Mumbai Goa Highway Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी कायम! नवी डेडलाईनही चुकणार?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२५ या नव्या डेडलाईनपर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने प्रत्यक्ष पाहणी करुन संथगतीने सुरु असलेल्या कामांची पोलखोल केली आहे.

टप्पा-०१ पनवेल ते कासु -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
या टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. या टप्प्यात ३८ किमी कॉंक्रीट पूर्ण झालेले असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाईन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व या टप्प्यात ६ महिन्याच्या आत महामार्गाला खड्डे पडलेले आहेत. हा टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होता परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची नाही.

टप्पा-०२ कासू ते इंदापुर -४२ किमी ते ८४ किमी  (४२ किमी)-
या टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत  काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. या टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. या टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग वेळेत पूर्ण होईल याची शाश्वती शक्यता नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम शिल्लक आहे, जनावरे, वाहनांसाठी भुयारी मार्ग, साईटपट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटवलेले नाही. या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेले आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेले आहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉकची लेव्हल बिघडल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या टप्प्याचे काम २००५च्या आराखड्यानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचणीचा ठरत आहे. तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

टप्पा-०३ इंदापुर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
या टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे ४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासची अवस्था बिकट आहे. सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत संभ्रम आहे. याठिकाणी सद्यस्थितीत पूर्णतः काम बंद असून नवीन ठेकेदार निवडण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ४-५ किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळतात. परिणामी याठिकाणी स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार अवजड वाहतूक इतर मार्गाने वळविणे व माणगाव बायपास आहे त्यास्थितीत वापरण्यास देणे अशी मागणी होत आहे. लोणेरे येथील ब्रिजचे काम एप्रिल-मे पर्यंत पूर्ण करण्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात येत आहे.

टप्पा-०४-वडपाले ते भोगाव(११० किमी ते १४९ किमी)-
या टप्प्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आलेली आहेत. महाडमधील टोलजवळील आंबेतकडे जाणारा अंडरपास धोकादायक आहे. याठिकाणी सर्व्हिस रोडचे तीन मार्ग खुले असून एका मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. याठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अडथळा असल्याचे स्थानिकांकडून कळते. परंतु शासनाच्या अंतर्गत वादामुळे अनेक अपघात याठिकाणी घडत आहेत. महाडकडे वाहनांना जायचं झाल्यास उलट बाजूने महामार्गावर प्रवेश करावा लागत आहे. प्रत्येक गावाजवळ अंडरपास देणे अपेक्षित होते कारण महामार्गाच्या अलीकडे गाव तर पलीकडे शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय, शेती असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग ओलांडताना अनेक अपघात घडत आहेत. यामध्ये चांभारखिंड येथे अंडरपास तर पोलादपूर येथे स्कायवॉक असणे गरजेचं आहे.

टप्पा-०५ - भोगाव १४९ किमी ते कशेडी १६१ किमी -
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळाली व ही परिस्थिती अद्यापही तशीच आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम शिल्लक आहे.

टप्पा-०६ - कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी-
या टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिति बिकट आहे, हा घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे. याठिकाणी अद्यापही बरेचसे काम बाकी आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे व पावसाळ्यात नेहमीप्रमाणे संरक्षण भिंत कोसळणार नाही यासाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे याबाबत उत्सुकता आहे.

टप्पा-०७ - परशुराम घाट २०५ किमी  ते आरवली २४१ किमी-
या टप्प्यात चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर हा ब्रिज तोडण्यात आला व नव्याने ब्रिजचे काम चालू आहे. महामार्गावर एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना अद्यापही याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. सूचना फलक नसल्याने व पूर्वसूचना न देता अचानक कुठेतरी कामाला सुरुवात केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

टप्पा-०८ व ०९ -आरवली ते वाकेड -
या टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे.

लांजा - लांजा शहरांत उड्डाणपुलाचे काम चालू असून अंदाजित ३ ते ३.५ किमी लांबीचे हा उड्डाणपुल आहे. या उड्डाणपुलामुळे शहराचे दोन भाग होत आहेत. यामुळे उड्डाणपुलाचे काम ४५० मी ते ५०० मीटरने वाढविल्यास प्रशासकीय कार्यालय, शाळा यांना एकत्रित जोडले जाईल. तसेच या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड किमान प्रवासासाठी डांबरी असावेत जेणेकरून प्रवासाला अडथळे निर्माण होणार नाहीत परंतु मातीचा रोड असल्याने धुळीचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे.

