Sambhajinagar : उच्च व तंत्रशिक्षण विभागाला स्वच्छतेचा विसर; परिसरात कचऱ्याचे ढिग
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : संपूर्ण शहरवासीयांच्या मनात मनमोहक इमारत म्हणून नावारुपाला आलेल्या वंदे मातरम् सभागृहाचे दोन वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण करण्यात आले. मात्र बांधकाम झाल्यानंतर कंत्राटदार व सिडको प्रशासनाचे या भव्य वास्तूकडे दुर्लक्ष झाले. बांधकाम झाल्यानंतर सभागृहाचा ताबा उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे देण्यात आला. या विभागाने देखरेखीची जबाबदारी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाकडे सोपवली. पण तेथील अधिकाऱ्यांकडून वंदे मातरम् सभागृहाकडे अधिक लक्ष देऊन टापटीपपणाकडे दुर्लक्ष झाल्याचे टेंडरनामा तपासात उघड झाले आहे.
वंदे मातरम् सभागृहाच्या आतमध्ये व परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र बघायला मिळते. एवढेच नव्हे तर पाठीमागे दारूच्या बाटल्यांचा आणि थर्माकाॅलच्या ग्लासांचा खच पहायला मिळाला. हे कमी म्हणून की काय चहाच्या कपांचे ढिग जळालेल्या अवस्थेत दिसले.यावेळी टेंडरनामा चमू पाहणी करत असताना चक्क मागील दोन वर्षांपासून ३० लाखाचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने वसुलीसाठी तगादा लावल्याची बाब समोर आली. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाने वीज बिल भरण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र शासनाकडून बजेट आल्यावर भरू असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात येत असल्याचे समोर आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे वंदे मातरम सभागृहाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र सात पदांची भरती रखडली आहे. यात अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक, माळी, सुरक्षारक्षक, शिपाई व स्वच्छता कर्मचारी अशी सात पदे मंजुर झाली आहेत. मात्र गत दोन वर्षांपासून पदे भरली जात नाहीत. परिणामी वंदे मातरम् सभागृह अद्यापही वार्यावर आहे. शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाने तात्पुरत्या स्वरूपात एक माळी आणि एका निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. पण तब्बल दोन एकर जागा असल्याने त्यांचे सुशोभीकरण आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. वंदे मातरम् सभागृहाच्या पुढील व मागील परिसरात कायमच कचर्याचे ढिग आणि रानटी झाडाझुडपात सुशोभीकरण हरवल्याने परिसर अस्वच्छ दिसत आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत सभागृह खाजगी कंपनीमार्फत चालविण्यासाठी काही दिवसांपूर्वी टेंडर काढण्यात आले. दरम्यान मागील आठ दिवसांपूर्वी मुंबईतील एका कंत्राटदाराने पाहणी केली. मात्र अस्वच्छ परिसर पाहुण पाहणी करणार्या कंत्राटदारामार्फत चुकीचा संदेश जातो.
आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकाराकडे कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. डोळ्यांसमोर हा प्रकार घडूनही दुर्लक्ष केले जाते. १९८४-८५ मध्ये किलेअर्क येथे वंदे मातरम सभागृह उभारण्याची घोषणा झाली होती. प्रत्यक्षात २०१४ मध्ये भूमिपूजन झाले. आठ वर्षात कासवगतीने काम करत ४४ कोटी रुपये खर्च करून हे सभागृह, इमारत बांधण्यात आली. ९ डिसेंबर २०२२ रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या भव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला. सभागृहाचे एका दिवसाचे भाडे दिड लाख असल्याने कुठलीही शैक्षणिक संस्था येथे कार्यक्रम करण्यास धजावत नाही. आत्तापर्यत केवळ १५ कार्यक्रम येथे झाले आहेत. त्यात उत्पन्न कमी आणि वीज बिल जास्त असल्याने वंदे मातरम् सभागृह म्हणजे केवळ पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार असल्याचे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.हैदराबाद मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ हॉल बांधून त्यास वंदे मातरम नाव द्यावे, अशी मूळ कल्पना होती. १६ फेब्रुवारी २०१४ रोजी याच्या प्राथमिक आराखड्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे मान्यता देण्यात आली. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१४ रोजी बांधकामास मंजुरी देण्यात आली. १७ जुलै २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पण निधी, नियोजनाअभावी काम अतिशय संथगतीने झाले. आता सभागृह तयार होऊनही भाडे अधीक असल्याने लोकांच्या उपयोगात येत नाही, अशी स्थिती आहे.
मन मोहून टाकणारी वास्तू दोन एकर जागेवर उभारलेल्या या वास्तूचे देखणेपण, सौंदर्य भुलवून टाकणारे आहे. लहान मुले हातात तिरंगा घेऊन जातानाचे चित्र असो अथवा हैदराबाद मुक्तिसंग्रामात ज्यांनी योगदान दिले त्यांची माहिती हे सर्व पाहिल्यानंतर प्रेरणादायी वाटते. टेरेसवरील उद्यान मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावरचा इमारतींचा अनुभव देणारे आहे.बांधकाम झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरकरांना अशी वास्तू असू शकते, यावर प्रारंभी कुणाचा विश्वासच बसत नव्हता. या भूखंडाचे क्षेत्रफळ - २ एकर (८०३३.६७ चौ.मी.) असून यामध्ये विविध सुविधा आहेत.या भव्य सभागृहात १०५० आसन व्यवस्था, उच्च दर्जाच्या खुर्च्या आहेत. २५० व्यक्तींची क्षमता असलेले ॲम्फिथिएटरही उपलब्ध आहे. कलादालन, प्रदर्शन केंद्र, १०० लोकांना संवाद करता येईल, असा स्वतंत्र मंच, व्हीआयपींसाठी निवास व्यवस्था, १०० कार व २०० दुचाकी तसेच १०० सायकलींकरिता वाहनतळ, प्रशासकीय कार्यालय, अपंगांकरिता रॅम्प अशा सुविधा या इमारतीमध्ये आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वंदे मातरमसाठी समिती नियुक्त झाली आहे. सभागृह भाडेतत्त्वाने देण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ही भव्य वास्तू उभारणी केल्यानंतर ती जपणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असतांना त्याकडे कुणाचेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही.