Pune ZP
Pune ZP Tendernama
टेंडर न्यूज

गर्भवती मातांच्या आरोग्याशी खेळ; पोषण आहारात अळ्या अन् कीडे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) आरोग्य विभागातून गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आणि सोनकीडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्य सरकारचा राज्यातील गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Larvae and worms in nutrition food)

राज्य सरकारच्यावतीने गर्भवती मातेस व गर्भात असणाऱ्या बालकास उत्तम प्रकारची शक्ती मिळावी यासाठी पोषक आहाराचे किट दिले जाते. यात बदाम, खारीक, काजू, गूळ व इतर पौष्टिक आहाराचा समावेश आहे. मातेचे आणि बाळाचे आरोग्य तंदुरुस्त चांगले रहावे या हेतूने हा उपक्रम राबविला जातो. मात्र या हेतूलाच हरताळ फासला जाताना दिसत आहे.

शिरूर तालुक्यातील (जि. पुणे) आंबळे येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आहारातील गूळ आणि काजूमध्ये किडे आढळले आहेत. गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याने सरकारचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शासकीय यंत्रणेतील विशिष्ट ठेकेदार प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जादा नफा मिळण्याच्या दृष्टीने खारीक, काजू, गूळ आदी निकृष्ट दर्जाच्या वस्तूंची खरेदी करीत असल्याचे आणि त्यातून मिळणारा मलिदा ओरबाडून खाण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु त्यामुळे गरोदर मातांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे किट कोणत्याही प्रकारची तपासणी न करता आणि त्यातील वस्तूंचा कसलाही दर्जा न तपासता वाटले जात आहेत. पौष्टिक आहारात जिवंत अळ्या, सोनकिडे आणि बुरशी आढळल्यामुळे हे खाद्यपदार्थ सरकारी यंत्रणेकडून दिले जाणे म्हणजे ठेकेदाराचे लाड करण्यासारखे आहे.

निष्कृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे गरोदर माता व बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. दलालीच्या महाजाळ्यात असणाऱ्या ठिकाणीच हे प्रकार आढळतात, अशी नागरिकांमध्ये चर्चाही आहे.

सरकारला गरोदर मातांच्या आरोग्याशी देणेघेणे नाही : सुषमा अंधारे

या घटनेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली. अंधारे म्हणाल्या, 'पोषण आहाराच्या नावाखाली गरोदर माता, अंगणवाडीत अचानक छापेमारी केल्यास सर्व ठिकाणी निकृष्ट आणि आजारी पडाल असा माल आहे. सोनकीडे आणि अळ्या आढळणे ही पहिली बाब नाही. शिरूरमधील घटनेचे पुरावे आढळले, तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. सरकारला त्यांचेच प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांना गरोदर मातेच्या प्रश्नाशी देणेघेणे नाही. निवडणूक, जागावाटप यामध्ये ही सर्व माणसे गुंतली आहेत'.

आरोग्य यंत्रणेचा कारभार खिळखिळा झाला आहे. या योजनेचे नाव पोषण आहार योजना आहे. मात्र, त्यात पोषक घटक नाही. कुठल्याही अंगणवाडीत खिचडी की रवा असतो हे काही कळत नाही, अशी टीका अंधारे यांनी केली.

ठेकेदारावर कारवाईच्या पोकळ बाता

यासंदर्भात बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शिरूर तालुक्यातील आंबळे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने ठेकेदारामार्फत पौष्टिक आहार पुरवला आहे. तो पुन्हा जमा करून त्याचा पंचनामा करून त्याची चौकशी करून जिल्हा परिषदेकडे परत पाठविण्यात येईल. ठेकेदारासोबत जिल्हा परिषदेचा जो करार झालेला आहे, त्या करारानुसार तो ‘पोषण आहार’ बदलून देण्यात येईल. नियमानुसार ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.

पोषण नेमके कुणाचे? : अमोल कोल्हे

गर्भवती महिलांच्या पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार धक्कादायक आहे. हा गर्भवती महिलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. तसेच आहार पुरवण्यात नेमके पोषण कुणाचे आहे? महिला, बालके की ठराविक ठेकेदारांचे, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

पोषण आहारात निकृष्ट वस्तूंचा पुरवठा गंभीर : आदिती तटकरे

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आंबळे येथे जो प्रकार घडला आहे, ही निश्चितच गंभीर बाब आहे. त्याची प्राथमिक माहिती घेतली आहे. आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा परिषदेचे स्थानिक अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, तसेच चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.