देवधे- देवधे येथे देखील गाव अलीकडे तर शाळा, शेती पलीकडे असल्याने याठिकाणी देखील अंडरबायपास असणे आवश्यक आहे. तसेच इतर गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने जलद गतीने महामार्गावर वाहनांचा प्रवेश होतो परिणामी अपघात घडू शकतात याठिकाणी सर्व्हिस रोडचे काम चालू असून ५-६ फुटाचे खड्डे मारले असून सुरक्षेच्यादृष्टीने काहीही काळजी घेण्यात आलेली नाही. रात्री अपरात्री याठिकाणी अपघात घडू शकतो.

चरवेली -
गावाला अंडरपासची आवश्यकता आहे. याठिकाणी काम पूर्ण झालेले असून महामार्ग लगत अंडरपास किंवा बॅरिकेट नसल्याने गुरे रस्त्यावर येत असतात यामुळे सतत अपघात घडत आहेत. १५ दिवसापूर्वीच वाहनाच्या धडकेत २ बैल अपघातात मृत्युमुखी पडले. बस स्टॉप, शेती यांसारख्या कामासाठी महामार्ग ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

पाली -
पाली येथील उड्डाणपुलाचे फक्त खांब उभे करण्यात आलेले आहेत. याठिकाणी १ जेसीबी व ४ कामगार काम करत आहेत. जर काम अशाच पद्धतीने चालू राहिल्यास हा उड्डाणपुल पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती नाही.

हातखांबा -
हातखांबा येथे देखील उड्डाणपुलाच्या कामाची गती अतिशय धिमी आहे. ठेकेदाराला मनुष्यबळ व यंत्रणा वाढविणे अपेक्षित आहे. हातखांबा येथील गुरववाडी येथे महामार्ग हा ६ फूट उंच असून गुरववाडी गावातील जोडणारा रस्ता ६ फूट खोल असल्याने या महामार्गावर प्रवेश करणे कठीण आहे. यासाठी हा उतार किमान ५०० मीटरपासून केल्यास गावातील रस्ता व महामार्ग समान अंतरावर येतील. याठिकाणी ठळक दिशादर्शक फलक नसल्याने मुंबईतून येणारा पर्यटक गोवा येथे जाण्याच्या बदल्यात थेट कोल्हापूर येथे पोहचेल कारण सर्वच ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.

निवळी- निवळी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची अशीच परिस्थिती आहे. हा उड्डाणपुल बाजारपेठेत उतरत असताना खांब असणे अपेक्षित असताना भराव टाकल्याने महामार्गावर बाजारपेठेत दुतर्फा परिस्थिती निर्माण होत आहे.

बावनदी उड्डाणपुल -
या कामाला गती दिसत असून अशाच पद्धतीने काम चालू राहिल्यास लवकरच पूर्ण होऊ शकते.

वांद्री अंडरपास-
वांद्री येथे अंडरपासच्या कामाला ८ दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आलेली आहे. हे काम यावर्षी पूर्ण होण्याचे चिन्हे दिसत नाहीत. अद्यापही अंडरपास व महामार्गाचे काम बरेचसे बाकी आहे.

संगमेश्वर उड्डाणपूल -
या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालू असून ४ कामगार काम करीत आहेत. संगमेश्वर येथे अगदी सकाळपासून ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. सावित्री नदीवरील पूल जर ६ महिन्यात पूर्ण होऊ शकतो तर संगमेश्वर मधील उड्डाणपुलाचे काम का होऊ शकत नाही असा प्रश्न आहे.

आरवली- आरवली येथे सर्व्हिस रोडचे काम चालू असून ५-६ फूट खोल ड्रेनेज लाईन खोदकाम करण्यात आलेले आहे. परंतु याठिकाणी सुरक्षा वाऱ्यावर असून आतापर्यंत ३ अपघात झाले आहेत.