Mantralaya Tendernama
विदर्भ

सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊंच्या स्मारकासाठी आणखी 50 कोटी

लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार; रस्ते आणि परिसरातील सुविधांचाही विकास, पर्यटन विकास महामंडळामार्फत काम

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निधीतून शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील स्मारकाचे काम सुरू करण्यासह परिसरातील रस्ते आणि अन्य सुविधांचा विकास केला जाणार आहे.

सिंदखेडराजा येथील स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी २०२४ मध्ये ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. या निधीतून सिंदखेडराजानजीक जिजाऊसृष्टीचे काम सुरू करण्यात आले.

आतापर्यंत या कामासाठी २७ कोटी रुपये खर्च झाले असून, काम प्रगतीपथावर आहे. मात्र, शहरातील लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती. त्यासाठी आता आणखी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्मारकासह परिसरातील सुविधांचा विकास

नव्या निधीतून राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासह परिसरातील रस्ते आणि अन्य सुविधांची कामे केली जाणार आहेत. स्थानिक नगरपालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात येणार असून, पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीमुळे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. स्मारक आणि परिसरातील विकासकामे लवकर पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे.

Key Points

  • सिंदखेडराजातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी आणखी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय,

  • २०२४ मध्ये स्मारक आणि जिजाऊसृष्टीच्या कामासाठी ५० कोटी रुपये जाहीर,

  • जिजाऊसृष्टीच्या कामासाठी आतापर्यंत २७ कोटी रुपये खर्च,

  • लखुजी जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यातील स्मारकाचे काम सुरू करण्यासाठी नव्या निधीचा वापर,

  • स्मारकासह परिसरातील रस्ते आणि अन्य सुविधांची कामे केली जाणार,

  • स्थानिक नगरपालिकेकडून कामाचा प्रस्ताव मागविण्यात येणार,

  • पर्यटन विकास महामंडळामार्फत कामाची अंमलबजावणी केली जाणार.