citylink
citylink Tendernama
टेंडर न्यूज

Nashik : महापालिकेचे दोन कोटींचे नुकसान करून सिटीलिंक पुन्हा रस्त्यावर; नऊ दिवसांनी संप मिटला

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : थकीत वेतनासह इतर मागण्यांकरता मागील सलग नऊ दिवसांपासून सिटीलिंक वाहकांच्या संपामुळे नाशिककरांचे प्रचंड हाल झालेच याशिवाय महानगर परिवहन महामंडळाचे १.८० कोटींच नुकसान झाले आहे. अखेरीस शुक्रवारी (दि.२२) सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी व वाहकांसमवेत झालेल्या बैठकीत वाहकांना आश्वासन देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केल्याने त्यांनी संप मागे घेतल्याने शनिवार (दि.२३) पासून सिटीलिंक बससेवा नियमितपणे सुरू झाली आहे.

सिटीलिंक बससेवा जुलै २०२१ मध्ये सुरू झाल्यापासून वाहक पुरवत असलेल्या ठेकेदाराकडून वेळेवर वेतन न करणे, भविष्यनिवार्ह निधी खात्यात जमा न करणे, बोनस न देणे, दंड आकारणी करणे आदी कारणांमुळे वाहकांनी आठ वेळा संप पुकारला होता. मात्र, आता १४ मार्चपासून सुरू झालेला संप अभूतपूर्व ठरला. हा संप मिटवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, सिटीलिंक, वाहक पुरवठादार यांनी अनेक प्रयत्न करूनही वाहक संप मागे घेण्यास तयार नव्हते. अखेरस सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, एजन्सीचे प्रतिनिधी व वाहकप्रतिनिधी यांच्यात शुक्रवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत कंपनी ठेकेदार यांनी वाहकांच्या काही मागण्या मान्य केल्या तर उर्वरित मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे वाहकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. वेतन, भविष्य निवार्ह निधी, राज्य कामगार विभाग व रजेचे पैसे खात्यात जमा करणे, वेतनवाढ देणे, बोनस  या वाहकांच्या प्रमुख मागण्या होत्या. या संप काळात महापालिका प्रशासनाने वाहकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी २ कोटी ५३ लाख रुपये ठेकेदार कंपनीला अदा केले. त्यानंतरही वाहक संप मागे घेण्यास तयार नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. संपामुळे सिटीलिंक बससेवेवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे हाल होत होते. तसेच या बसेसचे ठरलेले भाडे देणे बंधनकारक असल्याने महापालिकेचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत होते.

सिटीलिंकच्या तपोवन डेपोत दिडशे बसेस असून या सर्व बसेसवरील पाचशे वाहकांनी संप पुकारला होता. नाशिकरोड डेपोतून वीस बसेसच्या माध्यमातून अधिकाधिक फेऱ्या मारल्या जात होत्या.  मात्र, प्रचंड ताण या तोकडया बसेसवर आलेला होता. तपोवन बसडेपोतील बसेससाठी वाहक पुरवण्याचा ठेका येत्या जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. त्यातच या ठेकेदाराकडून पुरवल्या जात असलेल्या ठेकेदारांनी आतापर्यंत अनेकदा संप पुकारल्याने महापालिकेने पुरवठादाराची सेवा समाप्त करण्यासाठी तिसरी नोटीस पाठवून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू केली असून ती टेंडर प्रक्रिया आता लोकसभा निवडणूक आचारसंहितेत अडकली आहे. दरम्यान यावेळीचा संप हा आतापर्यंतचा सर्वाधिक  मोठा व नऊ दिवस सुरू होता. यात सिटीलिंक प्रशासनाचे मोठे नुकसान झाले असून महानगर परिवहन महामंडळाला या संपामुळे १.८० कोटी रुपये फटका बसला आहे.