
मुंबई (Mumbai) : अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नाही मात्र तरीही पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी ३५६ कोटींच्या कामाचे टेंडर काढण्यात आले आहे. त्यावरुन आता टीका सुरु झाली आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे उद्योगमंत्री दुर्लक्ष करत असल्याने, त्याविरोधात अलिबाग येथील एमआयडीसी कार्यालयावर येत्या १५ मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्योग विभागाने प्रकल्पासाठी एकरी ९६ लाख ६९ हजार तर हेक्टरी २ कोटी ४१ लाखांचा दर देऊ केला आहे. शेतकऱ्यांना हा दर मान्य नाही. त्यामुळे जमिनीला वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र त्याकडे उद्योग विभागाने दुर्लक्ष केले आहे. तरी सुद्धा भूसंपादनाचा प्रयत्न सुरु झाला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत ७३६ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या २८ किलोमीटर लांबीची भली मोठी पाईप लाईन टाकली जाणार आहे. यासाठी १६७ कोटी ०८ लाख २५ हजार २५४ रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे १८९ कोटी ७० लाख ३५ हजार ३२६ रुपये खर्चून जॅकवेल बांधले जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे.
एकीकडे खारेपाट ग्रामस्थ पाणीटंचाईने व्याकुळ आहेत. तर दुसरीकडे शासनाने त्यांना पाणी देण्याऐवजी सिनारमन्स या प्रस्तावित उद्योगासाठी पाणी देण्चाचा घाट घातला आहे. राज्याच्या उद्योग विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेना शिंदेगट जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केला आहे. नव्या पाईप लाईन टाकण्याच्या कामाला त्यांनी विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा १५मे रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग येथील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोरे जा असा इशारा केणी यांनी दिला आहे.