ST Bus Stand - MSRTC Tendernama
टेंडर न्यूज

मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा! राज्यातील 'ती' 60 बस स्थानके होणार चकाचक

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील एसटी महामंडळाच्या (MSRTC) जागा बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी विकासकांमार्फत विकसित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बस स्थानकांसाठी टेंडर (Tender) काढण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली.

"बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर खासगी विकासकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात धाराशिव येथे भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करावी. याचबरोबरच येरमाळा व उमरगा येथील बसस्थानक देखील विकसित करण्यात यावे, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले. ते विधिमंडळ प्रांगणात धाराशिव जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भात बैठकीत बोलत होते.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, राज्यातील एस. टी. महामंडळाच्या विविध जागा भविष्यात बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर खासगी विकासकांच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहेत. या जागांचे शहरी, निमशहरी व ग्रामीण असे तीन गट तयार केले असून या तीन गटातील प्रत्येकी एक बसस्थानक याप्रमाणे तीन बस स्थानकांचा एक समूह करून त्यासाठी टेंडर मागवले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यभरातील ६० पेक्षा जास्त बस स्थानकांची टेंडर मागवली जाणार असून, त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, येरमाळा व उमरगा या बसस्थानकांचा विकास करण्यात येणार आहे.

सुसज्ज बसस्थानक, प्रसाधनगृह, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबरोबरच अद्ययावत आगार या आगारामध्ये इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग स्टेशन, सोलर प्लांट, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा असणार आहेत, असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

यासंदर्भातील टेंडर प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून बस स्थानकाच्या कामाला देखील त्यानंतर सुरुवात केली जाईल, असे मंत्री सरनाईक सांगितले. बैठकीला तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.