
अलिबाग (Alibaug) : येथील दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरणासाठी समाधीला संरक्षक भिंत बांधणे 5 कोटींच्या कामाचे नियमबाह्य तुकडे करून अलिबाग नगरपालिकेच्या प्रशासकांनी टेंडर प्रसिद्ध केले. हे टेंडर रद्द करून सर्व कामासाठी एकच टेंडर काढून कामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश करावेत अशी मागणी अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे. प्रशासकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप संजय सावंत यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. विशेष म्हणजे तिन्ही टेंडरची अंदाजपत्रके आंग्रे समाधीला संरक्षक भिंत बांधणे यासाठीच करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी व कोकण आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात सावंत यांनी अलिबाग येथील दर्यासारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरण करणे, समाधीला संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी सरकारच्या विविध विभागाकडून 5 कोटी 7 लाख 25 हजार निधी प्राप्त झाला असल्याचे नमूद केले आहे. दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांना अलिबाग व रायगडवासीयांच्या हृदयामध्ये मानाचे स्थान आहे. सरकारच्या विविध विभागाकडून 5 कोटी 7 लाख 25 हजार निधी प्राप्त झाला असल्याने या कामासाठी एकच टेंडर प्रसिद्ध करून दर्जेदार पद्धतीने काम होणे गरजेचे होते. असे असताना मुख्याधिकारी अलिबाग नगरपरिषद यांनी 28 ऑगस्ट 2023 च्या स्थानिक वर्तमान पत्रात रू. 5 कोटी 7 लाख 25 हजार निधीचे तीन भाग करून अनुक्रमे रू. 2,52,86,962/-, रू. 1,27,19,039 व रू. 1,27,19,039 असे तीन टेंडर प्रसिद्ध केले. हे टेंडर सावंत यांनी पीडीएफ फॉरमॅटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत.
वास्तविक सरकारच्या निकषानुसार एकाच कामाची गुणवत्ता ठेवण्यासाठी व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कोणत्याही परिस्थीतीमध्ये एका कामाचे तुकडे करण्यावर बंदी आहे. सावंत यांनी बद्दल मुख्याधिकारी अलिबाग नगरपरिषद अंगाई साळुंखे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी निधी वेगवेगळया हेडमधून आला असल्याने तीन टेंडर काढावे लागले असे स्पष्टीकरण दिले. सावंत यांना हे स्पष्टीकरण मान्य नसल्याने त्यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार अर्ज केला आहे. निधी वेगवेगळया लेखाशिर्षाखाली असला तरी तो अलिबाग येथील दर्यासारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरण करणे, समाधीला संरक्षक भिंत बांधणे या एकाच कामासाठी असल्याने स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व व कामाचा दर्जा गुणवतापर्वूक तसेच भ्रष्टाचारमुक्त असण्यासाठी एकच टेंडर प्रसिद्ध करणे आवश्यक होते असे मत सावंत यांनी मांडले आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या प्रशासकांचा हा निर्णय विविध ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी असल्याचे प्रतीत होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या टेंडर प्रकियेवर स्थगिती देवून 5 कोटींची नवीन टेंडर प्रक्रिया प्रसिद्ध करण्याचे आदेश देवून हे काम गुणवत्तापूर्वक होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती जिल्हाधिकारी यांना केली आहे.
निधी वेगवेगळ्या हेडमधून जसे की पर्यटन विभाग, विशेष प्रस्तावित कामे अशा प्रकारे आला असल्याने तीन टेंडर काढावी लागली. यामध्ये अनियमितता झालेली नाही.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद.