Pune
Pune Tendernama
टेंडर न्यूज

Pune : 'या' कारणांसाठी देहू-आळंदी-चाकण-राजगुरुनगर महानगरपालिका हवीच! काय म्हणाले Ajit Pawar?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत ३४ गावे समाविष्ट होऊन अनेक वर्ष झाली, तरी अजूनही या गावांचा विकास आराखडा तयार झालेला नाही. महापालिका आयुक्तांनी यासाठी ठोस प्रयत्न करावेत. आता महापौर, विरोधी पक्षनेते किंवा तुम्हाला अडविणारे कोणीही नाही, त्यामुळे कारणे देऊ नका, लवकर निर्णय घ्या. समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य द्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी महापालिका (PMC) प्रशासनाला धारेवर धरत विकास आराखड्याला गती देण्याचे आदेश दिले.

वाघोली समान पाणीपुरवठा, वडगाव शिंदे येथील जलजीवन योजनेचे उद्‌घाटन व धानोरीतील पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार सुनील टिंगरे, अशोक पवार, चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, ज्येष्ठ नेते रामभाऊ मोझे व पदाधिकारी उपस्थित होते.

विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण होत असल्याने लोहगावला जाण्यासाठी नवीन पर्यायी रस्त्याची गरज आहे. हवाईदलाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असेही पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

पवार म्हणाले, ससूनच्या धर्तीवर लोहगाव येथे होत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला चांगला निधी देतो, त्याचे काम लवकर पूर्ण करून घ्या. डांबरी रस्त्यांऐवजी काँक्रिटचे रस्ते चांगले असल्याचा अनुभव आपण मुंबई-पुणे महामार्गावर घेतला आहे. त्यामुळे काँक्रिटचे रस्ते करण्यास प्राधान्य द्या. रिंगरोडच्या कामाला १८० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. डिसेंबरपर्यंत रिंगरोडचे काम पूर्ण करायचे आहे.

देहू, राजगुरुनगरसाठी स्वतंत्र महापालिकेचा विचार

धनकवडीत पूर्वी अनधिकृतपणे बांधकामे वाढली, धनकवडी महापालिकेत आल्यानंतर तेथील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आले. म्हणूनच देहू, आळंदी, चाकण व राजगुरुनगरसाठी आता स्वतंत्र महापालिका करण्याचा विचार सुरू आहे. स्वतंत्र महापालिका झाल्यास नियमांचे पालन होईल, गैरप्रकारांवर नियंत्रण येईल, तसेच या गावांचा संतुलित विकास होण्यास मदत होईल, असेही पवार यांनी सांगितले.

‘त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही’

तीस वर्षांपूर्वी राजकारणात आलो. तेव्हा, रामभाऊ मोझे स्कूटरवर फिरायचे, आता ते मार्गदर्शकांच्या भूमिकेत आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही तरुणांना मार्गदर्शन करा, तरुणांना आता संधी द्या, अशी भूमिका आम्ही वरिष्ठांसमोर मांडत होतो. पण साठ वर्षांचा झालो, तरीही त्यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.