मुंबई (Mumbai): नागपूर शहरात ‘अमृत-२’ योजनेंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च २०२७पर्यंत गतीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘अमृत-२’अंतर्गत सुरू असलेली विकासकामे तसेच पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या विषयांवर रामगिरी शासकीय निवास येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त अंकित, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडी आशा पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता नीता ठाकरे, महापालिकेच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत ‘अमृत-२’ योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील खोदकाम आणि पुनर्भरणाच्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या. रिंग रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांबाबतही मुद्दे उपस्थित करण्यात आले.
आमदार प्रवीण दटके यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी-वखरे यांनी पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाची माहिती दिली.
रस्ते पुनर्भरणात तडजोड नको
सिमेंट रस्त्यांवर पुनर्भरण किंवा खड्डे बुजविताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीचा सक्तीने अवलंब करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
भविष्यात शहरात रस्ते खोदकाम आणि त्यानंतरच्या पुनर्भरण प्रक्रियेसंदर्भात संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक धोरण तयार करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. संबंधित विभागांनी योग्य समन्वयाने काम करण्याचे निर्देश देतानाच कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
पोहरा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचाही आढावा
महापालिका आयुक्त डॉ. इटनकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘अमृत-२’ योजनेतील कामांसोबतच पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली.
यावेळी विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटबाबत माहिती देण्यात आली. जयताळा येथे १० एमएलडी, तर चिखली येथे ३५ एमएलडी क्षमतेचा एसटीपी उभारण्यात येणार आहे. तसेच चिंचभवन, बीडीपेठ आणि सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
Key Points
नागपूरमधील ‘अमृत-२’ची सर्व कामे मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश,
रस्ते पुनर्भरण आणि खड्डे बुजविताना वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आदेश,
रस्ते खोदकाम व पुनर्भरणासाठी सर्व विभागांचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची सूचना,
कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा,
जयताळा येथे १० एमएलडी आणि चिखली येथे ३५ एमएलडी एसटीपी उभारणार