Hinjawadi IT Park Traffic Tendernama
टेंडर न्यूज

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? १,८२६ कोटींच्या आराखड्याला तत्त्वतः मंजुरी

चाकणमध्ये ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा, ५०० अतिरिक्त बस आणि पावसाळी निचरा व्यवस्थेचे नियोजन; हिंजवडीतील वाहतूक कोंडी, वीजपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): चाकणमधील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, पावसाळी पाणी निचरा आणि नागरी सुविधांच्या सुधारणेसाठी १,४०० कोटी रुपयांच्या आराखड्यास, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित ४२६.५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या दोन्ही परिसरांतील कामे डिसेंबरपासून सुरू करण्याचे नियोजन असून, चाकणमधील पावसाळी पाणी निचऱ्याची व्यवस्था जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत या एकात्मिक पायाभूत विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

चाकणमधील विकासकामांसाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि अन्य संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. विविध विभागांच्या निधीचा आणि यंत्रणांचा एकत्रित वापर करून रस्ते, पावसाळी निचरा, वाहतूक व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

चाकणमधील ७८ किमी नैसर्गिक नाले मोकळे करणार

चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे ७८ किलोमीटर लांबीच्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या गंभीर बनली आहे. यामुळे औद्योगिक कंपन्यांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक विस्कळित होणे आणि काही वेळा कंपन्यांचे कामकाज बंद ठेवण्याची वेळ येत आहे.

नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची सुमारे ७० ते ८० टक्के कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित अडथळे टप्प्याटप्प्याने दूर करण्यात येणार आहेत. नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढविणे तसेच आवश्यक ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे.

सिंचन विभागाच्या सर्वेक्षणाच्या आधारे नाल्यांचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. जून २०२७ पर्यंत नाले मोकळे करून पाणी निचरा व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच सुमारे ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ७५ किमी रस्त्यांची सुधारणा

चाकण औद्योगिक परिसरातील ४९८ किलोमीटर रस्त्यांच्या जाळ्याचा अभ्यास करण्यात आला आहे. वाहतुकीची घनता, औद्योगिक महत्त्व, मालवाहतुकीची वर्दळ, रस्त्यांची स्थिती, पाणी साचण्याची समस्या, सुरक्षितता आणि जोडणी या निकषांवर पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा करण्याचे नियोजन आहे.

या कामांमध्ये पादचारी मार्ग, पावसाच्या पाण्याचा निचरा, वाहतूक सुविधा आणि रस्त्यांची सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उपलब्ध रस्ते हक्काच्या जागेतच कामे करण्याचे नियोजन असल्याने या टप्प्यात भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. अतिक्रमणे हटवून उपलब्ध जागेचा वापर केला जाणार असून, रस्त्यांखाली विविध सेवा वाहिन्यांसाठी स्वतंत्र जागेची तरतूद करण्याचाही प्रस्ताव आहे.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी निवडलेल्या रस्त्यांवर स्वतंत्र पादचारी मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणमार्गाच्या कामातही पादचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा समाविष्ट करण्याचे प्रस्तावित आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५०० अतिरिक्त बस

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून चाकणकडे कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने खासगी वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतुकीची आकडेवारी आणि बिग डेटाच्या आधारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

मार्गनिहाय बससेवा सुरू करण्यासाठी सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे. बससेवा वाढविल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

परिसरातील सहा महत्त्वाच्या चौकांची शास्त्रीय पद्धतीने पुनर्रचना, वाहतुकीच्या प्रवाहानुसार वळणांची व्यवस्था आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत दुभाजकांची दुरुस्ती करून नियोजित ठिकाणी यू-टर्नची सुविधा देण्याचे प्रस्तावित आहे.

महत्त्वाच्या चौकांवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित वाहतूक सिग्नल, कॅमेरे, रडार, वाहन क्रमांक ओळख प्रणाली आणि मध्यवर्ती नियंत्रण कक्ष उभारण्याचे नियोजन आहे.

पार्किंग, पाणीपुरवठा आणि वीज सुविधांवर भर

चाकण औद्योगिक परिसरात मोठ्या वाहनांसाठी एमआयडीसीने पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी या पार्किंगचा वापर वाढविण्याचे नियोजन आहे. औद्योगिक आस्थापनांच्या सहभागातून रस्त्यांचे सुशोभीकरण, सार्वजनिक शौचालये आणि बसथांबे उभारण्याचाही प्रस्ताव आहे.

चाकणमधील पाणीपुरवठा योजनेचे काम २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या चाकण इंडस्ट्री असोसिएशनमार्फत सुरू असलेली योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे (एमजीपी) सोपविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

वीजपुरवठ्याची अल्पकालीन तूट भरून काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसीने आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असून, १०० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे.

घनकचरा व्यवस्थापनासाठी १४ गावे आणि दोन नगर परिषदांमधील कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून ही व्यवस्था उभारून कचरा संकलन आणि प्रक्रिया शुल्काच्या आधारे व्यवस्थापन करण्याचे नियोजन आहे. पुढील आठ ते दहा महिन्यांत ही व्यवस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.

AI वाहतूक नियंत्रणासाठी १०० सुरक्षा जवान

चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अंमलबजावणी यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. कमांड अँड कंट्रोल सेंटर, सीसीटीव्ही आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) च्या माध्यमातून वाहतूक नियंत्रण आणि नियमभंगावर कारवाई करण्यात येणार आहे.

वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान उपलब्ध करून देण्यात येणार असून, चाकण परिसरासाठी १ ऑक्टोबरपासून १०० जवान उपलब्ध होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

हिंजवडीसाठी ४२६.५४ कोटींचा स्वतंत्र आराखडा

हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ४२६.५४ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहतूक आणि अन्य व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हिंजवडी परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका किंवा पुणे महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू करण्याचे नियोजन आहे.

Key Points

  • चाकणच्या १,४०० कोटी आणि हिंजवडीच्या ४२६.५४ कोटींच्या आराखड्यांना तत्त्वतः मंजुरी

  • चाकणमधील ७८ किमी नैसर्गिक नाले मोकळे करण्याचे आणि जून २०२७ पर्यंत निचरा व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

  • पहिल्या टप्प्यात ७५ किमी रस्त्यांची सुधारणा आणि सुमारे ३८ किमी पावसाळी गटार व्यवस्था

  • कामगारांच्या वाहतुकीसाठी सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता

  • सहा महत्त्वाच्या चौकांवर AI आधारित सिग्नल आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारण्याचे नियोजन

  • चाकणमध्ये १०० एमव्हीए वीज उपकेंद्र आणि केंद्रीकृत घनकचरा प्रक्रिया केंद्र प्रस्तावित

  • हिंजवडीतील वाहतूक, वीजपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र उपाययोजना