मनमाड (Manmad): बहुप्रतिक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग उज्जैन येथे २०२८ मध्ये होत असलेल्या सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याबाबत मध्य प्रदेश सरकार आग्रही आहे. त्यासाठी या रेल्वामार्गासाठी मध्य प्रदेशातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे महाराष्ट्रातील धुळे जिल्हा, मालेगाव व नांदगाव तालुक्यातही भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला आहे.
धुळे, मालेगाव व नांदगाव तालुक्यातील भूसंपादन प्रक्रिया यावर्षी एप्रिलमध्ये सुरू केल्यानंतर आता मनमाड शहरातही प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. मनमाड शहरातील गर्डर शॉप परिसरातील सुमारे १०० कुटुंबांतील ६५० वारसांना भूमिअभिलेख विभागातर्फे भूसंपादनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या असून या जमिनींची मोजणी १५ डिसेंबरला वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मनमाड ते इंदूर या रेल्वेमार्गाचे पहिले सर्वेक्षण १९०८ मध्ये ब्रिटिश काळात झाले होते. तेव्हापासून हा रेल्वेमार्ग प्रलंबित आहे. हा ३०९ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग असून, तो मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-महू-इंदूर असा मार्गाने जाणार आहे. या रेल्वेमार्गामुळे मुंबई-इंदूर दरम्यानचे अंतर ८५०-९०० किमी वरून ५५० किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ ४ तासांनी घटणार आहे.
हा रेल्वेमार्ग महाराष्ट्रात १३९ किलोमीटर, तर मध्य प्रदेशात १७० किलोमीटर आहे. केंद्र सरकारने या मार्गाला महाराष्ट्र-मध्य प्रदेश कनेक्टिव्हिटीसाठी विशेष प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. दोन्ही राज्यांतील एकूण ३४ रेल्वेस्थानके उभारली जाणार असून, सहा जिल्हे थेट जोडले जाणार आहेत.
केंद्र सरकारने सप्टेंबर २०२४ मध्ये हा प्रकल्प मंजूर केल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील १८७ हेक्टर जमीनसाठी भूसंपादन अधिका-याची नियुक्ती केली. मध्य प्रदेश सरकारनेही जानेवारी २०२५ मध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू केली असून ७७ गावांतून जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.
नाशिक जिल्ह्यातही मे २०२५ पासून २१ गावांमध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत २०२९ असली, तरी मध्यप्रदेशातील उज्जैन येथे २०२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यामुळे हा प्रकल्प २०२८ मध्ये पूर्ण करण्याची विनंती मध्य प्रदेश सरकारने केली आहे.
मध्य प्रदेशातील भूसंपादन अंतिम टप्प्यात असताना, महाराष्ट्रातील धुळे व मालेगाव तालुक्यांतील भूसंपादन प्रक्रियाही आता वेग घेणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पुढील कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मनमाड, अस्तगाव, खादगाव, पांझणदेव, नवसारी, भारडी, चोंडी-जळगाव, सायने, मेहू, ज्वार्डी, मालनगाव, झोडगे आदी गावांतून हा मार्ग जाणार असून, तेथील जमीन संपादित केली जाणार आहे.