Chagan Bhujbal
Chagan Bhujbal Tendernama
टेंडर न्यूज

Nashik : छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश; 'या' प्रकल्पाच्या 252 कोटींच्या टेंडरला मान्यता

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे मातीकाम व कालव्याचे अस्तरीकरण यासाठी राज्य सरकारने सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या २५२ कोटींच्या निधीतून राबवलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून या टेंडरला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे कार्यारंभ आदेश दिल्यानंतर या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे.

पुणेगाव धरणातून सोडलेले पाणी दरसवाडी व तेथून डोंगरगावपर्यंत पोहोचण्यास सध्या दोन महिन्यांचा कालावधी लागतो व इतका काळ धरणातून पूरपाणी सोडणे शक्य होत नसल्याने मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊनही येवल्याला त्याचा फायदा होत नाही. त्याप्रमाणे या कालव्यातून पाणी मोठ्याप्रमाणावर झिरपत असल्याने लगतच्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यासाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी जलसंपदा विभागाने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली होती.

येवला तालुक्याचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ दूर करण्यासाठी १९८०च्या दशकात सुरू करण्यात आलेला पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा प्रकल्पासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी मांजरपाडा प्रकल्प साकारला. त्यानुसार सुरगाण्यातील देवसाने येथून पुणेगाव धरणात पाणी वळवण्यात आले. मात्र, पुणेगाव ते दरसवाडी व दरसवाडी ते डोंगरगाव या कालव्याची दुरवस्था असल्याने मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊनही येवल्याला या प्रकल्पाचा उपयोग होत नव्हता.

या प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या माध्यमातून दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा व पुणेगाव दरसवाडी डावा कालवाचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता देत २५२ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मागील वर्षी मंजूर केला होता. या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून टेंडरला शासनाने मंजुरी दिली असल्याने या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

दरसवाडी पोहोच कालवा कि.मी.० ते ८८ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी १५२ कोटी ९० लक्ष तर पुणेगाव डावा कालवा कि.मी. ० ते ६३ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी ९९ लक्ष ८४ रुपयांच्या किमितीचे दोन टेंडर प्रक्रिया राबवण्यात आले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडाचे पाणी डोंगरगावपर्यंत जाऊन येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत अधिक वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

शेतीचे नुकसान टळणार
पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव या कालव्यामुळे चांदवड व येवला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होण्यास मदत होणार असली, तरी या कालव्याचे पूरपाणी पावसाळ्यात सोडले जात असल्याने पुणेगाव धरणाच्या मुखाच्या भागात या कालव्यातून होत असलेल्या पाणी गळतीमुळे लगतच्या शेतीचे मोठे नुकसान होत असते. त्याचप्रमाणे ओझरखेड डाव्या कालव्यामुळेही शेतीचे नुकसान होत असते.

यामुळे शेतकरी याविरोधात ओरड करीत असतात. या दोन्ही कालव्याच्या अस्तरीकरणासाठी जलसंपदा विभागाने मागील वर्षीच निधी मंजूर केला आहे. आता हे काम झाल्यास या कालव्यांच्या वरच्या भागातील शेतीचे नुकसान टळणार आहे.