Scam Tendernama
टेंडर न्यूज

Pune Ring Road : 'त्या' 31 किमीच्या रिंगरोडचा खर्च 22 हजार कोटींवरून 40 हजार कोटींवर गेलाच कसा?

Tender Scam : महामंडळाने दुर्लक्ष करून कंपन्यांशी तडजोड करत २५ टक्के जादा दराने टेंडर स्वीकारल्या. त्यामुळे २२ ते २३ हजार कोटींचा अपेक्षित खर्च आता ४० हजार कोटींवर गेला आहे.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय-NHAI) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी - MSRDC) वर्ग केलेल्या सोलापूर रस्ता ते पुणे-बंगळूर रस्त्यादरम्यान ३१ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या कामासाठी ठेकेदार (Contractor) कंपन्यांनी अंदाजित रकमेपेक्षा ३५ टक्के जादा दराने टेंडर (Tender) भरल्याचे समोर आले आहे.

महामंडळाने पाच हजार ९४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. प्रत्यक्षात सहा हजार ७३३ कोटी रुपये म्हणजे अंदाजित रकमेपेक्षा एक हजार ५९७ कोटी रुपये जादा दराने कंपन्यांनी टेंडर भरल्या आहेत.

महामंडळाने यापूर्वी पश्‍चिम आणि पूर्व भागांतील रिंगरोडच्या कामासाठी टेंडर काढल्या होत्या. त्यावेळी अंदाजित रकमेपेक्षा ४० ते ४५ टक्के वाढीव दराने कंपन्यांनी टेंडर भरल्या होत्या. त्यामुळे अडचणीत आलेल्या महामंडळाने त्रयस्थ संस्थांकडून टेंडरची तपासणी केली.

त्यांनीही जादा दराने टेंडर आल्यामुळे कंपन्यांबरोबर तडजोड करून अंदाजित रकमेपेक्षा जास्तीत जास्त पाच टक्के जादा दराने टेंडर स्वीकाराव्यात किंवा फेरटेंडर काढाव्यात, अशी शिफारस महामंडळाला केली होती. मात्र, महामंडळाने दुर्लक्ष करून कंपन्यांशी तडजोड करत २५ टक्के जादा दराने टेंडर स्वीकारल्या. त्यामुळे २२ ते २३ हजार कोटींचा अपेक्षित खर्च आता ४० हजार कोटींवर गेला आहे.

असे असतानाच प्राधिकरणाकडून महामंडळाच्या ताब्यात आलेल्या ३१ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडचे तीन टप्पे करून स्वतंत्र टेंडर काढल्या. त्याही टेंडर अंदाजित रकमेपेक्षा ३५ टक्के जादा दराने कंपन्यांनी भरल्याचे समोर आले आहे. यावरून रिंगरोडवरील खर्च आता ४० हजार कोटी रुपयांहून अधिक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राधिकरणाने पुणे ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान ग्रीन कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोडला काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे सोलापूर ते पुणे-बंगळूरदरम्यानच्या ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. त्यामुळे ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा भाग वगळून उर्वरित कामासाठी महामंडळाने मध्यंतरी टेंडर प्रक्रिया राबविली.

प्राधिकरणाने मध्यंतरी निर्णयात पुन्हा बदल करत ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम महामंडळानेच करावे, असे सांगत रस्ता पुन्हा महामंडळाकडे वर्ग केला. त्यामुळे नव्याने ताब्यात आलेल्या ३१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे तीन भाग करून महामंडळाने सप्टेंबरमध्ये टेंडर मागविल्या होत्या.

या मुदतीत आठ कंपन्यांनी टेंडर भरल्या. मात्र, विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्याने त्या कालवधीत दाखल टेंडरची तांत्रिक छाननी महामंडळाकडून पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी महामंडळाने टेंडर उघडल्या. तेव्हा तिन्ही टेंडर अंदाजित रकमेपेक्षा ३५ टक्के जादा दराने आल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले.

पूर्व भागातील रिंगरोड

१. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग-नाशिक-सोलापूर आणि सातारा-बंगळूर महामार्गाला जोडणारा

२. मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातून जाणार

३. पाच तालुक्यांतील ४६ गावांतून रिंगरोड जाणार

४. एकूण लांबी १०३ किलोमीटर, तर रुंदी ११० मीटर असणार

५. सहा पदरी महामार्ग-एकूण सात बोगदे, सात अंडरपास, दोन नदीवरील आणि दोन रेल्वे मार्गावरील ओलांडणी पूल

या गावांतून पूर्व रिंगरोड जाणार

- मावळ : परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदोरी, सुदवडी, सुदुंबरे.

- खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोळेगाव.

- हवेली : तुळापूर, भावडी, लोणीकंद, पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटेनगर, भिवरी,पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.

- पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे.

- भोर : कांबरे, नायगाव, केळवडे.