<div class="paragraphs"><p>Mumbai-Pune Express Way</p></div>

Mumbai-Pune Express Way

 

Tendernama

टेंडर न्यूज

मुंबई-पुणे आणखी सुपरफास्ट; चिरले ते खालापूर रस्त्यासाठी सल्लागार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई ते पुणे प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. वरळीहून निघाल्यावर शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवरुन थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Express way) पोहोचता येणार आहे. कारण मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू आता द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.

त्यानुसार चिरले ते खालापूर असा रस्ता बांधण्यात येणार आहे. याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएमआरडीएने नुकतेच टेंडर काढले आहे. त्यामुळे येत्या काळात रस्त्याचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर कमी करत हा प्रवास वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएकडून मुंबई पारबंदर (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) प्रकल्प राबविला जात आहे. २१.८ किमीच्या सागरी मार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे. २०२३ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा सागरी सेतू सुरु झाल्यास काही मिनिटांत नवी मुंबईला पोहोचता येणार आहे. सागरी सेतूला पोहोचणे सोपे व्हावे यासाठी वरळी ते शिवडी असा रस्ता बांधला जात आहे. वरळीवरुन शिवडी सागरी सेतूवर येत वेगाने नवी मुंबईत पोहोचता येणार आहे.

सागरी सेतूवरुन पुढे नवी मुंबईतून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाण्यासाठी वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरुन जावे लागणार आहे. चिरले ते खालापूर हे अंतर बरेच असणार आहे. त्यामुळे चिरलेवरुन द्रुतगती मार्गावर पोहोचता यावे यासाठी सागरी सेतू द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार चिरले ते खालापूर असा रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी बराच काळ लागणार आहे. मात्र हा रस्ता झाल्यास वरळीवरुन थेट खालापूर टोलनाक्यावर पोहोचता येणार आहे.

सागरी सेतू द्रुतगती महामार्गाशी जोडण्यासाठी चिरले ते खालापूर रस्ता बांधण्यात येणार आहे. हा एकूण रस्ता ६.५ किमीचा असणार आहे. यातील १.५ किमीचा रस्ता पूर्णत: नवीन असणार असून हा एमएमआरडीए बांधणार आहे. चिरलेपासून काही अंतरावर एक डोंगर आहे. हा डोंगर फोडून त्यातून रस्ता नेण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.