
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेक्टा फाटा (जालना रोड) ते गोलटगाव चार किमीचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून, हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांचे किरकोळ अपघात वाढले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
हा परिसर भाजीपाला व मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेतात भाजीपाला व मोसंबी भरण्यासाठी अवजड वाहने येत असतात. रस्त्यावर लहान व मोठे ट्रॅक्टर, ट्रक अशा अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. खड्डे चुकवतांना या वाहनांचे अपघात होतात. रस्ता आधीच अरुंद असून रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली आहेत. वाहनधारक तसेच रस्त्याने ये जा करणारे विद्यार्थी , रूग्ण व नागरिक तसेच शेतकरी-शेतमजूरांना व गरोदर मातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याला साईडपट्ट्या नसल्यासारख्या असून, त्यामुळे एसटी महामंडळाची बसही बंद आहे. बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्रास वाढला आहे.
पालकमंत्र्यांना दिसेना खड्ड्यात हरवलेला रस्ता
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील व तालुक्यातील कोळघर ते आडगाव (खु.) ते कार्होळ ते गोलटगाव या प्रमुख जिल्हा मार्ग - ७८ एकूण साडेचौदा किलोमीटर रस्त्यासाठी विशेष दुरूस्ती अंतर्गत पाच कोटी ६० लाख रूपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम चकाचक करण्यात आले. रोजगार हमी व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले होते.
अमन कंन्सट्रक्शन कंपनीने या रस्त्याचे काम २८ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू केले होते. नुकतेच या रस्त्याचे काम संपले आहे. मात्र पुढे पीडब्लूडीच्या अंबड डिव्हिजनकडे येणाऱ्या घारेगाव ते रजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - एन एच - ५२ पर्यंत रस्त्याची खड्डेमय अवस्था आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरूस्ती करणे अपेक्षित आहे. या रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पालकमंत्री भुमरे यांना खड्ड्यात हरवलेले हे रस्ते दिसले नाहीत का, असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
२५ लाखांचा चुराडा
जालनारोड शेक्टा फाटा ते गोलटगाव या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियानांतर्गत २५ लाखाचा निधी खर्च करण्यात आला. पंधरा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील ड्रीमलॅन्ड कन्सट्रक्शन मार्फत खडीचा चुरा टाकून खड्डे बुजविण्यात आले. मात्र त्यात डांबर टाकले नाही. खड्डे भरल्यानंतर डांबराने पॅचवर्क केले नसल्याने खड्यातून खडी रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरून पडत आहेत. २५ लाखाचा चुराडा करूनही खडेमुक्त रस्त्याऐवजी घसरगुंडी युक्त रस्ता झाल्याने वाहनधारक आगीतून फोफाट्यात पडले आहेत.
शेक्टा फाटा ते गोलटगाव ते कौडगाव या रस्त्यासाठी वीस कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यतेसाठी ते मंत्रालयात पाठवले आहे. सप्टेंबर ते मार्च अखेर हा रस्ता डांबरीकरणाच्या माध्यमातून चकाचक करण्यात येणार आहे. घारेगाव ते रजापुर हा रस्ता अंबड डिव्हिजनकडे आहे. शेक्टा ते गोलटगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ड्रीमलॅन्ड कन्सट्रक्शन कडून काम करण्यात आले. पण पावसाच्या वातावरणात डांबरीकरण करता येत नसल्याने काम अद्याप अर्धवट आहे.
- डी. एस. कांबळे, उप विभागीय अभियंता