सुरक्षा साधनांविना जिवाशी खेळत विसर्जन विहिरीची सफाई;ठेकेदारांकडून

Aurangabad
AurangabadTendernama
Published on

औरंगाबाद (Aurangabad) : गणेशोत्सवानंतर बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाकरिता महापालिकेने (Aurangabad Municipal corporation) यंदा गणेशोत्सवाच्या आठ दिवसा आधीपासूनच विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. विहिरींच्या स्वच्छतेचे काम देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र, मागील काही वर्षापूर्वी जुने मुकुंदवाडी गावातील विसर्जन विहिरीची सफाई करताना विषारी वायुमुळे चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असताना आजही गणेश विसर्जन विहिरींची सफाई करताना कर्मचारी कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. ना हातमोजे, ना तोंडाला मास्क, ना पायात गम बूट ना डोक्यात ऑक्सिजन किट अशा स्थितीत सफाई कर्मचारी गाळ, कुजलेली निर्माल्य आणि घाण साफ करीत आहेत. यामुळे कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Aurangabad
अखेर नागपूर विद्यापीठाला आली जाग; ‘एमकेसीएल’चे टेंडर रद्द

अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष, कंत्राटदारांकडून अटी-शर्तींचा भंग

या धक्कदायक प्रकाराकडे महापालिका प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष वेदनादायी ठरत आहे. विसर्जन विहिरींची सफाई करताना महापालिकेने टेंडर प्रक्रियेतील अटी व शर्तींचा कंत्राटदारांकडून भंग होत आहे. याकडे महापालिका प्रशासक डाॅ.अभिजित चौधरी यांनी योग्य उपचार करण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

काय होतो परिणाम

● सालाबादप्रमाणे विविध मंडळांकडून विहिरीत आजही ‘पीओपी’ अर्थात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’, प्लास्टिक आणि सिमेंटचा वापर करून बनवलेल्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मूर्तींबरोबरच विषजन्य रंग, प्लास्टिक आणि थर्माकॉलची सजावटीचे सामान देखील टाकले जाते. यात मोठ्या प्रमाणात खरी आणि खोटी प्लास्टीकची फुलं ही फेकली जातात, यामुळे विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी वायु तयार होतात. ‘पीओपी’मध्ये, ‘कॅल्शिम सल्फेट हेमिहाईड्रेट’ नावाचे रसायन असते, ज्याचे नैसर्गिक विघटन व्हायला अनेक वर्षे लागतात. हे रसायन पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते, ज्याने जलचर आणि मासे देखील मृत्यूमुखी पडतात.

● विहिरी प्रदूषित झालेल्या असतात. रंगीबेरंगी आणि चमकदार मूर्ती आणि निर्माल्यामुळे शीस, पारा व कॅल्शिम सारखे अत्यंत विषारी आणि हानिकारक वायु विहिरीत पसरलेले असतात. या जडधातूंचा पाण्याशी वर्षभर संपर्क असल्याने विहिरीत आम्लता वाढते आणि हे परत जलचरांसाठी आणि मानवी वसाहतीहाठी विनाशकारी ठरतात

● . त्याहून, हे धातू जैव-विस्तृतीकरण (biomagnification)) आणि जैवसंच ((bioaccumulation) या प्रक्रियेद्वारे अन्नाचा भाग बनून, आरोग्याला धोका निर्माण करतात. विहिरीत जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो तसेच त्वचेच्या रोगांचे प्रमाण वाढते, मूर्तीचे विसर्जनासोबत विहिरीत विविध प्रकारचे रंग, गुलाल व धातूचे दागिने प्लास्टिकचे हार, फुले आणि निर्माल्य विसर्जित केले जाते, ज्यामुळे प्रदूषण कित्येक पटीने वाढते. विहिरीत अत्यंत हानिकारक अशा बेरिम, कॅडमिम, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायॉक्साईड व नायट्रेट्स आणि सल्फेट्स सारख्या घातक रसानांचा विषारी गॅस पसरलेला असतो.

Aurangabad
औरंगाबाद मनपात प्रशासकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण?

५० लाखाचे टेंडर

अशा स्थितीत विसर्जन विहिरीतील घाण साफ करण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागातील आठ विसर्जन विहिरीतील गाळ काढण्यासाठी ५० लाखाचे टेंडर काढले. यातील सर्वच विहिरींचे काम प्रगतिपथावर आहे.

टेंडरनामा पाहणी

कंत्राटी कर्मचारी कुठल्याही सुरक्षासाधनांविनाच विसर्जन विहिरींची सफाई करत असल्याची तक्रार टेंडरनामा कडे आल्यावर प्रतिनिधीने सलग दोन दिवस जि.प. मैदान, टीव्ही सेंटर, संघर्षनगर, शिवाजीनगर, विमानतळासमोरील विहीर, जालाननगर, सातारा येथील विहीर, सातारा तांडा, हर्सूल तलावाजवळील कृत्रिम तलावात होत असलेल्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. त्यात स्वच्छतेसाठी सरसावलेले कर्मचार्यांच्या पायात गम बूट, तोंडाला मास्क आणि हातात रबरी हातमोजे आणि ऑक्सिजन किट कुठेही दिसली नाही.

सुरक्षा साधने कागदावरच

टेंडर काढताना दिलेल्या महापालिकेने कागदावर नोंदवलेल्या अटी - शर्तीत कंत्राटदाराने सुरक्षा साधनांची पूर्तता करावी असा उल्लेख आहे. परंतु, कंत्राटदाराने ही अट स्वतःच्या सोयीनुसार बाजूला सारल्याचे टेंडरनामा च्या पाहणीत उघड झाली आहे. कंत्राटदार आणि अधिकार्यांच्या अर्थकारणाने कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय जीव धोक्यात घालून सफाई कर्मचारी निमूटपणे कर्तव्य निभावत असल्याचे दिसून आले.अत्यंत दमट वातावरणात आणि अनेक विषारी वायुंच्था सान्निध्यात कर्मचारी जिवाची पर्वा न करता सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्वच्छतेचे कर्तव्य बजावत असल्याचे पाहावयास मिळाले.

डाॅ. प्रशासकांच्या उपचाराकडे लक्ष

निश्चित केलेल्या कंत्राटदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्यामुळे विसर्जन विहिरींच्या स्वच्छतेची कामे करणारे सफाई कर्मचारी मोठ्या आजाराची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासक डाॅ.अभिजित चौधरी या सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com