Home Loan
Home Loan Tendernama
टेंडरिंग

Home Lone घेण्यापूर्वी एकदा हे वाचाच!

टेंडरनामा ब्युरो

स्वतःचे हक्काचे घर (Home) असावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईच्या (Inflation) सध्याच्या काळात घरासाठी होमलोन (गृह कर्ज Home Loan) घेतल्याशिवाय अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, अनेकांना होमलोन कसे घ्यावे, ते घेताना कुठल्याबाबी ध्यानात घ्याव्यात, याची माहिती नसते.

पूर्वी जेव्हा होमलोनची सोय नव्हती तेव्हा स्वतःचे हक्काचे घर स्वतःच्याच पैशाने घ्यावे लागत होते. मात्र, आता होमलोन इतके सहजपणे उपलब्ध होते की स्वतःचे घर हे स्वप्न न राहता अगदी तरुणपणातच प्रत्यक्षात ते साकार करता येते. स्वतःचे 20 ते 25 टक्के व बाकीचे होमलोन. यामुळेच होमलोन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. याच पार्श्‍वभूमीवर अनेक बॅंका किंवा संस्था आज-काल होमलोनसाठी विशेष व्याजदराच्या आकर्षक योजना आणत आहेत. मात्र, होमलोन घेताना काळजी घेणे आवश्‍यक आहे.

दिवसागणिक कमी होत जाणारी कर्जाची शिल्लक, महिना आधारित कमी होत जाणारी कर्जाची शिल्लक, प्रक्रिया शुल्क, गृहकर्ज विमा, कर्जाचे हस्तांतर आदी मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

दर महिन्याला कमी होणारी कर्जाची शिल्लक (मंथली रिड्युसिंग बॅलन्स)

काही बॅंका किंवा संस्था "मंथली रिड्युसिंग बॅलन्स' पद्धतीने गृहकर्ज देतात. म्हणजेच आपला हप्ता जरी महिन्याच्या पाच तारखेला असेल, तरी त्या दिवशी बाकी असलेल्या कर्जातून हप्ता वजा न करता संपूर्ण महिन्याचे व्याज लावले जाते. त्यातच सुरवातीला हप्त्यातून जास्तीत जास्त व्याज व कमी मुद्दलाची आकारणी होते. त्यामुळे हे कर्ज नेहमीच खिशाला परवडणारे नसते.

दररोज कमी होणारी कर्जाची शिल्लक (डेली रिड्युसिंग बॅलन्स)

डेली रिड्युसिंग बॅलन्स ही पद्धत बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांत वापरली जाते. यात ग्राहकाचे हित अधिक प्रमाणात जपले जाते. जर हप्ता पाच तारखेला भरला, तर हप्ता जमा झालेल्या दिवशीच कर्जाच्या मुद्दलामधून हप्ता वजा होतो व फक्त पाच दिवसांचेच किंवा जितके दिवस कर्ज वापरले तितक्‍याच दिवसांचे व्याज आकारले जाते.

या पद्धतीत संपूर्ण महिन्याचे व्याज आकारले जात नाही. त्यामुळेच अगदी पहिल्या हप्त्यापासून 60 टक्के मुद्दल व 40 टक्के व्याज असे विभाजनही सर्वसाधारण होते. त्यामुळे 20 वर्षांचे कर्ज अगदी 9-10 वर्षांत फिटू शकते व आपले लाखो रुपये व्याज वाचू शकते.

प्रक्रिया खर्च (प्रोसेसिंग फी)

गृहकर्जाचे प्रकरण मार्गी लागताना प्रक्रिया शुल्क अर्थात प्रोसेसिंग फी हा घटक महत्त्वाचा असतो. बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंका गृहकर्जाच्या अर्धा टक्का किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रक्रिया शुल्क घेतात. अन्य बॅंका किंवा संस्था दोन हजार रुपयांपासून अगदी कर्जाच्या तीन टक्‍क्‍यांपर्यंतही शुल्क घेतात. त्याचबरोबर बाकीचा खर्चही लावतात तो वेगळाच. त्यामुळे या शुल्काविषयी आधी माहिती करून घेणे आवश्‍यक आहे.

गृहकर्ज विमा

गृहकर्ज विमा म्हणजेच आपल्या कर्जाचा विमा उतरविणे. आपल्या कर्जाच्या परतफेडीच्या जोखमीचा विमा गृहकर्ज देणारी बॅंक किंवा संस्था उतरवत असते. यात विम्याची रक्कम आपल्या गृहकर्ज परतफेडीनुसार कमी कमी होत जाते; पण काही गृहकर्ज संस्थांच्या स्वतःच्याच विमा संस्था असतात. त्यावेळी हा गृहकर्ज विमा कायम पहिल्या कर्जाइतकाच राहतो. त्यामुळे गृहकर्ज घेताना आपण कोणता विमा घेत आहोत, हे पाहणे गरजेचे आहे.

गृहकर्जाचे हस्तांतर (लोन ट्रान्स्फर)

गृहकर्ज जर एका बॅंकेकडून किंवा संस्थेकडून दुसऱ्या बॅंकेत हस्तांतर करावयाचे असेल, तर ते सहजशक्‍य आहे. जर खासगी गृहकर्ज संस्थेकडून राष्ट्रीयीकृत गृहकर्ज संस्थेकडे आपले कर्ज हस्तांतर करून घ्यायचे असेल, तर बहुतांश राष्ट्रीयीकृत संस्था आपली सर्व कागदपत्रे तपासून कोणतेही शुल्क न घेता हे गृहकर्ज स्वतःकडे घेतात. त्यामध्ये खासगी संस्थेचे लवकर किंवा मुदतपूर्व गृहकर्ज फेडण्याचे शुल्कही फेडले जाते.