८, ६५, ६७, ६४ या पाच गटातील शेतकऱ्यांचा शेतरस्ताच रस्ताच गायब झाला होता. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने शेकटा येथील रहिवासी छगन विठोबा वाघ यांनी तेरा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त उप विभागीय अधिकारी तसेच तहसिलदारांकडे रस्ता मोकळा करण्यासंदर्भात अर्ज केला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार तत्कालीन तहसिलदारांनी अर्जदाराची दखल घेत तलाठी मंडळ अधिकाऱ्यांमार्फत शेत रस्त्याचा अहवाल देखील मागितला होता. तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बाबुराव रामभाऊ वाघ याने शेकडो शेतकऱ्यांच्या अडवलेल्या रस्त्याची जायमोक्यावर जाऊन पाहणी करत पंचासमक्ष पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याने रस्ता अडविल्याचा पंचनामा करून तहसिलदारांना रितसर अहवाल सादर केला होता. तहसिलदाराने त्यावर रस्ता मोकळा करण्याचे एकदा नव्हे तीनदा आदेश काढले होते. त्यावर मंडळ अधिकाऱ्याने पोलिस बंदोबस्त देखील मागवला. मात्र मुजोर शेतकरी बाबुराव रामभाऊ वाघ याच्या नको त्या उपद्व्यापामुळे आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमकीमुळे अद्याप रस्ता मोकळा झालाच नव्हता. रस्ता अडविल्याने व हक्काच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेतमालाची,अवजारांची आयात - निर्यात करणे शेतकऱ्यांना अवघड झाले होते. रस्ताच नसल्याने गत बारा ते चौदावर्ष शेतात विहिर, वीजेची सोय असूनही संबंधित शेतकऱ्यांच्या शेती व्यवसाय करणे अवघड झाले होते. यातच शेती व्यवसाय करणे बिकट झाल्याने गावातील छगन विठोबा वाघ या वयोवृद्ध शेतकऱ्याचा कर्जबाजारीच्या मानसिक तणावाखाली येऊन मृत्यू झाला होता.
पुढे हा लढा शेतकऱ्यांच्या वतीने छगन विठोबा वाघ यांचा मुलगा विलास छगन वाघ यांनी गेल्या १३ वर्षांपासून तहसीलदारांकडे सुरूच ठेवला होता.तत्कालीन तहसिलदारांनी दखल घेत वेळोवेळी रस्ता मोकळा करण्याचे आदेश पारित केले होते. पण वरिष्ठांच्या आदेशानुसार एकाही मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे मुजोर आणि अतिक्रमणधारक शेतकरी बाबुराव रामभाऊ वाघ याला आणखी बळ मिळत होते. छत्रपती संभाजीनगर-जालना या रस्त्यालगत शेकटा हे गाव आहे. या गावातील गट क्रमांक ११८ मध्ये मुजोर शेतकरी बाबूराव रामभाऊ वाघ याची ३ हेक्टर ५४ आर जमीन आहे. याच जमिनीच्या उत्तर बाजूकडून लाहुकी नदी असून सदर नदीच्या काठाने गट क्रमांक ११८ ही जमीन आहे. सदर जमिनीच्या उत्तर बाजूस गट नंबर ११९ मध्ये रामराव बाबुराव वाघ, छगन विठोबा वाघ व बाजीराव विठोबा वाघ यांच्या जमीनी आहेत. गट क्रमांक ११८ च्या बाजूस असलेल्या नदीच्या काठावरून गट क्रमांक ११८ बांधालगत उत्तरेकडे गट क्रमांक ११९ , ६८, ६७,,६४ , ६५ या जमिनीत जाण्याचा रस्ता असल्याचे पंचनाम्यात मंडळ अधिकाऱ्याने नमूद केले होते. मात्र सदर रस्ता गट क्रमांक - ११८ चा मुजोर शेतकरी बाबुराव रामभाऊ वाघ याने माझी खाजगी जमीन आहे. गट क्रमांक - ११९ व इतर गटात जाण्यासाठी माझ्या जमिनीतून रस्ताच नसल्याचे म्हणत बाबुराव रामभाऊ वाघ याची दादागिरी वाढली होती.
दुसरीकडे त्रस्त शेतकऱ्यांच्या अर्जावरून तहसिलदारांनी रस्ता मोकळा करण्यासाठी प्रकरण हाती घेतले. प्रकरणात गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ व अर्जदारांना नोटीस बजावण्यात आली. त्यात स्वतः तहसिलदारांनी स्थळ पाहणी केली. त्यात गैर अर्जदार बाबूराव रामभाऊ वाघ यांनी नदीपासून म्हणेजच दक्षिण बाजूकडून दक्षिण-उत्तर गट क्रमांक-११८ च्या बांधावरून पुर्वपार चालत असलेला रस्ता यांनी त्यांच्या बांधावर बंद केल्याचे तहसिलदारांच्या लक्षात आले. अर्जदारांची शेती उत्तर बाजूस आहे. त्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी व शेतातील माल वाहतूक करण्यासाठी व शेती कसण्यासाठी रस्ताच नसल्याचे स्वतः तहसिलदारांच्या निदर्शनास आल्याने तहसिलदारांनी गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ याचा अर्ज फेटाळला व अर्जदारांचा अर्ज मंजुर करत गट क्रमांक-११९, ६८, ६५, ६७ व ६४ या जमीनीत जाण्यासाठी गट क्रमांक - ११८ मधून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार अडविण्यात आलेला रस्ता मोकळा करण्यासाठी संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्याला आदेश पारित केले होते. मात्र, मंडळ अधिकार्यांनी तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली होती.बाबुराव रामभाऊ वाघ याने पानंद रस्त्याची ओळख बदलून गट क्रमांक-११८ मधून ११९ मध्ये जाण्यासाठी पूर्वीपासून असलेल्या रस्त्यावर पिकपाणी घेण्याचा उद्योग सुरू केला होता. त्यात पिकांची लागवड करत रस्ताच गिळंकृत केला होता. त्यामुळे इतर शेतक-यांचा रस्ताच बंद झाला होता. हा बंधारा पूर्ववत करून तेथुन रस्ता मिळावा, आणि वडिलोपार्जित वहिवाटीचा रस्ता पूर्वीप्रमाणेच करावा,संबंधित शेतक-याने केलेल्या अतिक्रमणाचा पंचनामा करावा आणि रस्ता मोकळा करावा, या मागणीसाठी गेल्या १५ वर्षांपासून शेतकरी शासनदरबारी चकरा मारत होते.यातील छगन विठोबा आणि विलास वाघ या पिता पुत्राचा शेवटी मृत्यु झाला. मात्र त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळालाच नाही. शेवटी यातील काही त्रस्त शेतक-यांनी ‘टेंडरनामा' कडे धाव घेतली. चमूने गावक-यांच्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी तहसिल कार्यालयातील अभिलेख कक्षातून याप्रकरणाचा संपुर्ण लेखा जोगा बाहेर काढला.
या प्रकरणात २३ ऑगस्ट २०१३ रोजी शेतकरी छगन विठोबा वाघ यांनी गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ यांच्या विरूध्द प्रकरण दाखल केल्यानंतर त्यात ७ सप्टेंबर २०१५ रोजी तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी गैर अर्जदार बाबुराव रामभाऊ वाघ याचा अर्ज नामंजूर करून फेटाळला होता. त्यात छगन विठोबा वाघ यांचा अर्ज मंजुर करून मौज शेकटा येथील गट क्रमांक ११९, ६८, ६५, ६७, ६४ या जमीनीत जाण्यासाठी गट क्रमांक ११८ मधुन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार अडविण्यात आलेला रस्ता मोकळा करणेबाबत सक्षम अधिकार्यांना परवानगी दिलेली होती. विशेषतः प्रतिनिधीने स्वतः गावात जाऊन शेतपाहणी, टोच नकाशा, भूमी अभिलेखचा नकाशा आणि मंडळ अधिकारी, तलाठी यांनी वेळोवेळी केलेले पंचनामे,तसेच तहसीलदारांचे आदेश आदी सर्व कागदपत्रांची पाहणी केली. त्यातून बाबुराव रामभाऊ वाघ याने रस्ता दाबल्याचे सिद्ध झाले. बाबुराव रामभाऊ वाघ या मुजोर शेतकर्याने शेतरस्ताच गिळंकृत केल्याने इतर शेतक-यांना दैनंदिन शेत कसण्यासाठी, शेत मालाची व इतर फळभाजी, दूध आणि इतर कामांसाठी जा-ये करताना गैरसोय होत होती. या प्रकरणी तहसिलदारांच्या आदेशाच्या विरोधात बाबुराव रामभाऊ वाघ याने गट क्रमांक ११९ ही माझी खाजगी जमीन असून मी ति खरेदी खताआधारे विकत घेतल्याचे म्हणत तिथे पूर्वीपासूनच रस्ता नसल्याचा दावा न्यायालयात दाखल करत त्यात तहसिलदारांच्या आदेशाला स्थगिती मिळावी, अशी विनंती न्यायालयापुढे केली होती. मात्र तब्बल आठ वर्षानंतर त्याचा दावा फेटाळला. बाबुराव रामभाऊ वाघ याचा दावा फेटाळताच संबंधित गटातील सर्व त्रस्त शेतकर्यांनी तहसिलदार रमेश मुंडलोड यांच्याकडे रस्ता मोकळा करून देण्याबाबत अर्ज केला होता. त्यावर तहसिलदारांनी मंडळ अधिकारी अभिजित शर्मा, तलाठी कृष्णा घुगे यांना रस्ता मोकळा करून देण्याबाबत आदेशित केले होते. या आदेशानंतर शेतकर्यांनी पोलिस बंदोबस्तासाठी व जमीनीची मोजणी करण्यासाठी शुल्क देखील भरले. वरिष्ठांच्या आदेशानंतर मंडळ अधिकारी शर्मा व तलाठी कृष्णा घुगे यांनी गुरूवारी कडक पोलिस बंदोबस्तात बाबुराव रामभाऊ वाघ याची मुजोरी कमी करत रस्ताच मोकळा करून दिला.