Miision Infra, Devendra fadnavis, Budget Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai Infra Boost: मुंबईकरांसाठी खुश खबर! 2 तासांचा प्रवास आता अवघ्या 30 मिनिटांत

Metro Line 9 Phase 1: दहिसर–काशीगाव मेट्रो सुरू, एमएमआर कनेक्टिव्हिटीला मोठी चालना, ₹6600 कोटींचा मेट्रो प्रकल्प कार्यान्वित; मीरा-भाईंदर ते मुंबई प्रवास वेगवान

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई-मीरा भाईंदर दरम्यानच्या प्रवासाला मोठा वेग देणारी मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला असून ₹6607 कोटींच्या या प्रकल्पामुळे दोन तासांचा प्रवास आता केवळ 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारा मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे. दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.7 किमी मार्गिकेवर चार स्थानकांसह ही सेवा सुरू झाली असून, यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.

या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते झाले. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव ही स्थानके समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ही मार्गिका मेट्रो लाईन-7 शी जोडली गेल्याने पश्चिम उपनगरातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम झाली आहे.

सुमारे ₹6607 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या 1 ते 2 तास लागणारा प्रवास केवळ 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यात ही लाईन मेट्रो-3 शी जोडली जाणार असून, मीरा-भाईंदर ते कुलाबा दरम्यान अखंड प्रवास शक्य होईल.

इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. अंदाजे 20 ते 30 टक्के प्रवासी रस्त्यावरून मेट्रोकडे वळतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

या मेट्रो प्रकल्पात हरित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाइटिंग आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच डबल डेकर रचना वापरून जागेचा कार्यक्षम उपयोग करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान मार्गाचे काम 96 टक्के पूर्ण झाले असून, तेही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एकूण मेट्रो नेटवर्क 100 किमी पार झाले असून, भविष्यात ते 337 किमीपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे.

मुंबईकरांचा प्रवास असा होणार गतीमान

  • मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा सुरू (4.7 किमी)

  • ₹6607 कोटींचा प्रकल्प; 4 स्थानके कार्यान्वित

  • प्रवास वेळ 2 तासांवरून 30 मिनिटांवर

  • मेट्रो-7 शी कनेक्टिव्हिटी; पुढे मेट्रो-3 शी जोडणी

  • वाहतूक कोंडी 20–30% ने कमी होण्याची शक्यता