मुंबई (Mumbai) : दररोज तब्बल २ लाख वाहनांची रहदारी असलेल्या वाशी खाडी पुलावरुन मुंबईच्या दिशेचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन उड्डाण पुलांपैकी मानखुर्द बाजूकडील उड्डाणपुलाच्या डेक उभारणीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे अंतिम टप्प्यात असून जानेवारी अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या पुलासाठी सुमारे ५५९ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तसेच सध्या ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरु आहे.
सायन पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. मात्र हा पूल अपुरा पडत आहे. त्यामुळे वाशी टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या ठाणे खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना संमातर अशा प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहेत. यातील मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही कामे येत्या दोन महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून जानेवारी अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. सध्याच्या वाशी खाडीपुलावरून दर दिवशी जवळपास दोन लाखांच्या जवळपास वाहने ये-जा करतात. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. पण, वाढीव मार्गिकांमुळे या समस्येवर तोडगा निघणार आहे.
वाशी खाडी पुलामुळे वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून वाशी ते मानखुर्द हा प्रवास जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे वाहन चालकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या पुलासाठी 559 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर पुलाची लांबी 1837 मीटर इतकी आहे. प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल उभारण्यात येत आहेत. ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पाचे कामदेखील युद्ध पातळीवर सुरु आहे. ठाणे खाडी पूल-3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे खाडी पूल-3च्या रुपाने आणखी एक वाहतुकीचा पर्याय नागरिकांना खुला होत आहे.