Metro
Metro Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Metro 3 : मेट्रोच्या भुयारी प्रवासातही अनुभवता येणार वेगवान इंटरनेट अन् मोबाईल सेवेचा थरार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो-३ च्या (Mumbai Metro 3) प्रवासादरम्यान मुंबईकरांना अखंडीत मोबाईल आणि इंटरनेट सेवा उलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सौदी अरेबियामधील रियाध स्थित एसीईएस (ACES) कंपनीच्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीसोबत मेट्रो मार्ग-३च्या दूरसंचार पायाभूत सुविधेसाठी करार केला आहे.

सौदी अरेबियातील रियाध शहरात आयोजित LEAP-२०२४ कार्यक्रमांतर्गत - "A Digital DAVOS" समारंभात या करारावर सही करण्यात आली. यावेळी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, संचालक (नियोजन आणि रिअल इस्टेट डेव्हलपमेंट/NFBR) आर. रमणा आदी उपस्थित होते.

मुंबई मेट्रो मार्ग-३ करता दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी एसीईएस इंडिया कंपनीसोबत करार करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आता मेट्रो-३ च्या प्रवासादरम्यान अखंडीत मोबाईल आणि इंटरनेट सेवा उलब्ध होईल. एसीईएस ही जागतिक पातळीवरील अनुभव असलेली आघाडीची आंतरराष्ट्रीय न्युट्रल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. मेट्रो-३च्या दरवर्षी ६२५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना डिजिटल अनुभव देण्यासाठीची ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

१२ वर्षांसाठी करण्यात आलेल्या या करारामुळे ४जी व ५जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मेट्रो-३ द्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या ३३.५ कि.मी. लांबीच्या प्रवासादरम्यान संपूर्ण २७ स्थानकांवर, प्लॅटफॉर्मवर, भुयाऱ्यांमध्ये अतिजलद व अखंडीत मोबाईल सेवा प्राप्त होणार आहे.