Uday Samant Tendernama
विदर्भ

Uday Samant: यवतमाळ नगरपरिषदेच्या 'त्या' टेंडर प्रक्रियेची चौकशी करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): यवतमाळ नगरपरिषदमध्ये अमृत योजनेंतर्गत ४२ पैकी ३१ कामे पूर्ण झाली आहेत. तर ११ कामे प्रगतीपथावर आहेत. अमृत योजनेंतर्गत यवतमाळ नगरपरिषदेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्यामार्फत ३० दिवसांत चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवालानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

सदस्य धीरज लिंगाडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. उद्योग मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, बायोमायनिंग प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व नाले सफाई, अग्निशमन केंद्र बांधकाम आणि अमृत योजनेतील पाईपलाईन या कामांच्या टेंडर प्रक्रियेत तक्रारी आल्यामुळे काही निविदा रद्द करून फेरटेंडर काढण्यात आली आहेत.

बायोमायनिंग प्रकल्पासाठी नव्याने पाच टेंडर प्राप्त झाली असून लवकरच काम अंतिम करण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन टेंडर प्रक्रिया आठ दिवसांत सुरू होणार आहे, तर अग्निशमन केंद्र बांधकामासाठी सुधारित टेंडरला मंजुरी देण्यात आली असल्याचे उद्योग मंत्री डॉ. सामंत यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.