Dharavi, Adani
Dharavi, Adani Tendernama
टेंडर न्यूज

Dharavi Redevelopment Project: धारावीच्या मेकओव्हरच्या दिशेने 'अदानी'चे पहिले पाऊल! 18 मार्चपासून...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : धारावीतील लाखो अनौपचारिक सदनिका रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी १८ मार्च, 2024 रोजी सर्वेक्षण सुरू करण्यात येईल, असे महाराष्ट्र सरकार आणि अदानी (Adani) समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल - DRPPL) जाहीर केले.

प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन पात्रता निकष निश्चित करण्यासाठी राज्य सरकार या माहितीचा उपयोग करणार आहे. या सर्वेक्षणामुळे जगातील सर्वात मोठ्या अनौपचारिक वसाहतींपैकी एक असलेल्या धारावीवर प्रथमच ‘डिजिटल धारावी’ ही प्रगत लायब्ररी तयार होणार आहे.

या सर्वेक्षणाला कमला रमण नगर येथून प्रारंभ होणार असून, प्रत्येक अनौपचारिक सदनिकांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. यानंतर संबंधित गल्लीचे लेसर मॅपिंग करण्यात येईल. ज्याला 'लिडार सर्व्हे' म्हणून ओळखले जाते. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी एक प्रशिक्षित टीम स्वदेशी विकसित केलेल्या ऍपसह प्रत्येक सदनिकेला भेट देणार आहे. धारावीकरांच्या प्रश्नांना आणि समस्यांना उत्तर देण्यासाठी टोल फ्री क्रमांक - 1800-268-8888 सक्रिय करण्यात आला आहे.

धारावीकर गेल्या अनेक दशकांपासून त्यांच्या स्वप्नातील घरे आणि दुकानांमध्ये जाण्यासाठी पुनर्विकासाची वाट पाहत आहेत. आता, धारावीला जागतिक दर्जाच्या टाउनशिपमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या डीआरपी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अनौपचारिक सदनिकाधारकाला घर मिळेल. अशा प्रकल्पात प्रथमच सर्व पात्र-अपात्र सदनिकाधारकांनाही घरे मिळणार आहेत. टेंडरमधील अटी शर्तीनुसार, सर्व पात्र आणि अपात्र रहिवासी सदनिकाधारकांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालयासह फ्लॅट मिळेल.

तसेच, पुनर्विकसित धारावीमधील पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांना त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि औपचारिकता देण्यासाठी राज्य वस्तू आणि सेवा करातून (SGST) पाच वर्षे सवलत देण्यात आली आहे. टेंडर अटींनुसार ही सवलत देण्यात आली आहे.

धारावीमध्ये कपडे आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक युनिट्सचा समावेश होतो. त्यापैकी अनेकजण जगभरात विकल्या जाणाऱ्या मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पुरवठादार आहेत. ज्याची उलाढाल लाखो डॉलर्समध्ये आहे. ते स्थानिक आणि जागतिक स्तरावर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उत्सुक आहेत.

डीआरपीपीएलने जागतिक दर्जाच्या शहराची रचना करण्यासाठी जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा नियोजन तज्ञांपैकी अमेरिकास्थित डिझाईन फर्म सासाकी आणि यू.के.स्थित नगर नियोजक बुरो हॅपोल्ड यांना आपल्या सोबत घेतले आहे.