MRVC
MRVC Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे 'ते' 20 हजार कोटींचे टेंडर लांबणीवर?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) २३८ वंदे मेट्रोसाठी काढलेले ग्लोबल टेंडर पुढे ढकलले आहे. सुमारे २० हजार कोटी रुपयांचे हे टेंडर आहे. मुंबईसाठी २३८ वंदे भारत मेट्रो (एसी लोकल) रेल्वे बोर्डाकडून मंजूर करण्यात आली होती. मात्र, मंजुरी मिळूनही ही योजना तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

मेड इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनपाठोपाठ केंद्रीय रेल्वे बोर्डाने वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वंदे मेट्रो मुंबईत उपनगरी लोकल सेवा म्हणून चालविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाने मंजूर केलेल्या एमयूटीपी ३ आणि एमयूटीपी ३ अ अंतर्गत २३८ वंदे मेट्रो लोकलची खरेदी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला मंजुरीही देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) भारतीय बनावटीच्या वंदे मेट्रोकरिता ग्लोबल टेंडर प्रसिद्ध केले होते. २९ सप्टेंबरपर्यंत टेंडर भरता येणार होते.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत. यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या लोकलसाठी रेल्वे बोर्डाने गेल्या महिन्यात मंजुरी दिली आहे. त्यानंतर एमआरव्हीसीने टेंडर प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली होती. या टेंडरमध्ये २३८ एसी लोकल व्यतिरिक्त ३५ वर्षांसाठी त्यांची देखभाल आणि दोन डेपो बांधण्याच्या कामाचा समावेश होता.

एसी लोकलचे नाव बदलून 'वंदे भारत मेट्रो' असे करण्यात आले. मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये दररोज सरासरी १२०० प्रवासी आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक सेवेत १६०० प्रवासी प्रवास करत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक एसी लोकलमध्ये सरासरी दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत एसी लोकल ट्रेनमधून दररोज ६३ हजार प्रवासी प्रवास करत होते. आता पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दररोज एकूण १३५ एसी लोकल सेवा धावत आहेत, ज्यामध्ये दररोज सुमारे १.५३ लाख लोक प्रवास करत आहेत. रेल्वे फक्त दहा रेकने सर्व सेवा चालवत आहे.