Pune
Pune  Tendernama
टेंडर न्यूज

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वेसाठी Good News! अर्थसंकल्पात तब्बल 2424 कोटींचा...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : बहुचर्चित नाशिक-पुणे हायस्पीड (Pune Nashik Highspeed Railway) रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारच्या २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पात २ हजार ४२४ कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून भूसंपदानाचे भीजत घोंगडे पडलेल्या या प्रकल्पाच्या कामास गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

या सेमीहायस्पीड प्रकल्पास अद्याप रेल्वे मंत्रालयाची मान्यता नसल्याने हा प्रकल्प व त्याचे भूसंपादन रेंगाळले आहे. आता अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाला निधी देण्यास मान्यता दिल्याने या रेल्वेमार्गाचे काम सुरू होण्याचे मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने महारेल कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी स्थापन केली असून, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी २० टक्के निधी देणार असून उर्वरित निधी या कंपनीकडून कर्जस्वरुपात उभारला जाणार आहे. प्रकल्पासाठी १७ हजार ८८९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गााच्या उभारणीसाठी जवळपास पाच वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे.

महारेल कंपनीने नाशिक, नगर व पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूसंपादन करून जमीन धारकांना त्याची रक्कमही दिली आहे. मात्र, मधल्या काळात या प्रकल्पाचा मार्ग तसेच त्याचे भूसंपादन याला रेल्वे मंत्रालयाची मान्यता नसल्याची बाब समोर आली. तेव्हापासून या प्रकल्पाच्या जमिनींच्या भूसंपादनासाठी निधी मिळत नसल्याने भूसंपादन प्रक्रिया रखडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार या रेल्वेमार्गासाठी आग्रही असून त्यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पातील अडचणी मार्गी लावण्यासाी बैठक घेतली होती. दरम्यान रेल्वे बोर्डाने या कामाला हिरवा कंदील दिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने २४२४ कोटींना मंजुरी दिली आहे.

नाशिकरोडच्या कोच दुरुस्ती कारखान्यासाठी १९ कोटी
रेल्वेच्या भुसावळ विभागातील विविध विकास कामांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली असून, त्यात दौंड मनमाड दुहेरीकरणाच्या कामासाठी ३०० कोटी तर मनमाड-जळगाव तिसऱ्या मार्गासाठी १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनमाड-दौंड मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू असून उर्वरित २४७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुढील वर्षांपासून मनमाड-नगर-पुणे-दौंड प्रवास सुसाट होणार आहे. तसेच रेल्वेने भुसावळ - मनमाड - इगतपुरी दरम्यान तिसऱ्या मार्गिकचे काम सुरू केले आहे. या अंतर्गत मनमाड जळगाव या १६० किलोमीटरच्या तिसऱ्या मार्गिकेसाठी १२० कोटी रुपयांची तरतूद अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

तसेच नाशिकच्या रेल्वे ट्रॅक्शन परिसरात कोच दुरुस्ती आणि मेंटेनन्स कारखाना उभारणीसाठी बोर्डाने ४५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली होती. आता या अंतरिम अर्थसंकल्पात कोच दुरुस्ती कारखाना उभारणीच्या कामासाठी १८.८५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच ट्रॅक्शन परिसरात उभारण्यात येत असलेल्या व्हील रिपेरिंग कारखान्यासाठीही ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.